प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
परमार्थ संप्रदायाचा सामाजिक नीतीवर परिणाम - धार्मिक बाबतींमध्यें तात्त्विक वादापेक्षां सामाजिक रिवाजांस महत्त्व द्यावयाचें आणि सामाजिक सुधारणेला महत्त्व दिल्यामुळें संप्रदायग्रंथाचा अर्थ आपल्या मतानुसार लावावयाचा; किंवा आपण जी सुधारणा करूं पाहतों तीसारखा लावावयाचा या प्रकारच्या खटपटींनां देखील इराणच्या इतिहासांत स्थान मिळालें होतें असें दिसतें. प्लेटो सांघिक विवाह प्रतिपादूं लागला. हिंदुस्थानांत सांघिक विवाहाचें प्रतिपादन नाहीं तरी समर्थन करण्यांत आलें. परंतु इराणमध्यें सांघिक विवाह प्रचलित करण्यास धर्मगुरूंनीं; खटपट केली. ती खटपट करणार्या संप्रदायास मझ्दक असें नांव आहे. त्याचें स्वरूप थोडक्यांत येथें दिलें आहे.