प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

इराणमधील ग्रीक शहरें - ३०१ मधील इप्ससच्या लढाईमुळें सिल्यूकसला सिरिया व आशियामायनरचा पूर्वभाग हे प्रदेश मिळाले व तेव्हांपासून त्यानें अँटिओकिआ हें सिरियांतील शहरच आपलें राहण्याचें ठिकाण केलें. यानंतर थोड्याच दिवसांनीं सिल्यूकसचा युफ्रेटीझच्या पूर्वेकडील सर्व प्रांत त्याचा मुलगा अँटायोकस याच्या हातीं आला. अलेक्झांडरनें आपल्या राज्याच्या रक्षणार्थ बॅक्ट्रिया, सॉग्डिएना व हिंदुस्थान या देशांत शहरें वसवून आपले निवडक लोक ठेविले होते. अलेक्झांडर मेल्यावर यांनीं बंडें केलीं व ते ग्रीसकडे परत जाण्याचा प्रयत्‍न करूं लागले. परंतु पायथॉननें त्यांच्यावर हल्ला करून त्यांनां कापून काढलें. याशिवाय अलेक्झांडरच्या मागून झालेल्या राजांनींहि आपल्या राज्याच्या संरक्षणार्थ कांहीं शहरें वसविलीं. हीं शहरें बहुतेक जुन्या वसाहतींच्या जागींच वसविली असून त्याच्यासंबंधीं लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही कीं या शहरांत ग्रीक व मॅसिडोनियन लोकांचीच वस्ती होती व ते साम्राज्यांत राहून स्वायत्त समाजाचे सर्व हक्क उपभोगीत होते. या शहरांनां त्यांच्या लगतचा कांहीं प्रदेश देखील जोडण्यांत आला होता व येणें प्रमाणें देशांतील बर्‍याच जिल्ह्यांचे अशा प्रकारचे स्थानिक स्वराज्य उपभोगणारे संघ बनले होते. तथापि, ज्या कांहीं शहरांनां पूर्ण स्वातंत्र्य देण्यांत आलें होतें तीं खेरीज करून बाकीच्या सर्वांवर राजाचा व त्याच्या अधिकार्‍यांचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष अंमल चालत असे. प्रथमतः या शहरांतील एतद्देशीय रहिवाशांनां नागरिकत्वाचे वगैरे कांहींएक हक्क नसून त्यांवर सर्वस्वीं बाह्य वसाहतवाल्यांचाच अंमल होता. परंतु लवकरच हे दोन्ही लोक एकमेकांत मिसळून एक होऊं लागले. हा प्रकार सिल्यूकसच्या राज्यांत फार झपाट्यानें व पूर्णपणें घडून आला. अशा रीतीनें सिंधुनदीपर्यंतच्या सर्व आशिया खंडांत ग्रीक भाषेचा व ग्रीक संस्कृतीचा फैलाव करण्यास हीं शहरें कारणीभूत झालीं. हीं शहरें व्यापाराचीं व उद्योगधंद्याचीहि केन्द्रस्थानें होतीं व या शहरांनां दिलेले हक्क व त्यांवरील राजाची मर्जी यामुळें तेथें अनेक लोक (विशेषतः यहुदी) कायमची वस्ती करण्यास येऊन तीं लवकरच मोठीं भरभराटीचीं शहरें बनलीं. बाबिलोनिया जिंकल्यावर सिल्यूकसनें तैग्रिस नदीच्या कांठीं सिल्यूशिआ नांवाची नवीन राजधानी वसविली. यानंतर मेसापोटेमिया, बाबिलोनिया व सूशिएना या देशांमध्यें शहरें वसविलीं गेलीं व मीडियाच्या सभोंवारहि बरींच शहरें बांधण्यांत आलीं.

ग्रीक लोकांच्या कारकीर्दीतील इराणी धर्म - ग्रीक संस्कृतीचा येणेंप्रमाणें पूर्वेकडील प्रदेशांत फैलाव होत असतांना इराणी लोक परकी अंमल मुकाट्यानें सहन करीत होते, व वरच्या दर्जाचे इराणी लोक ग्रीक सुधारणेच्या बाह्यांगांचा अवलंब करीत होते. उत्तरकालीन पारशी दंतकथांत अलेक्झांडरनें झरथुष्ट्राचे धर्मग्रंथ जाळले असें म्हटलें आहे. परंतु या दंतकथांनां ऐतिहासिक दृष्ट्या कांहीं महत्त्व नाहीं. ग्रीक लोकांनीं इराणी लोकांच्या धर्मांत कधींच हात घातला नव्हता. उलट पक्षीं त्यांच्या अमदानींत या धर्माचा केवळ पश्चिमेंतच (आर्मीनिया, उत्तर सिरिया, आशियामायनर) नव्हे तर पूर्वेकडे देखील जोराचा प्रसार झाला. तथापि या धर्माचें राष्ट्रीय लक्षण व जुन्या इराणी साम्राज्याची स्मृति फक्त पर्सिसमध्येंच टिकून राहिली होती.