प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग.

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

बॅक्ट्रिया व पार्थियामधील स्वतंत्र राज्यें - ख्रि. पू. २८२ मध्यें लायसिमाकसवर स्वारी करून सिल्यूकसनें त्याचें आशियामायनर व थ्रेसमधील राज्य खालसा केलें. २८१ मध्यें सिल्यूकस मारला गेला व त्याचा मुलगा पहिला अँटायोकस हा या अवाढव्य राज्याचा मालक झाला. इजिअन समुद्रापासून सिंधु नदीपर्यंत पसरलेल्या त्याच्या राज्यांत सर्वत्र शत्रूला हल्ला करतां येण्यासारखीं ठिकाणें होतीं. सिल्यूकसच्या मृत्यूनंतर या राज्यांत केव्हांच शांतता नव्हती. लॅगिडी लोक व अँट्रोपाटीन, आर्मीनिया, कॅप्पाडोशिया, पाँटस, बिथिनिआ, गालेशन्स, पर्गामम, ऱ्होडस् व सरहद्दीवरील इतर लहान लहान ग्रीक संस्थानें या राज्याचें सामर्थ्य कमी करण्याचा हरएक प्रयत्‍न करीत असत. शिवाय ग्रीक सुधारणा वाढल्यामुळें असंख्य स्थानिक संस्थानें निर्माण झाली होतीं, व हीं सर्व पूर्ण स्वातंत्र्य संपादन करण्याकरतां एकसारखीं धडपडत होतीं. यामुळें सिल्यूकिडी राजांनां आपलें अस्तित्व कायम राखण्याकरितां नेहमीं लढावें लागत असे. दुसर्‍या अँटायोकसच्या वेळीं (२६४-२४७) सिल्यूकिडी राज्यास दुसर्‍या टॉलेमीपासून त्रास झाला. बॅक्ट्रियामधील ग्रीक लोकांनीं डायोडोटस नांवाच्या आपल्या सुभेदाराच्या नेतृत्वाखालीं बंड करून हिंदू कुशपर्वताच्या उत्तरेस स्वतंत्र राज्य स्थापिलें. इतर प्रांतांत देखील बंडें झालीं व पार्नी अथवा अपार्नी नांवाच्या कास्पिअन समुद्राच्या पूर्वेकडील मैदानांत राहणार्‍या इराणी भटक्या लोकांच्या आर्सेसीझ नांवाच्या नायकानें पार्थिया जिल्ह्यामध्यें स्वतंत्र राज्य स्थापिलें (ख्रि. पू. २४८).