प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

अर्वाचीन संशोधन - एफ. क्युमाँट ह्यानें मणीच्या मूलाधारभूत कथेंतील निदान एक तरी कथा अवेस्तावरून घेतली असली पाहिजे, असें दाखविलें आहे. मणिसंप्रदायी स्तोत्रें, प्रार्थना वगैरे कांहीं ग्रंथ पूर्व तुर्कस्थानांत तुर्फान येथें नुकतेच सांपडले आहेत; त्यांत आपला पंथ हा ख्रिस्ती व जुन्या मगी पंथांचें मिश्रण आहे असें मणीनें स्वतः कबूल केलेलें आढळतें. ज्याप्रमाणें हिब्रू धर्मग्रंथ हे ख्रिस्ती संप्रदायास मूलभूत झाले, त्याचप्रमाणें मणीच्या नवीन संप्रदायाचीहि अवेस्तावर उभारणी केली गेली. ह्या नवीन सांपडलेल्या कागदपत्रांत, एके ठिकाणीं मणीनें असें म्हटलें आहे कीं, आकाशांतील बापाच्या ठिकाणीं भक्ति ठेवणारा ईश्वराचा मित्र जो येशू त्यानें मला धर्मप्रसारार्थ पाठविलें आहे.