प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

हिंदी गोष्टींचे ख्रिस्ती शुभवर्तमानावर झालेले परिणाम - या प्रश्नाचा सेडेलपेक्षां जी. ए. व्हान डेन बर्ग व्हान एसिंगनें अधिक काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. हे ग्रंथ निर्माण झाले त्या परिस्थितींतील सारखेपणा, धार्मिक उन्नतींतील सारखेपणा आणि शेवटीं मानवी स्वभावांतील सामान्य सारखेपणा या कारणांनीं ज्यांचा सहज उलगडा होतो अशा गोष्टी सोडून देऊनच त्यानें प्रस्तुत विषयाचा विचार केलेला आहे. त्याचेंहि मत असेंच झालें आहे कीं. शुभवर्तमानांत वरच्या शिवाय दुसरींहि सादृश्य स्थलें असून तीं उसनीं घेतलेलीं आहेत असें मानलें तरच त्यांचा बरोबर उलगडा होतो. पण तीं कोणत्याहि लेखनिविष्ट ग्रंथांवर आधारलेलीं नसून रोमन साम्राज्याच्या काळीं ज्या हिंदी गोष्टी, विषय व कल्पना तोंडातोंडीं पाश्चात्य देशांत गेल्या त्यांतील कांहीं मुख्य लक्षणें आद्य ख्रिस्ती संप्रदायांतील कथा रचतांना घेण्यांत आलीं. सेडेलनें स्वमतानें काढलेल्या एकावन्न सादृश्यस्थलांपैकीं बर्ग व्हान एसिंगनें नऊच काय तीं वादविवादालायक ठरविलीं आहेत, आणि फक्त सहा कमजास्त प्रमाणानें परिणामकारक मानलीं आहेत.