प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
साम्राज्याचीं अंतस्थ स्थिति व बंडें - येणेंप्रमाणें इराणी साम्राज्याची वाढ खुंटली. इराणांत शूर व उच्च दर्जाचे पुरुष निपजणें बंद झालें असें नाहीं, पण दिवसानुदिव जनानखाना, खोजे लोक व अशाच प्रकारचे इतर दरबारी लोक यांचें प्राबल्य वाढत चाललें होतें. देशाभिमान व राजभक्ति यापेक्षां सत्तेच्या मोहाचा पगडा कर्तबगार लोकांच्या मनावर अधिकाधिक बसत चालला होता. उदाहरणार्थ, राजाच्या जुलमामुळें नव्हे तर दुर्बल राजे गादीवर येऊं लागल्यामुळें प्रदीप्त झालेल्या महत्त्वाकांक्षेनें क्षत्रपांमध्यें स्वतंत्र होण्याची इच्छा उत्पन्न झाली. ख्रि. पू. ४६५ मध्यें पहिल्या क्सर्क्सीझचा त्याचा वजीर आर्टाबेनस यानं खून करून सर्व सत्ता आपणच बळकावण्याचा यत्न केला. पुढें ख्रि. पू. ३३८ मध्यें तिसर्या आर्टाक्सक्सींझचा खून करून बांगोअसनें देखील असाच प्रयत्न केला. अशा परिस्थितींत पहिला क्सक्सींझ व दुसरा आर्टाक्सक्सींझ यांसारख्या सुस्वभावी परंतु दुर्बल, लहरी व परतंत्रानें चालणार्या राजांची भर पडली. दुसरा दरायस व तिसरा आर्टाक्सक्सींझ हेच काय ते अमानुष जुलुमी राजे होऊन गेले. तिसर्या आर्टाक्सक्सींझनें राजघराण्यांतील बहुतेक इसमांची कत्तल उडवून रक्ताचे पाट वाहविले व आपल्या पित्याच्या वेळीं विस्कळीत झालेल्या राज्याची घडी पुन्हां बसविली.
अशा स्थितीमुळें उत्पन्न झालेली बंडाळी व लढाया यांचा विचार करतांनां एवढें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, त्यांचा परिणाम राज्याच्या एकट्या दुकट्या प्रांतांवरच झाला. यांचें स्वरूप दारुण होऊन त्यांच्यामुळें विस्तृत प्रदेशाला बाधा क्वचित् प्रसंगींच झाली असेल. ॲकिमेनिड कारकीर्दीच्या काळीं बहुतेक प्रांतांत दोन शतकें शांतता व सुव्यवस्था नांदत होती. जोरदार बादशाही सत्तेखालींच केवळ दाबांत राहूं शकणार्या पर्वत व वालुकामय मैदानें यांमधील रानटी जाती, त्यांच्यावरील ताबा नाहींसा झाल्याबरोबर साहजिकपणेंच स्वतंत्र झाल्या. असले लोक म्हणजे झॅग्रोसमधील काडर्यूकिअन जात व ईलामचा अंतर्भाग, उत्तर मीडिया, टॉरस व ओलिंपस या प्रांतांतील कित्येक निरनिराळ्या जाती या होत. या लोकांचे पारिपत्य करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले; व एकबटाना येथें जेव्हां राजधानी हालविण्यांत आली तेव्हां या डोंगरी लोकांनीं इराणी राजस सुरक्षितपणें जाऊं द्यावें म्हणून त्यांनां पैसे द्यावे लागले ! ख्रि. पू. ४०० मध्यें आर्मीनियाच्या उत्तरेस इराणी राजांची सत्ता नष्ट झाली होती व पाँटिक पर्वतांतील लोक व समुद्रकिनार्यावरील ग्रीक शहरें स्वतंत्र झालीं होतीं. पॅफ्लोगोनिआमध्यें एतद्देशीय राजांनीं बलाढ्य परंतु अल्पकालीन राज्य स्थापिलें होतें, व बिथिनिअन लोकांचे नायक स्वतःच मालक बनले होते. हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील प्रांत इराणी साम्राज्यांतून फुटून निघाले व ख्रि. पू. ४८६-४८४ मध्यें एक व ४६०-४५४ मध्यें दुसरें अशीं बंडें होऊन इजिप्त देश कायमचा स्वतंत्र झाला. यानंतर तिसर्या आर्टाक्सर्क्सीझनें देश्य राजघराण्यांचा मोड करून त्यांनां फिरून एक वेळ शरण यावयास लावलें.
तथापि पहिल्या दरायसच्या काळानंतर ग्रीक, लिशिअन व फिनीशिअन शहरें खेरीज करून इतर सुधारलेल्या देशांतील एकाहि प्रदेशानें इराणी सत्ता झुगारून देऊन स्वतंत्र होण्याचें मनांत आणलें नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. क्षत्रपांच्या बंडांमुळें राज्याचा दुबळेपणा आणखी स्पष्टपणें दृग्गोचर झाला होता. क्षत्रपांनां सैन्य ठेवण्याची परवानगी असल्यामुळें ते आपल्या नोकरींत पुष्कळ पगारी ग्रीक शिपाई ठेवूं लागले, व या सैनिकांच्या मदतीनें त्यांनां बंडें करणें सुलभ झालें. पहिला आर्टाक्सर्क्सीझ व दुसरा दरायस यांच्या वेळीं अशीं बंडें क्वचितच होत असत. परंतु धाकट्या सायरसच्या बंडाच्या वेळीं (ख्रि. पू. ४०१) जेव्हां १२००० ग्रीक सैन्यावर सबंध इराणी सैन्यास हल्ला करण्याचें धाडस झालें नाहीं तेव्हां बादशाही सत्तेचें दौर्बल्य स्पष्टपणें व्यक्त झालें. यापुढें तर आशियामायनर व सिरिया या देशांत क्षत्रपांचीं बंडें प्रत्यहींच होऊं लागलीं. यांचा बंदोबस्त करतांना इराणी राजांनां ग्रीक व इजिप्त या देशांशीं लढाई करावी लागत असे.