प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
नगरसंस्थानें - नगरसंस्थानांची घटना वरच्या पेक्षां निराळीच होती. फिनीशियांतल्या संस्थानाप्रमाणें कांहीं राजसत्ताक होती व लिशिआंतल्याप्रमाणें कांहीं संस्थानांत उमरावांचें प्रभुत्व होतें, व ग्रीक शहरांप्रमाणें कांहीं संस्थानें प्रजासत्ताक असून त्यांत मंत्रिमंडळें व सार्वजनिक मंडळें असत. मुख्य मुद्दा हा होता कीं, या लोकांची स्वतंत्र स्वायत्त राज्यघटना होती. परंतु हा प्रकार फक्त पश्चिमेकडील ग्रीक, फिनिशियन व लिशिअन प्रांतांतच दृष्टोत्पत्तीस येत होता. पूर्वेकडील शहरें पश्चिमेकडील शहरांहून भिन्न होतीं. ग्रीक लोकांच्या दृष्टीनें हीं शहरें म्हणजे केवळ मोठमोठीं खेडींच होती. एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवला म्हणजे त्यांतील लोक आपल्या विश्वासांतील एखाद्या इसमाकडे राज्यकारभार सोंपवीत व तोच माणूस पुढें जुलमी बने. फक्त मार्डोनिअसनेंच आयोनियनांचें (यवनांचें) बंड मोडल्यावर लोकसत्तात्मक पद्धतीनें राज्य करण्याचा प्रयत्न केला होता (ख्रि. पू. ४९२).