प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

असित व सिमिऑन यांच्या कथा -   यापेक्षां असिताची कथा आणि सेंट ल्यूकमधील सिमिऑनची कथा यांमध्यें पुष्कळ अधिक साम्य आहे. या ठिकाणींहि कांहीं नाकबूल न करतां येण्यासारखे फरक आहेत. तरी त्यांवरून विंटरनिट्झचें मत असें झालें आहे कीं, या ख्रिस्ती कथानकाच्या कर्त्याला बौद्ध कथेची माहिती असावी हें बरेंच संभवनीय दिसतें. तसेंच, 'बुद्ध लहान असतां तो एकदां आपल्या सोबत्यांनां सोडून बाजूला गेला, व नंतर कुटुंबांतील माणसें तो हरवला म्हणून त्याचा तपास करीत असतां त्यांनां तो 'ध्यानस्थ स्थितींत बसलेला सांपडला' या कथेमध्यें, आणि 'येशू बारा वर्षांचा असतां एकदां आईबापांबरोबर नॅझरेथला परत न येतां मागेंच यरुशलेमममधील देवळांत राहिला, आणि तेथील गुरुंबरोबर त्यानें संभाषण केलें,' या कथेमध्यें सुद्धां परस्परसंबंध असणें शक्य आहे असें विंटरनिट्झ यास वाटतें. शिवाय एका स्त्रीकडून ख्रिस्तमातेला झालेल्या मोक्षप्राप्‍तीच्या कथेमध्यें आणि निदानकथेमध्येंहि कांहीं संबंध असण्याचा संभव आहे. साधूची देवदूतांनीं सेवा केली या गोष्टींत जरी कांहीं विशेष नाहीं, तरी देवदूतांनीं उपवासी येशूवर व उपवासीच बुद्धावर कृपा करावी हें साम्य मात्र लक्षांत घेण्यासारखें आहे; आणि म्हणूनच या बाबतींत या कथानकांचें अन्योन्य सापेक्षत्व असणेंहि शक्य आहे.