प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

धर्मसुधारकांचें अदृश्य शक्तिमूलक बल - नवीन उत्पादन आणि जुन्याचा अभ्यास यांचा एकमेकांशीं पुष्कळदां विरोध असतो. जो जें कांहीं नवीन उत्पादितो त्यानें उत्पादन केलेल्या मालाचा संचय बनला म्हणजे त्याचा अभ्यास करून बनलेला पंडितवर्ग तयार होतो. धार्मिक सुधारणा करणारे लोक पुष्कळ प्रसंगीं जुन्या परंपरेच्या अभ्यासकांपासून फूटून बाहेर पडतात. आणि जुनी विचारपरंपरा जर आपण सोडली तर ती सोडण्यास आपणांस आधार त्या शक्तीच्या बरोबरीचा किंवा त्याहून उच्च प्रकारचा आहे असें त्यांस भासवावें लागतें. माझे शब्द पूर्वपरंपरागत पंडितांपेक्षां किंवा पूर्वीच्या वचनांपेक्षां अधिक किंमतीचे कां आहेत तर ते मला परमेश्वरानें प्रत्यक्ष सांगितले म्हणून, माझें दळण वळण खुद्द देवाशीं किंवा निदान देवदूतांशीं आहे असें त्यास भासवावें लागतें. आणि या पद्धतीमुळें पांडित्यांत कमी परंतु धूर्ततेंत किंवा खर्‍या शहाणपणांत अधिक अशा लोकांस पुढें येण्यास वाव मिळतो. जेव्हां अदृष्ट शक्ति, दिव्य दृष्टि किंवा प्रत्यक्ष देवतेशीं संबंध मनुष्य स्थापूं लागतो, तेव्हां त्याच्यापुढें पांडित्य काय उपयोगी पडणार ! ॠषी, किंवा यहुदी लोकांतील प्रवक्ते (प्रॉफेट्स) यांचें महत्त्व असल्यास पद्धतीनें उत्पन्न झालें आणि त्याच कारणामुळें रासपुतीन योग्यतेस चढला. प्रवक्तयास जसा परमेश्वराकडून संदेश येई तसा रासपुतीनला सेंट अँथनीकडून संदेश आला होता. प्राचीन काळची परमेश्वरी संदेश मनुष्यास आणण्याची कृति म्हणजे ज्यास आपण अंगांत येतें म्हणतों ती होय. अंगांत आल्यानंतर मनुष्य कांहीं उच्च तर्‍हेचीं वाक्यें बोलूं लागतो; व त्या भरांत साहजिकपणें असाध्य अशा कृती करूं लागतो. आणि त्यावरून सामान्य लोकांची अशी समजूत होते कीं, याच्या अंगांत कोणी तरी उच्च प्रकारच्या व्यक्तीनें संचार केला असावा. आमचे मानसशास्त्रवेत्ते कदाचित् याचें स्पष्टीकरण निराळ्या प्रकारें देतील. संचरण्याचें महत्त्व आपल्या लोकांत अजूनहि आहे. घागरी फुंकल्यानंतर जी बाई फुंकतां फुंकतां अर्धवेडी होते तिच्या अंगांत देवी संचारली आहे असें लोक समजतात; व तिला अनेक भविष्यात्मक प्रश्न विचारूं लागतात. अंगांत येऊन मनुष्य जीं वाक्यें वदतो त्या प्रकारच्याच क्रियेनें कुराण उत्पन्न झालें आहे असें मुसुलमान लोक समजतात; आणि त्यास ते प्रकटीकरण मानतात. सामान्य लोकांवर असल्या प्रकारच्या व्यक्तींचा व त्यांनीं उद्‍गारलेल्या शब्दांचा परिणाम बराच महत्त्वाचा होतो. वैधधर्मापेक्षां कांहीं नवीन विचारसंप्रदायांस प्राधान्य मिळावयाची जी क्रिया निरनिराळ्या राष्ट्रांत झाली ती क्रिया होत असतां असल्या प्रकारच्या संचाराचाच आश्रय यप्रवक्तयांस घ्यावा लागला. झरथुष्ट्र याचा परमेश्वराशीं निकट संबंध होता, असे इराणी ग्रंथांत वारंवार दाखविलें आहे. येशू ख्रिस्तहि तसेंच प्रतिपादी आणि महंमदहि तसेंच प्रतिपादित असे. बुद्ध किंवा महावीर यासंबंधानें तसें म्हणतां येणार नाहीं. परंतु ते ध्यानादि क्रिया हें उच्च ज्ञानसाधन आहे आणि तें त्यांचें ज्ञानसाधन आहे असें प्रतिपादित. या प्रत्येकांचा परंपरागत वैधधर्माशीं झगडा होता असें म्हणण्यास हरकत नाहीं. यांमध्यें येशू ख्रिस्ताविषयीं थोडेंसें निराळें मत दिलें पाहिजे. येशू ख्रिस्ताचा झगडा केवळ धार्मिक विधींशीं नसून त्याचा हेतु राजकीय असावा असें वाटतें. यहुद्यांतील मेसायाची कल्पना राजकीय आहे व होती. रोमच्या सत्तेखालीं यहुदी राष्ट्र असतां यहुद्यांचें लक्ष स्वत्वस्थापनेकडे होतें; आणि त्या वेळेस यहुदी लोकांमधील स्वत्वस्थापक वर्ग जुन्या वैधपरंपरेस चिकटून होता. मकाबीनीं बंड उभारलें त्या वेळेस ते फारासी (वैधधर्माचा पक्ष) वर्गाला चिकटून होते. परंतु येशू ख्रिस्तानें राजकीय व धार्मिक सुधारणा एकदमच करण्याचें मनांत आणलें; आणि त्यांतल्या त्यांत तो ब्राह्मणेतराचा मुलगा म्हणून त्यास दोन्ही सुधारणा करतांना एकहि सुधारणा करतां आली नाहीं. नंतर जेव्हां हा धर्म बिघडवितो असा जुन्यांनीं आरोप केला आणि त्याच्याविरुद्ध फिर्याद केली तेव्हां ख्रिस्ताला रोमन अधिकार्‍यांनीं केवळ 'तुमच्याच' लोकांच्या आग्रहाकरितां म्हणून क्रूसीं दिलें, असें ख्रिस्ताचें भोंवतालच्या काव्याची छाटाछाट केली असतां चरित्र सांपडेल. मला येथलें राज्य नको असून मला राज्य पाहिजे तें निराळेंच आहे अशा तर्‍हेची भाषा येशू बोले हें खरें. ही भाषा परक्या न्यायाधिशापुढें जावें लागणार्‍या आम्हां जिंकलेल्या राष्ट्रांतील लोकांस सहज समजण्यासारखी आहे. येशूचा प्रयत्‍न पोरकट बुद्धीनें आणि पोरकट साहित्यावर राज्यस्थापना करण्याचा होता आणि त्याचा धर्महि त्याच जातीचा तयार झाला होता, आणि तो प्रथम यहुदी लोकांकरितांच होता. येशू मेल्यानंतर जेव्हां पॉलच्या हातीं संप्रदायपौरोहित्य आलें तेव्हां या कसलेल्या भिक्षुकानें येशूच्या मिशनचा जिंकणार्‍यांच्या राजधानींत कसा प्रसार होईल या दृष्टीनें येशूच्या मताचें रूपांतर केलें; आणि त्या संप्रदायाचें स्वरूप अधिक आध्यात्मिक प्रकारचें बनविलें. असो.

ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार प्रथमतः ग्रीकांमार्फत आणि नंतर रोमन लोकांमार्फत झाला.

बौद्ध संप्रदायाचें व जैनांचें येथें वर्णन करण्याचें कारण नाहीं. पुढें भारतांतील बौद्धिक परिस्थितीचा इतिहास अधिक व्यापक रीतीनें मांडलाच आहे. वैदिक धर्म, बौद्ध संप्रदाय, पर्शूंचा पैतृक धर्म झरथुष्ट्र संप्रदाय, सेमिटिक लोकांचा पैतृक धर्म आणि त्यांतून निघालेली यहुदी प्रवक्तयांची परंपरा व ख्रिस्ती व इस्लामी संप्रदाय यांचा एकमेकांशीं संबंध, युध्दें किंवा त्यांचें संमीलन करण्याकरितां झालेले प्रयत्‍न, हा बुद्धापासून एक हजार वर्षांचा बौद्धिक इतिहास होय. संमीलनार्थ प्रयत्‍न एकच झालेला दिसतो. आणि तो प्रयत्‍न म्हटला म्हणजे मणिसंप्रदाय हा होय. या संप्रदायाचीं तत्त्वें वगैरे देण्यापूर्वी त्याचा ज्या प्रदेशांत उगम होऊन प्रसार झाला त्या प्रदेशांतील लोकांची पारमार्थिक वृत्ति कशा प्रकारची होती हें समजून घेतलें पाहिजे. यासाठी इराणांतील संप्रदायपद पावलेला असा जो झरथुष्ट्री पंथ त्याचें प्रथम थोडक्यांत पर्यालोचन करूं.