प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
साम्राज्याचें धोरण - इराणी साम्राज्याचा विस्तार मुख्यत्वेंकरून सायरस व कंबायसिस यांनीं जिंकलेल्या प्रदेशाच्या फारसा पलीकडे गेला नव्हता. दरायसनें या राज्याचा व सरहद्दीवरील प्रदेशाचा बंदोबस्त करण्याचें काम केलें. आणि या उद्देशानें त्यानें आशियामायनरमधील डोंगरी जाती जिंकून साम्राज्याची सरहद्द कॉकेशसपर्यंत वाढविली; फक्त कॉलचिसचेंच राज्य बादशहाच्या मांडलिकत्वाखालीं स्वतंत्र राहिलें होतें. तसेंच त्यानें सिंधुनदाचें खोरें, काफरिस्तान व काश्मीरचा, हिरोडोटसचा कास्पिओइ किंवा कास्पिरोइ येथील, सोने पैदा होणारा डोंगरी मुलूख व सिंधुनदावरील दर्दिस्थानांतील दरद हीं खालसा केलीं. येथूनच पामीरच्या डोंगरपठारावरील व उत्तरेकडच्या अमर्जियन शकांवर त्यानें कित्येक स्वार्या केल्या, व तुराणी मैदानांतील भटक्या मेंढपाळ लोकांनां कैचीत पकडून पादाक्रांत करण्याकरितां त्यानें रशियन मैदानांतील सिथियन लोकांवरील अयशस्वी झालेली स्वारी हातीं घेतली (ख्रि. पू. ५१२). तथापि या स्वार्यांबरोबरच राजाच्या शिरावर असलेलें राज्याची सुधारणा करण्याचें महत्त्वाचें कार्य तडीस नेण्याचाहि प्रयत्न केला जात होता हें आपणांस उपलब्ध असलेल्या अपुर्या दंतकथांवरून कळतें. हिरात जिल्ह्यांत दरायसनें मैदानाच्या प्रदेशांत लागवडीस उत्तेजन देण्याकरितां एक मोठें तळें बाधलें. आपल्या राज्याचा व्यापार वाढविण्याकरितां नौकानयनाच्या दृष्टीनें त्यानें सिंधुनदाच्या प्रवाहाचें संशोधन करविलें. इराणी किनार्यावरील निआर्कसनें वर्णिलेलीं कित्येक बंदरें त्यानेंच स्थापिलीं. या त्याच्या खटपटींवरून पर्सिस व इतर जगांतील व्यापार यांमधील दळणवळणाचे मार्ग खुले करण्याची त्याची इच्छा दिसून येते. नीकोनें ज्याचें काम अगोदरच सुरू केलें होतें तो नाइल नदीपासून सुवेझपर्यंतचा कालवा दरायसनें पुरा केला. या कालव्यानें जहाजांनां नाइल नदींतून सोबावरून इराणला सरळ जातां येत असे. क्सर्क्सीझच्या वेळीं आफ्रिकेच्या सभोंवतीं पर्यटन करण्याचा देखील प्रयत्न झाला होता.