प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
तिसरा अँटायोकस - या राजानें आपल्या कारकीर्दीच्या आरंभी (ख्रि. पू. २२०) मीडियाच्या क्षत्रपाचें बंड मोडलें, नंतर अँट्रोपाटीनच्या राजावर चढाई करून त्यास तह करावयास लावलें व आशिया मायनरमधील बंडाचें निर्मूलन करण्याकरितां पूर्वेकडील प्रदेशांत मोठी मोहीम केली. त्यानें आर्मीनियाच्या राजाला विश्वासघातानें पदच्युत करून तेथें दोन सुभेदार नेमिलें, मीडियाचा बंदोबस्त केला आणि पार्थियाचा आर्सेसीझ व बॅक्ट्रियाचा युथिडेमस यांच्यावर जय मिळवून त्यांच्याशीं तह केला. त्याचप्रमाणें त्यानें हिंदुस्थानच्या राजाशीं दोस्ती केली; कार्मोनिआ, पर्सिस व बाबिलोनिया या प्रदेशांत बादशाही अंमल पुन्हां प्रस्थापित केला; व २०५ मध्यें तैग्रिसच्या मुखापासून अरबी आखातांतून अरबस्थानांतील गेर्हा (अर्वाचीन बारेन) शहरापर्यंत जलपर्यटन केलें.