प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पहिला सिल्यूकस निकेटार व पहिला अँटायोकस - सिल्यूकसनें इराण ताब्यांत घेतल्यामुळें हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील प्रदेशासाठीं तो व चंद्रगुप्‍त मौर्य यांच्यामध्यें लढा उत्पन्न झाला. अखेरीस सिल्यूकसनें पांचशें हत्ती व इतर देणग्या घेऊन हे प्रांत व सिंधुनदीच्या पश्चिमेकडील सरहद्दीचे प्रांत चंद्रगुप्ताला दिले. यानंतर सिल्यूकसनें अँटिगोनसचें उच्चाटन करण्याच्या कामीं लायसिमाकस, टॉलेमी व कॅसँडर यांनां मदत करण्याकरितां पश्चिमेकडील प्रदेशांत स्वारी केली.