प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति

कोसल येथील वंशावळीचें महत्त्व - प्राचीन काळींच या अनेक टोळयांनीं भरतखंडांत येऊन उत्तरभाग व्यापून टाकला यासंबंधी अनेक पुरावे मिळतात. हैहय, तालजंघ आणि शक, पह्लव, कांबोज इत्यादि टोळया उत्तर भागांत येऊन कोसलखेरीज सर्व राज्यें त्यांनीं उंलथून पाडिली. कोसलवंश मात्र अखंड राहून, बाकीची राजघराणी बहुतेक नाश पावली यांमुळें त्या घराण्यांतील वंशावळींत खंड दृष्टीस पडतात. सोमवंशांत अशा प्रकारचा खंड आहे; कान्यकुब्ज घराणें तर नाहींसेच झालें; काशीवंशावळी विस्कळीत झाली आहे; आणि मध्यदेशांत पुढें नवीन घराणीं स्थापन झाली. कोसलदेश पूर्वेकडे असल्यानें बचावला व त्याच्या घराण्याची वंशावळ अखंड आणि पूर्ण अशी राहिली. याखेरीज सूर्यवंशाची प्रतिष्ठा लोकांमध्ये अव्याहतपणें सर्वांत अधिक असल्याने याच्या वंशांवळी मोठया आदरानें संपूर्णपणें जशाच्यातशा चालत आलेल्या आहेत. इतर वंशांची तशी गोष्ट नाहीं. तेव्हां सूर्यवंशाचा विस्तार इतर वंशांशीं त्याची तुलना करून कांहीं छाटाछाटीनें दुरुस्त करणें बरोबर होणार नाही. उलट त्याच्याशीं इतर वंश ताडून पाहून आपणांस त्यांतील उणीव व खंड मोजतां येतील. वर आलेल्या स्थित्यंतरांखेरीज अंतर्देश पादांक्रांत होत चालल्यानेंहि कांही फरक होत होते. याप्रमाणें सोमवंशाच्या पौरव अजमीढापासून उत्तर आणि दक्षिणपंचाल घराणीं उद्भुत झालीं; यादव वंशांतील चेदिराजानें चैद्य घराणें पुढें आणलें, पौरव वसूनें (कुरुवंश) मगधापर्यंत सर्व देश जिंकून आपल्या पांच मुलांत वांटून दिले. हीं मुलें पुढें पाच घराण्यांचे आद्यपुरुष झालीं.