प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
प्रांत - पहिल्या दरायसनें इराणी राज्याच्या पंचवीस क्षत्रपी म्हणजे मोठाले प्रांत करून प्रत्येक प्रांतावर एक एक 'देशपाल' (क्षत्रपावन) नेमिला. प्रत्येक क्षत्रपीचे कित्येक पोटविभाग केलेले असत. क्षत्रप हा आपल्या प्रांताच्या कारभाराचा मुख्य अधिकारी असे. तो कर बसवी, कायद्याचें नियमन करी, रस्ते व मालमत्ता यांच्या सुरक्षितपणाबद्दल जबाबदार असे, व आपल्या हाताखालच्या जिल्ह्यांवर देखरेख ठेवी. राज्यांतील मोठ्या लष्करी ठाण्याचे अधिकारी व राजकीय किल्ल्याचे अधिपती यांच्यावर क्षत्रपाचा अधिकार चालत नसे; तथापि क्षत्रपास स्वतःचें सैन्य ठेवण्याचा अधिकार होता. 'राजनेत्र', प्रांतांतील पर्शियन लोकांचें मंत्रिमंडळ व सेना या सर्वांचा क्षत्रपावर अखत्यार चालत असे. राजाची सरकारी डाक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणीं पाठविण्याकरितां जासुदांची व्यवस्था केलेली असून मोठमोठ्या रस्त्यावर डाकेचीं ठाणीं ठेवलीं होती.