प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

क्रॅसस व अँटोनिअस यांशीं युध्दें - पार्थियन लोक व रोमन लोक यांच्यामध्यें ज्या लढाया झाल्या त्यांनां सुरुवात प्रथम रोमन लोकांकडूनच झाली होती. नाइलाजानें रोमन लोकांनां अलेक्झांडरनें काबीज केलेले देश राज्यांत सामील करावे लागले. पाँपीच्या काळापासून त्यांनीं युफ्रेटीझ नदीपर्यंतचा ग्रीक प्रदेश निश्चितपणें आपल्या राज्यास जोडला होता. व नंतर त्यांनां युफ्रेटीझ नदीपासून सिंधुनदीपर्यंतचा सर्व पूर्वेचा देश आपल्या राज्यास जोडावा लागला. रोमन सत्ताधारी सरदारांचें मत या खालसा करण्याच्या पद्धतीविरुद्ध होतें; परंतु क्रॅसससारख्या महत्त्वाकांक्षी वीरास पार्थियन राजांच्या यादवीचा फायदा घेऊन पार्थियन राज्यावर चढाई केल्यावांचून राहवेना (ख्रि. पू. ५४). क्रॅसस करीच्या लढाईंत मारला गेला (ख्रि. पू. ५३). मेसापोटेमिया देश पार्थियन राजानें मिळविला; परंतु रोमन राज्यावर स्वारी या वेळीं अगर सीझर व पाँपीमधील यादवीच्या वेळीं देखील करण्यांत आली नाहीं. पार्थियन लोकांनीं ब्रूटस व कॅशिअस यांशीं तह केला. परंतु कांहीं फायदा झाला नाहीं. ख्रि. पू. ४० मध्यें पार्थियन सैन्यानें सिरिया व आशिया मायनर या देशांवर हल्ला केला; परंतु मार्क अँटनीनें ख्रि. पू. ३८ मध्यें गिंडारस येथें त्यांचा मोड केला; नंतर ख्रि. पू. ३६ मध्यें पार्थियनांवर अँटनीनें हल्ला केला; परंतु चौथ्या फ्राएटीझ या पार्थियन राजानें त्याचा पराभव करून त्याला मागें हटविलें. ख्रि. पू. ३४ मध्यें आर्मीनियाच्या राजाला विश्वासघातानें मारून अँटनीनें आर्मीनिया देश घेतला.