प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
एतद्विषयक आलबर्ट जे. एडमंड्सचा अभ्यास - सेडेलनें अपुर्या साधनांनिशीं - कारण त्याच्या वेळीं बौद्ध वाङ्मयाची माहिती अगदींच अपुरी होती- जो प्रश्न हाती घेतला होता, तो बौद्ध व ख्रिस्त संप्रदायग्रंथांतील सादृश्य विलोकनाचा प्रश्न पुढें पाली व संस्कृत ग्रंथांच्या बर्याच बिनचूक माहितीच्या आधारावर आलबर्ट जे. एडमंड्स या अमेरिकन गृहस्थानें पुन्हां हातीं घेतला. तो प्रथमच असें स्पष्ट सांगतो कीं, ख्रिस्ती पवित्र ग्रंथांनां बौद्ध ग्रंथ आधारभूत आहेत हें ठरविण्याच्या प्रश्नाशीं मला कांहीं कर्तव्य नसून ते दोन संप्रदाय परस्परांनां अधिक चांगले समजावे म्हणून मी त्यांची तुलना करणार आहें. अशा रीतीनें कोणत्याहि प्रकारचा पूर्वग्रह न ठेवतां विचार करणार्या एडमंडसचा देखील, ख्रिस्ती धर्म अधिक सारसंग्राहक असल्यानें त्यानें बौद्धधर्माची मदत घेतली होती, आणि सेंट ल्यूकला विशेषतः बुद्ध-महाकाव्याची माहिती होती, या मताकडे कल आहे. परंतु या दोन्ही वाङ्मयांतून अत्यल्प सादृश्य असलेल्या उतार्यांसुद्धां एकंदर सर्व सादृश्यांचा जो एडमंडसनें संग्रह केला आहे त्यावरून असें स्पष्ट दिसतें कीं, या चार शुभवर्तमानांत कोठें कांहीं उसनें घेतलें आहे असें गृहीत धरण्यास चांगलें आधारभूत असें एकहि स्थल नाहीं. बहुतेक उतार्यांत फक्त कल्पनासादृश्यच काय तें आढळतें; पण तेवढ्यावरून या दोन वाङ्मयांचा परस्परसंबंध असल्याची कल्पना करणें योग्य नाहीं. अगदीं उत्तम उदाहरणांच्या बाबतींत मात्र परस्पर परिणामाची शक्यता कबूल करावी लागते; आणि त्यांपैकीं कांहीं थोड्या उदाहरणांत ही शक्यता विशेष संभवनीय दिसते. तथापि पुष्कळ वेळां खुद्द एडमंडसनें केलेल्या ग्रंथांच्या तुलनेवरूनच असें दिसतें कीं, सारखेपणापेक्षां त्यांत फरकच पुष्कळ आहे.