प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पांचवा बहराम गोर - परंतु या मुलांपैकीं बहिराम पांचवा यानें मोघिर नांवाच्या एका अरबी संस्थानिकाच्या मदतीनें गादी मिळविली, व आपल्या बापाचें संप्रदायविषयक धोरण सोडून देण्याचें इराणी वचन देऊन लोकप्रियता संपादन केली. आतां ख्रिस्ती लोकांचा पुन्हां छळ होऊं लागून त्यामुळें रोमशीं युद्ध उपस्थित झालें. परंतु इराणी राजाचा पराभव होऊन ४२२ मध्यें तह झाला. या तहान्वयें इराणी राज्यांत ख्रिस्ती लोकांनां व रोमन राज्यांत इराणी लोकांनां आपआपला धर्म पाळण्याची मुभा मिळाली. परंतु बहरामचा मुलगा दुसरा येझ्देगर्द (४३८-४५७) यानें ख्रिस्ती लोकांचा छळ करणें पुन्हां सुरू करून रोमशीं तंटा उपस्थित केला. याशिवाय इराणला श्वेतहूण नांवाचे नवीनच शत्रू उत्पन्न झाले.