प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

आगस्टसचें धोरण - बहुतेक रोमन लोकांनां वाटत होतें कीं, ऑगस्टस आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या कॉन्सलाप्रमाणें पार्थियन राज्याचा मोड करून पूर्वेकडील प्रदेश पादाक्रांत करील. परंतु ऑगस्टसचें धोरण रोमची सत्ता व हक्क यांचें शांततेनें रक्षण करावयाचें असें होतें; व हेंच धोरण त्या वेळच्या रोमन राज्यास अवश्य होतें. ख्रि. पू. ३२ मध्यें दुसर्‍या टिरिडेटीझनें बंड करून चौथ्या फ्राएटीझला हांकून लावले; पण सिथियन लोकांनीं फ्राएटीझला पुन्हां गादीवर बसविलें. ऑगस्टसनें टिरिडेटीझला मदत केली नाहीं. यामुळें फ्राएटीझ हा ओझ्रो व आर्मीनिया या प्रदेशांवरील रोमन सत्ता कबूल करून (ख्रि. पू. २०) रोमशीं सलोख्यानें राहूं लागला. याच्या मोबदला म्हणून रोमन लोकांनीं बाबिलोनिया व इतर मांडलिक संस्थानें यांवर पार्थियन राजांची सत्ता अव्याहत चालूं दिली.

चौथ्या फ्राएटीझनें ख्रि. पू. ९ मध्यें ऑगस्टसकडे आपले चार मुलगे ओलीस पाठवून आपलें राज्य हें रोमच्या अंकित संस्थान बनविलें. ख्रि. पू. ४ मध्यें फ्राएटीझचा, त्याची आवडती बायको व मुलगा पांचवा फ्राएटीझ यांनीं खून केला. यानंतर राज्यांत भांडणें लागलीं. एका पक्षानें रोम येथें ओलीस म्हणून असलेल्या राजपुत्रांपैकीं एकाला मुक्त करून (इ.स. ८) पहिला व्होनोनीझ म्हणून राजा केलें; परंतु हा फार वेळ गादीवर टिकला नाहीं. म्हणून उलट पक्षानें सिथियन भटक्या लोकांपैकी दुसरा आर्टाबेनस नांवाच्या आर्सेसिडीला राजा केलें. हा फार क्रूर असल्यामुळें याला पुष्कळ वैरी झाले व पुन्हां देशांत अराजकता माजली.