प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
अरब लोक इराण जिंकतात - तिसरा येझ्देगर्द ६३३ मध्यें गादीवर बसला व त्याच वर्षी अरबी सैन्यानें इराणांत प्रवेश केला. बर्याच झटापटी होऊन ६३७ त युफ्रेटीझच्या एका कालव्यावर झालेल्या कॅडिसिआच्या लढाईंत सस्सन घराण्याचा शेवट झाला. याच्या थोडें अगोदर ६३६ मध्यें यार्मुकच्या लढाईंत सिरिया देश काबीज करण्यांत आला होता; व पुढें ६३९ मध्यें अरब लोक इजिप्तमध्यें शिरले. कॅडिसिआच्या विजयानें टेसिफॉन शहर व तेथील खजिना अरबांच्या हातीं लागला होता. या विजयानंतर इराणी राजा मीडियांत पळून गेला. तेथें त्यांच्या सेनापतींनीं पुन्हां सुसंघटित होण्याचा प्रयत्न केला, पण नाहावेंदच्या लढाईंत त्यांचा मोड झाला (६४१). तिसर्या येझ्देगर्द राजाचा एका प्रांतांतून दुसर्या प्रांतांत पळत असतां अखेरीस मर्व्ह येथें ६५१ मध्यें खून झाला. अशा रीतीनें इराण देश अरबांच्या हातीं जाऊन तेथें त्यांची सत्ता प्रस्थापित झाली.