प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

अकिमेनिड यांचें इराणी साम्राज्य, सायरस - ख्रि. पू. ५५३ मध्यें एलाममधील अन्शान (सुशिएना) चा इराणी सायरस (कुरुस) राजा यानें सायाक्सारीझचा मुलगा अस्तायाजीझ याचें वर्चस्व झुगारून दिलें. तीन वर्षांनीं सायरसनें अस्तायाजीझचा पासार्गाडी येथें पराभव केला; लवकरच त्याची राजधानी एकबटाना सर केली व आस्तायाजीझला बंदिवान करून मिडियन राज्याच्या ठिकाणीं इराणी राज्याची स्थापना केली. सायरसनें इराणी लोकांच्या निरनिराळ्या जाती एकत्र करून त्यांचें जगांतील एक बलाढ्य राष्ट्र बनविलें. सायरसनें मीडियन राजांनीं केलेले तह मोडले त्यामुळें त्याच्या विरुद्ध बाबिलोनचा नाबोनिडस, इजिप्‍तचा अमासिस, लिडियाचा क्रीसस, व स्पार्टन यांची गट्टी होऊन त्यांचें संयुक्त सैन्य सायरसवर चालून आलें. ख्रिस्ती शकापूर्वी ५४६ या वर्षी क्रीससनें हल्ला केला. सायरसनें टीरिआ येथें त्याचा पराभव केला, पॅक्टोलसच्या कांठीं सायरसला दुसरा जय मिळाला. लवकरच सार्डिस हस्तगत झालें व इराणी लोकांची सत्ता मध्यसमुद्रापर्यंत पसरली. थोडक्याच वर्षांत ग्रीक शहरें आणि कॅरियन व लिशियन लोक यांनां काबीज करण्यांत आलें. सिलिशियाचां राजा आपखुषीनें शरण आला. ५३९ मध्यें सायरसनें नाबोनिडसचा पराभव करून बाबिलोन काबीज केलें. खाल्डियन राज्य, सिरिया व पॅलेस्टाइन हीं राज्यें इराणी राज्यांत सामील झालीं. नंतर पूर्व इराण पादाक्रांत करण्यांत आले. सायरसविषयीं विशेष हकीगत देण्याचें हें स्थल नव्हे. (शरीर खंड सायरस पहा.)