प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
आर्सेसिडींचें पार्थियन साम्राज्य : पहिला मिथ्राडेटीझ व फ्राएटीझ - सिल्यूकिडी राजांच्या वैभवास उतरती कळा लागली असतांना पूर्वेकडील प्रदेशांत आर्सेसिडी राजांनीं आपल्या राज्याचा विस्तारकरण्यास सुरुवात केली. पहिल्या फ्राएटीझनें (१७५-१७०) एलबुर्झमधील मीर्डिअन लोकांनां जिंकलें. त्याचा भाऊ पहिला मिथ्राडेटीझ (१७०-१३८) यानें बॅक्ट्रियाच्या राजाशीं निकराची लढाई करून तुराणी सरहद्दीवरील कांहीं जिल्हे जिंकले व सिंधुनदापलीकडे प्रदेश केला. पश्चिमेस त्यानें मीडिया जिंकून बाबिलोनिया घेतला व सेल्यूशिआ शहर काबीज केलें. १४० मध्यें सिल्यूकिडी राजा दुसरा डिमीट्रिअस यानें मिथ्राडेटीझशीं युद्ध केलें, परंतु त्यांत त्याचा पराभव होऊन तो कैद झाला. यानंतर मिथ्राडेटीझ मरण पावला. पुढें त्याचा मुलगा दुसर फ्रायटीझ (१३८-१२७) याच्यावर १३० मध्यें डिमीट्रिअसचा भाऊ सातवा अँटायोकस यानें हल्ला करून डेमीट्रिअसची मुक्तता केली; परंतु पुढें १२९ मध्यें मीडियांत त्याचा पराभव झाला. यानंतर युफ्रेटीझ नदीच्या पूर्वेकडील प्रदेशांतील सिल्यूकिर्डीचें वर्चस्व कायमचें नष्ट झालें. सिल्यूशिआ वगैरे बाबिलोनियांतील शहरें फ्राएटीझनें आपल्या एका आवडत्या अधिकार्याच्या स्वाधीन केलीं.