प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
सूतसंस्कृतींत परमार्थोद्यमांत गुंतलेले लोक - या उद्योगांत कोण गढलेले असावेत हें आपण आतां पाहूं यति व मुनि यांस बौद्ध व जैन या दोन्ही ग्रंथाच्या पूर्वी परंपरांत स्थान आहे. संयमन करणे आणि विचार करणे या दोन्ही क्रियांस महत्त्व सूतसंस्कृतीच्या लोकांत होतें त्याचप्रमाणें मांत्रसंस्कृतीच्या लोकांतहि होतें. पण ॠषींचें अस्तित्व सूतसंस्कृतीच्या लोकांत असावें किंवा नसावें याविषयी शंका आहे. ॠषींचें आद्य कार्य कोणते, ॠषि शब्दाचा मूळ अर्थ कोणता याविषयी अजून अस्पष्टता आहे. रा. राजवाडे ॠषि व इंग्रजी शब्द रश् यांचा संबंध असावा असें समजतात. आणि ईश्वरी प्रेरणा होऊन किंवा अंगांत येऊन बोलूं लागणारा किंवा सैरावैरा धांवणारा किंवा काव्य करणारा जे तो ॠषि, असा ॠषि या शब्दाचा अर्थ मांडतात. ईश्वरी प्रेरणा होऊन बोलणें याचें महत्त्व भारतीय भूमीवर फारसे रुजलेलें दिसत नाही. ईश्वरी प्रेरणेनें बोलण्याचा बाणा करणारे लोक सेमेटिक लोकांत दिसतात. झरथुष्ट्रहि त्याच प्रकारचा मनुष्य समजण्यास हरकत नाही. परंतु त्याप्रकारच्या व्यक्तीचें अस्तित्व आपल्याकडे फारसें दिसत नाहीं. ॠग्वेदांतील बरीचशीं सूक्तें जरी तपासली तरी प्राफेटाचे ऊर्फ प्रवक्त्यांचे उद्गार या पदवीला शोभतील अशी फारच थोडकी आहेत. जी सूक्तें परमार्थसाधनपर म्हणतां येतील ती स्तोत्रें अगर याजक सूक्तें आहेत म्हणजे यज्ञ चालला असतां त्यास मदत करणारी म्हणून आहेत. आमची अशी कल्पना होते की सूतसंस्कृतीच्या लोकांत अग्नि व जनधर्म हा थोडाबहुत असावा परंतु तो जवळजवळ संपुष्टांत येत चालला असावा आणि पंजाबांतील यदुतुर्वशांत तो सुदास दिवोदासांच्या अनुयायांच्या बरोबरीनें असावा. परंतु गंगेच्या पूर्वेस अग्नियजनास फारसें प्राधान्यच नसावें. त्याचें थोडेंबहुत महत्त्व मगांच्या वंशजांनीं जिवंत ठेवलें असावें व कादाचित ते लोक अथर्वविद्या आचरीत असावे. तथापि तो अजिबात नष्ट झाला असावा असेंहि म्हणतां येत नाहीं. कांकी तो जर अजीबात नष्ट झाला असता तर मांत्रसंस्कृतीच्या लोकांस प्रजापतीस महत्त्व देऊन आपला यजुर्वेदीय ब्राह्मणधर्म तिकडे वाढवितां आला नसता. मुनि व यति यांचे प्राधान्य पुढें आरण्यकीय धर्मात विकास पावलें असावें. आरण्यकीय धर्मसंबंध जितका मंत्रब्राह्मणपरंपरेशीं जोडतां येईल किंबहुना तितकाच इतिहासपुराणपंरपरेशींहि जोडतां येईल. असेंहि म्हणतां येईल की आरण्यकीय धर्म हा देश्य संस्कृतीचें पुनरुज्जीवन व मांत्रसंस्कृतीचा विनाश दाखवितो. या सूतसंस्कृतीपासूनच आरण्यकीय धर्म उत्पन्न होऊन तो देशभर विस्तारला व जैन बौद्धधर्माची मुळेंहि त्यांतूनच निघालीं.