प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

सस्सन लोकांनीं बॅक्ट्रिया जिंकला - इ.स. ५६० मध्यें तुर्क नांवाचें नवीन राष्ट्र निर्माण झालें. खुशरूनें एफथालाइट लोकांविरुद्ध तुर्कांशीं दोस्ती करून बॅक्ट्रिया प्रांत जिंकला. नंतर सस्सन लोकांचें तुर्कांशीं युद्ध सुरू झालें. पहिल्या खुशरूचा मुलगा चौथा होर्मिझ्द (५७९-५९०) याला शांतता राखतां येईना. शिवाय, ख्रिस्ती संप्रदायाचा छळ न केल्यामुळें मगी धर्मोपदेशकहि राजाशीं नाराज झाले होते. त्याच्या विरुद्ध सरदारांचें बंड होऊन त्यांत त्याला बळी पडावें लागलें. यानंतर दुसरा खुशरू गादीवर बसला. परंतु नवीन बंडें होऊन त्याला रोमन लोकांकडे पळून जावें लागलें. रोमन बादशहा मॉरिसनें खुशरूला पुन्हां गादीवर बसवून इराणी लोकांनां निसिबिस किल्ला दिला. दुसरा खुशरू (५९०-६२८) यास पर्वेझ (जेता) असें म्हणत असत. यानें बर्‍याच उलाढाली पहिल्या. ६०२ मध्यें मॉरिसचा खून होतांच त्यानें ती संधि साधून सूड उगविण्याच्या उद्देशानें रोमवर स्वारी केली. या युद्धामध्यें ६०८ त, ६१५ त व पुन्हां ६२६ त याचे सैन्य कॅल्सीडॉनपर्यंत घुसलें; त्यानें सिरिया उध्वस्त केला; ६११ त ॲटिऑक, ६१३ त दमास्कस व ६१४ त यरुशलेम घेतलें, व ख्रिस्त्यांचा पवित्र क्रॉस टेसिफॉनला नेला. ६१९ मध्यें इजिप्‍त देश पादाक्रांत करण्यांत आला. पुढें हेराक्लायस या रोमन बादशहानें ६२३ मध्यें इराणी साम्राज्यावर स्वारी करून सव्याज सूड उगविला. ६२४ मध्यें रोमन लोकांनीं ॲट्रोपाटीनमधील मोठें अग्निदेवालय पाडून टाकलें; ६२७ त ते तैग्रिस प्रांतांत शिरले, परंतु खुशरू त्यांनां तोंड न देतां टेसिफॉनला पळून आला. यामुळें राज्यक्रांति होऊन त्याचा मुलगा दुसरा कवध यानें खुशरूला पदच्युत करून त्याचा खून केला (६२८). परंतु हा राजा थोडक्याच महिन्यांनीं मरण पावला. याच्या मागून बरेच राजे व तोतये एकामागून एक होऊन गेले. अखेरीस सर्व सरदारांनीं एकमतानें दुसर्‍या खुशरूचा नातू तिसरा येझ्देगर्द याला ६३२ मध्यें गादीवर बसविलें. मध्यंतरीं रोमन बादशहाशीं तह होऊन जुनी सरहद्द कायम करण्यांत आली, व ख्रिस्ती लोकांचा क्रॉस त्यांचा त्यांनां परत देण्यांत आला.

येणेंप्रमाणें ५२७ मध्यें सुरू झालेल्या रोमन युद्धाचा शंभर वर्षानंतर निकाल झाला. या युद्धापासून उभय पक्षांसहि कांहीं फायदा झाला नाहीं. उलट दोघांच्याहि शक्तीचा र्‍हास होऊन त्यांच्या शत्रूला अनायासें संधि प्राप्‍त झाली. हा नवीन शत्रु म्हणजे अरब लोक व इस्लामी धर्म हा होय.