प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

दुसरा शापुर व ख्रिस्ती लोकांचा छळ - रोमन राज्य ख्रिस्ती संप्रदायानुयायी झालें त्यामुळें मेसापोटेमिया व बाबिलोनिया या देशांतील सिरो-ख्रिस्ती लोक नास्तिक सस्सन लोकांची सत्ता झुगारून देण्याच्या कामीं रोमन लोकांच्या मदतीची अपेक्षा करूं लागले. आर्मीनियांतील राजाला २९४ मध्यें ख्रिस्ती संप्रदायाची दीक्षा मिळाली. यामुळें सस्सन राजांनां झरथुष्ट्री पंथास जोरानें पाठिंबा द्यावा लागला. दुसर्‍या शापुरच्या वेळीं अवेस्ता ग्रंथ पुरा होऊन इतर सर्व संप्रदाय बेकायदेशीर ठरविण्यांत आले. झरथुष्ट्री पंथ सोडणारास देहांत शासन होत असे; व विशेषतः ख्रिस्ती संप्रदायानुयायांचा छळ होत असे. सारांश, रोमन व सस्सन राजांमधील युद्धाबरोबर ख्रिस्ती व झरथुष्ट्री या दोन संप्रदायांमध्येंहि युद्ध जुंपले.

अशा स्थितींत लढाई टाळणें शक्य नव्हतें. इ.स. ३३७ मध्यें शापुरनें लढाई सुरू करून आमायडा (३५९), सिंगारा (३६०) वगैरे किल्ले घेतले. या युद्धास दर वर्षी पुन्हां पुन्हां तोंड लागत असे (३५३-३५८). ३६३ मध्यें जूलिअन नांवाच्या रोमन बादशहानें इराणी राज्यावर स्वारी करून टेसिफॉनवर चाल केली, परंतु तो स्वतःच जखमी होऊन मरण पावला. त्याच्या मागून जोव्हिअनला इराणशीं तह करावा लागला (३६३). या तहानें रोमनें तैग्रिसचा प्रदेश, निसिबिसचा किल्ला व आर्मीनिया सस्सन राजास देऊन आपल्या आश्रयाखालच्या तिसर्‍या आर्सेसीझ नांवाच्या आर्सेसिडी राजास इराणी लोकांच्या स्वाधीन केलें.

शापुरनें आर्मीनिया पादाक्रांत करण्याचा व त्या देशांत झरथुष्ट्रपंथाचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न केला. त्यानें तिसर्‍या आर्सेसीझला आत्महत्त्या करावयास लावलें. परंतु आर्मीनियन सरदारांनीं बंड करून आर्सेसीझचा मुलगा पॅप यास गादीवर बसविलें; व रोमन लोकांची गुप्‍तपणें मदत घेतली. यामुळें रोमशीं पुन्हां युद्ध उपस्थित झालें; परंतु ३७४ मध्यें व्हेलेन्झ या रोमन बादशहानें पॅपचा टार्ससमध्यें खून करविला. ३७५ मध्यें व्हेलेन्झ हा ऑड्रिआनोपल येथें गॉथ लोकांशीं झालेल्या लढाईंत मारला गेला. यानंतर रोमन लोकांची ढवळाढवळ बंद झाली. चौथा बहिराम व थीओडोशिअस यांमध्यें ३९० मध्यें तह होऊन आर्मीनियाचा अगदीं पश्चिमेकडचा भाग रोमन लोकांनां व बाकीचा इराणी लोकांनां देण्यांत आला. ४०८ मध्यें पहिल्या येझ्देगर्दनें दुसरा थीओडोशिअस या रोमन बादशहाशीं दोस्ती केली. यानंतर लागलीच इराणी लोकांनीं आर्सेसीझच्या घराण्यांतील शेवटचे राजे आर्मीनियांतून घालवून दिले (४३०), व या देशाचा एक इराणी प्रांत बनवून त्यावर एका मर्झबानची नेमणूक केली. तथापि येथें झरथुष्ट्री संप्रदायाचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला नाही; कारण ख्रिस्ती संप्रदायाची पाळेंमुळें येथें फार खोल गेली होतीं. रोमन लोकांनीं पक्ष सोडल्यामुळें आर्मीनियांतील ख्रिस्ती लोकांनीं रोमची पुराण मतें सोडून नवीनच पंथ काढला.