प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
सस्सन साम्राज्याचा इतिहास - आपल्या राज्याचें रक्षण करणें व शक्य असेल तेव्हां पूर्वेस व पश्चिमेस विस्तार करणें हेंच या राजघराण्याचें परराष्ट्रीय धोरण होतें. पार्थियन साम्राज्याहून या साम्राज्याचा विस्तार जास्त नव्हता. अगदीं पूर्वेस सिंधुनदाच्या दोन्हीं किनार्यांवर कुशनांचें राज्य पसरलेलें होतें. इ.स. ३२० नंतर कुशन राजांच्या ऐवजीं गुप्त राजे सत्ताधीश झाले. पश्चिमेस ओझोने, उत्तर मेसापोटेमिया, इडेसा, करी व निसिबिस ह्या किल्ल्यांबद्दलचें भांडण रोमनलोकांशीं अद्याप धुमसतच होतें. आर्मीनियांत आर्सेसिडी घराणें अद्याप शिल्लक असून तें रोमन लोकांनां आपलें संरक्षण करण्यास बोलवीत होतें. म्हणून आर्मीनिया प्रदेश घेण्याच्या प्रयत्नांत रोमन लाकांशीं लढाया नेहमीं होत असत. दुसर्या बहरामच्या वेळीं (२७६-२९३) व्होलेरिअनबद्दल सूड उगविण्याच्या इराद्यानें केरस हा रोमन बादशहा मेसापोटेमियांत आला; व त्यानें कोचे व सिल्यूशिआजवळील टेसिफॉन हीं शहरें घेतलीं; परंतु २८३ मध्यें तों मेल्यामुळें रोमन सैन्य परत गेले. पुढें बहरामनें नजराणें देऊन डायोक्लीशिअनशीं तह केला. कांहीं वर्षांनंतर नार्सीझ नांवाच्या सस्सन राजानें आर्मीनिया घेऊन गालेरिअस बादशहाचा कॅलिनिकम येथें पराभव केला (२९६). परंतु २९७ मध्यें नार्सीझचा अगदीं मोड होऊन त्याचा खजिना व जनानखाना रोमन लोकांनीं घेतल्यामुळें त्याला रोमन लोकांशीं तह करणें भाग झालें. या तहान्वयें आर्मीनिया रोमन सत्तेखालीं राहिला; उत्तर मेसापोटेमियाचें मैदान, व गॉर्डियेनीपर्यंत तैग्रीस नदीच्या डाव्या तीरावरील प्रदेश रोमन लोकांनां देण्यांत आला; व नार्सीझचा जनानखाना नार्सीझला परत करण्यांत आला. हा तर २९७ मध्यें होऊन पुढें चाळीस वर्षे टिकला. पहिल्या शापुरनंतर झालेल्या सहा राजांचा इतिहास माहीत नाहीं. दुसरा होर्मिझ्द (३०२-३१०) मेल्यानंतर सरदारांनीं त्याच्या प्रौढ मुलांचा खून करून दुसरा शापुर नांवाच्या अल्पवयी मुलास गादीवर बसविलें. परंतु हा वयांत आल्यावर मोठा उत्साही राजा झाला.