प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
पुरोहितांची हक्कासंबंधीं कल्पना - जे लोक आपल्या ईश्वरप्राप्त सामथ्यानें लोकांनां सुखें प्राप्त करून देतात व त्यांच्या मोठाल्या पीडा नाहींशा करतात त्यांची कामगिरी लोकांनीं ओळखून त्यांनां मदत करावी हें अर्थात् त्यांचें कर्म आहे. चांगलें राज्य करणार्या राजाचें अथवा लोकांच्या उपजीविकेकरितां जमीन नांगरणाराचें कितीहि महत्त्व असलें तरी धर्मोपदेशकाचा धंदा सर्वांत उच्च प्रतीचा असून त्यांचा हक्क सर्वांहून जास्त आहे. जे हा हक्क नाकबूल करतात त्यांनां त्याचें फळ मिळाल्याशिवाय रहात नाहीं. एक गाथाकार कवि आपणांस आपल्या गुणांमुळें दहा सबर घोड्या व एक उंट मिळाला असल्याचें वर्णन करतो, पण हें सर्व मझ्दास अर्पण करण्याचा आपला निश्चय प्रकट करतो. वेदांतील ठिकठिकाणीं आढळणारा दानस्तुतीचा प्रकार गाथांत सांपडत नाहीं. आपण सद्धर्माचा मार्ग दाखवून लोकांनां सुख प्राप्त करून देत असल्यामुळें सुस्थितींत असणार्या लोकांस जें कांहीं मिळतें त्याचा हिस्सा घेण्याचा आपणांस हक्कच आहे असें गाथाकार समजतात. परंतु असले स्वार्थपरिप्लुत विचार गाथांत फारच थोड्या ठिकाणीं आढळतात. गाथांत जिकडे तिकडे गाथाकारांचा धर्मप्रसारासंबंधीं उत्साह व्यक्त झालेला आहे. एका स्फूर्तिमय उतार्यांत कवि म्हणतो :-
''मी आतां भविष्य कथन करतों. सगळेजण लक्षपूर्वक ऐका ! मी आतां सर्वज्ञाता मझ्द अहुर यानें मला जें सांगितलें तें सांगतों. जो हें माझें वचन पाळील त्याच्याकडे हौर्वतात, अमरेतात व खुद्द मझ्द अहुर येतील.''