प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

साम्राज्यांतील जित जातींची स्थिति - प्रांतांमध्यें जित जातींनां बरेंच स्वातंत्र्य होतें; उदाहरणार्थ, यहुदी लोक आपल्या धर्मोपदेशकांच्या व इतर वयस्कर लोकांच्या नेतृत्वाखालीं यरुशलेम येथें आपल्या जातीची सार्वजनिक परिषद भरवूं शकत असत. जी ती जात आपल्या जातीतील न्याय निवाडे आपण स्वतःच करीत असे; परंतु सामान्यतः जरी राजा किंवा त्याचे अधिकारी या जातींनीं दिलेल्या निकालांत ढवळाढवळ करीत नसत, तरी लहर येईल तेव्हां प्रजेचा हा हक्क गुंडाळून ठेवून एखाद्या व्यक्तीच्या बाबतींत ते आपली अरेरावी चालविण्यास मागें पुढें पहात नसत.

वालुकामय प्रदेशांत (उ. अरबी व तुराणी भटक्या जातींत), जंगली एका बाजूस असलेल्या पर्वतांत (उ.झॅग्रोस, मिझिआ, पिसिडिआ पॅफ्लागोनिआ, बिथिनिआ, व आशिया मायनर येथील प्रदेशांत) व इतर बर्‍याच इराणी जातींत त्या त्या जातींच्या मुख्यांच्या नियंत्रणाखालीं पूर्वापार चालत आलेली शासनव्यवस्था इराणी साम्राज्याखालीं पूर्ववतच चालू ठेवण्यांत आली होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठीं सुधारलेल्या बहुतेक प्रांतांचे जिल्हे पाडून त्यांवर राजानें नेमलेले अधिकारी व क्षत्रप कारभार चालवीत असत या जिल्ह्यांनां ग्रीक लोक राष्ट्रें या अर्थाचा शब्द योजीत. यांमध्येंच मोठाल्या शहरांच्या वसाहतींचा अंतर्भाव होत असे. त्यांचा कारभार तेथील वयोवृद्ध लोक अथवा समाजाचे मुख्य चालवीत असत. बाबिलोन, यरुशलेम हीं अशा प्रकारच्या शहरांचीं उदाहरणें आहेत. याच नमुन्यावर देवळांच्या मोठाल्या जमीनजुमल्यांचीं व मालमत्तेची देखील संस्थानें होतीं. सिरियामधील बंबाइस, कॅप्पोडोशिआमधील दोन कोमान हीं अशा संस्थानांचीं उदाहरणें म्हणून देतां येतील. याशिवाय कित्येक मोठाले जिल्हे बादशहाचा खासगी मुलूख म्हणून राखून ठेविलेले होते. राजाचीं उपवनें व शिकारीच्या जागा या प्रदेशांतच असत. या जिल्ह्यांवर बादशाही अधिकार्‍यांची देखरेख असे, अथवा राजा ते इराणी इसमांस अथवा जित जातींतील लायक लोकांनां त्यांची खासगी मालमत्ता म्हणून देत असे. या जहागिरी निखालस खासगी असून त्या वंशपरंपरा चालत असत व पुढें हेलेनिस्टिक काळांत यांचीं स्वतंत्र राज्यें बनलीं.