प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

सस्सन घराण्याचा नाश होईपर्यंतच्या इतिहासाचें सामान्य पर्यालोचन - सध्यां आपल्याकडे इराण शब्द प्रचलित आहे तर यूरोपांत पर्शिया हा शब्द प्रचलित आहे. इराण शब्दाचा ''आर्य'' शब्दाशीं अन्वय लावण्यांत येतो आणि पर्शिया शब्दाचा पारशी शब्दाशीं अन्वय आहे. पारशी हा अर्वाचीन शब्द आपणांस परिचित आहेच, पण प्राचीनकालींहि या लोकांचे वाचक संस्कृत वाङ्‌मयांतील शब्द पारसीक व पर्शु हे होते. पर्शियाचा खरा अर्थ पर्शियन नामक लोकांच्या वस्तीचा प्रदेश. म्हणजे पूर्वी ''पर्सिस'' नांवानें व अर्वाचीन काळीं ''फार्स'' नांवानें परिचित असलेला जिल्हा असा आहे. तथापि रूढीमुळें इराणी डोंगरपठाराच्या सर्व प्रदेशाला या नांवानें संबोधण्यांत येतें. इराणचें साम्राज्य म्हणजे आमच्या इराणच्या मर्यादेंत रहाणारे लोक हें प्राचीन काळींच राष्ट्र असून त्या राष्ट्राचें साम्राज्य असा अर्थ मुळींच करतां येणार नाहीं. ज्या काळाविषयीं आपण बोलत आहों त्या काळीं आजचें इराण हें राष्ट्र नव्हतें, तर त्या प्रदेशांत अनेक राष्ट्रजाती होत्या. त्यांपैकीं एखादी जात कधीं प्रबल होई आणि ती प्रथम इराणावर आणि नंतर इराणाबाहेरील राष्ट्रांवर स्वामित्त्व गाजवी. पुष्कळ यूरोपीयांची अशी समजूत आहे कीं, इराण हें राष्ट्र मोठें होतें व त्यानें ग्रीकांस चिरडण्याचा प्रयत्‍न केला तो अयशस्वी झाला. यावरून ते इराणचें भीरुत्व आणि यूरोपीयांचें शौर्य स्थापन करूं पहातात. इराणविषयक वस्तुस्थिति अशी दिसते कीं, प्राचीन काळीं सर्व जगांतील इराणी लोकांची संख्या कदाचित् ग्रीकांपेक्षांदेखील बरीच कमी असेल. एका लहानशा जातीनें केवळ सुसंघटित घटनेच्या जोरावर तत्कालीन जग पादाक्रांत केलें हें लोक विसरतात.

मॅराथॉन थर्मापिली वगैरे लढाया ज्या युद्धांत होऊन त्यांत इराणास माघार घ्यावी लागली त्या युद्धासंबंधाचे आधारग्रंथ ग्रीक असल्यामुळें त्यांत अतिशयोक्ति झाली असणें स्वाभाविक आहे. इराण हें राष्ट्र स्वभावतःच दुर्बल असतें तर ग्रीकांस पादाक्रांत करणार्‍या रोमन साम्राज्याचें दोनशें वर्षे युद्ध करीत असतांहि त्यापुढें कांहींच कसें चाललें नाहीं ? रोमन पातशहा एकामागून एक ज्या इराणचे कैदी म्हणून पकडले गेले तें राष्ट्र दुर्बल किंवा भीरू लोकांचें असणें शक्य नाहीं. इराणी पातशाहीमुळें पूर्व आणि पश्चिम यांचा संबंध उत्पन्न झाला. पूर्व व पश्चिम यांमध्यें मोठ्या प्रमाणावर संबंध घडवून आणणारी शासनसंस्था या दृष्टीनें इराणला अग्रपूजेचा मान दिला पाहिजे.