प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पहिला शापुर - अर्देशिर यानें आपल्या कारकीर्दीच्या शेवटीं या प्रदेशावर पुन्हां नव्यानें चाल केली, व त्याचा मुलगा पहिला शापुर (२४१-२७२) यानें निसिबिस व करी हे प्रदेश काबीज करून सिरियांत प्रवेश केला. परंतु तिसरा गॉर्डीअन या रोमन बादशहानें २४३ मध्यें त्याचा पराभव केला. तथापि पुढें लवकरच रोमन साम्राज्यास उतरती कळा लागली व या गोष्टीचा फायदा घेऊन शापुरनें आर्मीनिया घेतला, ॲटिऑक् शहर लुटलें व वहालेरिअन रोमन बादशहाचा इडेसा येथें पराभव करून (२६०) त्याला कैद केलें. यानंतर इराणी सैन्यानें कॅप्पाडोशियावर चाल केली, परंतु येथून त्यांनां मागें हटावें लागलें. ही संधि साधून पॅल्मायराच्या राजानें बंड करून शापुरचा पराभव केला व दोन वेळ (२६३-२६५) टेसिफॉनवर चालून आला. या पराभवामुळें झालेलें नुकसान शापुरला शेवटपावेतों भरून काढतां आलें नाहीं व आर्मीनिया देशहि त्याला ताब्यांत ठेवतां येईना. सारांश सस्सन साम्राज्याचा विस्तार आर्सेसिडी साम्राज्याइतकाच होता. तरी देखील पहिल्या शापुरनें 'इराणी व इराणी नसलेल्या लोकांचा शहानशहा' अशी पदवी धारण करून आपला आसमुद्रक्षितीशत्वाचा हक्क प्रगट केला. त्याच्या वारसांनींहि ही पदवी पुढें धारण केली; परंतु मेसापोटेमियाच्या वाळवंटापर्यंतचा तैग्रिस व युफ्रेटीस या नद्यांमधील प्रदेशच फक्त या साम्राज्याच्या अंमलाखाली होता. पश्चिम व उत्तर मेसापोटेमिया रोमन लोकांच्या ताब्यांत होता.

संघटना - अवेस्तामधील अहुरमझ्द नांवाच्या देवतेपासून प्राप्‍त झालेल्या ''बादशाही वैभवा'' चा सस्सन राजा हा प्रतिनिधी समजला जात असे. यामुळेंच सस्सन व ॲकिमेनिड राजे आपणांस ईश्वर म्हणवून घेत असत. राजाला व्यक्तिविषयक महत्त्व नव्हतें; एका राजाला काढून दुसरा राजा गादीवर वसवितां येत असे. परंतु राजवंशांतील औरस संततीशिवाय कोणालाहि कायदेशीरपणें राज्यपद मिळविण्याची आशा नव्हती. म्हणूनच तद्देशीय दंतकथांमध्यें सस्सन राजांची उत्पत्ति ॲकिमेनिड वंशापासून व पौराणिक काळांतील राजांपासून झाली असल्याचें वर्णन आहे.

राजा हा सर्वसत्ताधीश मानला जातो व ईश्वरोपदिष्ट व कायदयांत निविष्ट केलेली अशी राजाची इच्छा हीच 'कर्तुमकंर्तु' समजली जाते. राजे लोक टेसिफॉन येथील सिंहासनावर मोठ्या वैभवानें बसून राज्य करीत असत. राजाच्या नुसत्या मान डोलवण्यावर प्रत्येक मनुष्याचा जानमाल अवलंबून असे. राजा म्हणजे सर्व राज्यांत सर्वांत सुंदर, शस्त्रें वापरण्यांत अत्यंत तरबेज असा पुरुष मानला जात असे. इतकेंच नव्हे तर प्रत्येक धार्मिक चाल अथवा सद्गुण यांची उत्पत्ति राजापासूनच झाली पाहिजे. तथापि ॲकिमेनिड राजांप्रमाणें सस्सन राजे सर्वसत्ताधीश नव्हते. यांनां आपल्या राज्यांतील जमीनदार सरदारांचें वर्चस्व कमी करतां येत नसे. विशेष महत्त्वाची गोष्ट ही होती कीं, सस्सन राजांनां ॲकिमेनिड राजांप्रमाणें 'जगाच्या साम्राज्यावर आपला हक्क शाबीत करतां आला नाहीं. या राजांचें सैन्यबल केवळ त्यांच्या ताब्यांतील प्रांताच्या बचावापुरतेंच होतें. नवीन देश काबीज करण्यास लागणारें सैन्य पगार देऊन ठेवण्याची त्यांची ऐपत नव्हती. राज्यांतील जमीनदार सरदारांनीं पुरविलेल्या सैनिकांचें बनलेलें सैन्य या राजाजवळ असे. परंतु अशा प्रकारचें सैन्य बराच काळपर्यंत एकसारखें लढाईंत गुंतवून ठेवतां येणें शक्य नसल्यामुळें या राजांनां रणांगणावर मोठाले विजय तर मिळवितां येत नसतच, पण कधीं कधीं त्यांचा अगदीं पराजयहि होत असे.