प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
दुसरा मिथ्राडेटीझ व त्याच्या मागून झालेले राजे - या लढाया चालू असतां इकडे पूर्व इराणांत मोठ्या घडामोडी झाल्या. चिनी लोक ज्यांनां युएचीं व ग्रीक लोक सिथियन म्हणत अशा मांगोल लोकांच्या १५९ जातींनीं सॉग्डिएनामध्यें प्रवेश करून १३९ मध्यें बॅक्ट्रिया देश काबीज केला. बॅक्ट्रियांतून त्यांना पुढें इराणांत व हिंदुस्थानांत शिरण्याचा यत्न केला. सातव्या अँटायोकसशीं दोस्ती करून त्यांनीं पार्थियन राज्यावर हल्ला केला. दुसरा फ्राएटीझ व त्याच्यामागून गादीवर बसलेला त्याचा चुलता पहिला आर्टाबेनस (१२७-१२४) हे दोघेहि सिथियन लोकांशीं लढतांना पराभव पावून ठार झाले; परंतु त्याचा पुत्र दुसरा मिथ्राडेटीझ (१२४-८८) यानें सिथियन लोकांचा पराभव करून कांहीं काळ आर्सेसिडींची सत्ता पुन्हां प्रस्थापित केली. त्यानें आर्मीनियाचा राजा आर्टाव्हॅसडीझ याचाहि पराभव करून तो ७० खोरीं देईपर्यंत त्याच्या ओलीस ठेवलेल्या टायग्रेनीझ नामक पुत्राची मुक्तता केली नाहीं. टायग्रेनीझनें कॅप्पाडोशियावर स्वारी केली व रोमन अधिकारी कॉर्नेलिअस सल्ला हा त्यावर चालून आला तेव्हां मिथ्राडेटीझनें रोमशीं पहिला तह केला (ख्रि. पू. ९२). यानंतर मिथ्राडेटीझ लवकरच मरण पावला व त्याच्या मृत्यूमुळें आर्सेसिडी सत्ता पुन्हां दुसर्यानें नष्ट झालीं. पश्चिमेकडील प्रांत व पश्चिम आशियांतील सत्ता आतां आर्मीनियाच्या टायग्रेनीझच्या हातीं गेलीं. याच वेळीं सिथियन लोकांबरोबरहि नवीन निकराचें युद्ध सुरू झालें. याच काळांतल्या पार्थियन राजांच्या नाण्यांवर जरी त्यांच्या कित्येक यशस्वी मोहिमांचा उल्लेख सांपडतो, तरी ख्रि. पू. ७६ मध्यें सिथियन लोकांनीं सॅनाट्रुसीझ नांवाच्या एका वयाचीं ऐशीं वर्षे उलटून गेलेच्या पार्थियन राजाला गादीवर बसविलें या गोष्टींवरून या काळांतील अंदाधुंदीची कल्पना होते. सॅनाट्रुसीझच्या पूर्वीच्या राजांची नांवें माहीत नाहींत. सॅनाट्रुसीझच्या मागून तिसरा फ्राएटीस (७०-५७) गादीवर येईपर्यंत या राज्यांत शांतता प्रस्थापित झालेली दिसत नाही.