प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
प्राचीन इराणी इतिहासाचे कालविभाग आणि त्यांचे अवशेष - प्राचीन इराणी इतिहासाचे स्थूलमानानें पुढें दिल्याप्रमाणें चार कालविभाग पाडतां येतील :-
(१) पहिला काल - हा पर्शुभारतीय काल होय. या कालाची माहिती मागच्या विभागांत दिलीच आहे. हा काल म्हणजे प्राचीन इराणी लोकांचे आणि वेदभाषी लोकांचे पूर्वज जेव्हां एकत्र होते तो काल. या कालाचा अभ्यास करण्याची साधनेंहि मागें वर्णिलीच आहेत. (१) शब्दसादृश्यें व (२) सदृश कथा हीं तीं कारणें होत. या अभ्यासाचें फलहि मागें दिलेंच आहे.
(२) दुसरा काल - हा वसाहतकाल होय. या कालाचा अभ्यास अजून शिस्तवार कोणीं केला नाहीं. निरनिराळ्या प्राचीन भाषांच्या स्थानांकडे लक्ष देऊन आणि प्राचीन भाषांतील शब्दांची आणि वाक्यरचनेची स्थिति तपासून निरनिराळ्या लोकांचे संयोग किंवा विसंयोग कसे झाले हें काढलें पाहिजे. हें काम अजून झालें नाहीं. आणि याचें कारण पार्थिआ वगैरे ठिकाणच्या भाषांचे अत्यंत जुने लेख सांपडले नाहींत. या तर्हेच्या अभ्यासास आज कितपत क्षेत्र आहे हें सांगतां येत नाहीं. निरनिराळ्या ठिकाणीं आजच्या काळांत ज्या राष्ट्रजाती दिसतात त्यांचे स्थान आणि त्यांच्या भाषा यांची कितपत संगति लावतां येईल हा अभ्यास करण्याजोगा आहे. पण तसा अभ्यास करण्यास आजच्या इराणाची विशेषेंकरून तेथील ग्राम्य भाषांची पहाणी करावी लागेल. स्थानिक ग्राम्य भाषांचा अभ्यास वाढला म्हणजे वसाहतकालावर विशेष प्रकाश पडेल.
(३) तिसरा काल - हा पौराणिक काल होय. यांत सायरसच्या पूर्वीचें प्राचीन राजे अंतर्भूत होतात. या कालासंबंधाच्या आठवणी शहानाम्यांत पुष्कळ आहेत. दुसर्या व तिसर्या कालावर पुराणवस्तुसंशोधनार्थ शिस्तवार पहाणी अधिक प्रकाश पाडूं शकेल.
(४) चवथा काल - म्हटला म्हणजे अकिमिनियन घराण्याचा काल होय. हाच इराणच्या सत्तावर्धनाचा खरा काल आहे. या कालाचे अवशेष आज इराणांत पुष्कळ शिल्लक आहेत. ते ग्रीक साहित्यास पुरवणीदाखल उपयोगीं पडतात. या कालाचा विस्तार ख्रि. पू. ५५८ पासून ३३० पर्यंत आहे. हिंदुस्थानच्या ऐतिहासिक कालाशीं तुलना करावयाची झाल्यास याला बुद्धापासून मौर्योदयापर्यंतचा काल म्हणतां येईल. आज या कालाची मुख्य साधनें ग्रीक आहेत.
(५) पांचवा काल - हा ग्रीक सत्तेचा काल होय. यावर ग्रीक साहित्य उपलब्ध आहेच. हा काल ख्रि. पू. ३३० पासून ख्रिस्तपूर्व २४८ पर्यंत आहे. हिंदुस्थानच्या इतिहासांत हा ऐन मौर्यकाल होय.
(६) सहावा काल - हा पर्शूंचे बंधू जे पृथू त्यांच्या प्रामुख्याचा काल. या पार्थिअन राजांची कारकीर्द ख्रि. पू. २४८ पासून ख्रिस्तोत्तर २२९ पर्यंत होती. म्हणजे ज्या कालांत मगधप्रामुख्यास भारतांत उतरती कळा लागून पुढें आंध्रांचा उदय होऊन आंध्रांचाहि पाडाव झाला तो हा काल होय.
(७) सातवा काल - हा काल म्हटला म्हणजे सस्सन राजांचा म्हणजे चवथ्याकालाप्रमाणेंच कट्टया इराणी राजांचा काल होय. याची कालमर्यादा ख्रिस्तोत्तर २२६ पासून ६३० पर्यंत आहे.
हिंदुस्थानांत या कालांत प्रथम अराजक, मग लहान लहान संस्थानें आणि शेवटीं उत्तरेस हर्षवर्धनाचे आणि दक्षिणें सत्याश्रय पुलकेशीचें अशी साम्राज्यें झालीं.
येणेंप्रमाणें प्राचीन इराणच्या इतिहासाचे सात काल पडतात. या कालानंतर तेथें मुसुलमानी सत्ता स्थापन झाली.
वरील सात कालांपैकीं पर्शुभारतीय कालावर पूर्वी सविस्तर माहिती दिलीच आहे. वसाहतकालाविषयीं माहिती देतां येत नाहीं. तिसरा काल जो पौराणिक तो सायरसच्या कारकीर्दीस प्रारंभ होतांच संपला असें म्हणण्यास हरकत नाहीं. सायरसच्या पूर्वीच्या उपर्युक्त अज्ञात कालाचा इतिहास जरी देतां येत नाहीं, तरी इराणच्या लोकसमुच्चयाचे घटक, त्यांचा इतिहासाशीं संबंध आणि वसाहतकालावर प्रकाश पाडील अशी थोडीशी माहिती येथें देतों.