प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
इराणी लोक व ''आर्यन'' हिंदू लोक - इराणी लोक पूर्वेकडून आले असावेत हें त्यांच्या हिंदुस्थानांतील लोकांशीं असलेल्या निकट संबंधावरून ठरविण्याचें धाष्टर्य कांहीं लेखक करतात (ब्रिटानिका ११ वी आवृत्ति पर्शिया शब्द पहा). कोणाच्या मतें काळा व कास्पियन या समुद्रांच्या उत्तरेस दक्षिण रशियांतून तुराण (तुर्कस्थान) व ऑक्सस आणि जक्झार्टीस नद्यांपर्यंत पसरणार्या मोठ्या डोंगरसपाटीवर, तर कोणाच्या मतें उत्तर ध्रुवकक्षेंत यांचें मूलस्थान असलें पाहिजे. कॉकेशसच्या आसपास यांचें मूलस्थान ठरविणारे असें कारण देतात कीं येथें इराणी जातींचे अवशेष वारंवार सांपडतात. हिरोडोटसच्या ग्रंथांत आढळून येणारीं दक्षिण रशियांतील सिथिअन (स्कोलोटी) लोकांचीं नांवें व शब्द अगदीं उघडपणें इराणी शब्दांपासून बनलेले आहेत हें झिअस व मुलेनहॉफनें दाखविलें आहे. तुराणच्या लुटारू जाती याच वंशांतील आहेत. यांनां तेथील शेतकरी वर्ग 'दाह' असें म्हणतात; आणि त्या शब्दाचा अर्थ शत्रु किंवा चोर आहे असेंहि समजतात. आमच्या मतें हे वैदिक ''दास'' शब्दाचें रूपांतर असावें. दास आणि दस्यु हे शब्द केवळ भारतीय नसून पर्शुभारतीय असावें. दास शब्दानें हिंदुस्थानांतील द्राविडी वंशाचा बोध होत नाहीं, असें तिसर्या विभागांत सांगितलेंच आहे. याच प्रदेशांतून आर्यन् लोक पूर्व इराणच्या सुपीक प्रदेशांत आले असावेत, व तेथून एक शाखा सिंधु व गंगा यांच्या प्रदेशांत पसरली असावी व दुसरी पश्चिमेस झॅग्रोस पर्वताच्या व सेमेटिक प्रदेशाच्या सरहद्दीकडे गेली असावी अशा आजच्या संशोधकांच्या कल्पना आहेत.