प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
प्राचीन इराणच्या इतिहासाचीं साधनें :- इराणी लोकाचा इतिहास आपणांस संपूर्ण द्यावयाचा म्हणजे पर्शुभारतीय कालापासून सुरुवात केली पाहिजे. पर्शुभारतीय कालापासून हिरोडोटसनें उल्लेखिलेल्या सायरस किंवा कुरुसपर्यंत इतिहास अज्ञात आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. फर्दुसीनें शहानाम्यांत दिलेल्या प्राचीन कथा व पारशांचे धर्मग्रंथ एवढेंच त्या कालाविषयीं साहित्य आहे. जर इराणमध्यें पुराणवस्तुसंशोधनपर सुसंघटित पहाणी झाली तर तेथें कदाचित् बरेंच भौतिक अवशेषरूपी साहित्य सांपडण्याचा संभव आहे. या पर्शुभारतीय कालापासून सायरसपर्यंत पसरणार्या दीर्घ कालांतील इतिहास इतका तुटकलेला आहे कीं, त्यास जोडणारे धागेहि फारसे शिल्लक नाहींत. आज जो इतिहास म्हणून आपल्यापुढें मांडला जातो त्यांतील अत्यंत प्राचीन नांव अझिदहक हें होय. त्याचा अहिदास शब्दाशीं संबंध स्पष्ट आहे, आणि तो संबंध पर्शुभारतीय काल व सायरसच्या पूर्वीचा ऐतिहासिक कथाकाल यांतीलच केवळ नव्हे, तर आजच्या लोकवस्तीपैकीं एका जातीच्या नांवाशीं संबंध जोडणारा दुवा आहे. इराणाच्या इतिहासाच्या स्थूल मांडणीसाठीं इराणांतील वसाहतकालाच्या पूर्वीपासून सुरुवात केली पाहिजे.