प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

रोमशीं झालेली सस्सनांचीं युध्दें - पहिल्या अर्देशिरनें स्थापलेलें सस्सन अथवा नवीन इराणी साम्राज्य हें आर्सेसिडी साम्राज्याहून भिन्न होतें. हें साम्राज्य म्हणजे राष्ट्रीय इराणी राज्य होतें व पर्सिसच्या राजांप्रमाणें अर्देशिर हा कट्टा झरथुष्ट्राच्या पंथाचा असून अग्निपूजेच्या संप्रदायाचा त्यानें जोरानें सार्वत्रिक प्रसार केला. त्यानें पुन्हां जगभर इराणी साम्राज्य पसरविण्याचा निश्चय केला. व अकिमिनियन उर्फ अकिमेनिड राजांच्या पश्चिम आशियांतील राज्यावर हक्क दाखवून त्यानें आर्मीनियावर स्वारी केली. परंतु तींत त्याला कायमचें यश मिळालें नाहीं. रोमन मेसापोटेमियावर जें सैन्य पाठविण्यांत आलें, त्यानें सिरिया व कॅप्पाडोशियापर्यंत चाल केली; परंत आर्मिनियाचा राजा व रोमन बादशहा यांच्या संयुक्त सैन्यानें इराणी लोकांची पिच्छेहाट केली.