प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
पौराणिक वंशावळींचा विश्वसनीयता - पारौणिक वंशावळींविषयीं पारगिटेर म्हणतो या वंशावळींवरील मुख्य आक्षेप असा कीं, त्या फार पुरातन अशा अज्ञान काळांतील असल्यामुळें व त्या काळीं कोणतीहि माहिती लेखनिबद्ध करून चिरकाल टिकाऊ करून ठेवण्याची साधनें नसल्यामुळें त्या वंशावळींतील प्राचीनतम भाग काल्पनीक व दंतकथात्मक असण्याचा फार संभव आहे. दंतकथात्मक माहितीला विस्मृतीदोषामुळें, पूर्वेतिहासास उज्वल स्वरूप देण्याच्या लालसेमुळें व जुन्या गोष्टींत काल्पनिक भाग घुसडून देण्याच्या प्रवृत्तीमुळें बरेंच असत्य स्वरूप आल्याशिवाय राहांत नाहीं हे दोषसंभव मान्य केलें तरी सदरहूं वंशावळी सर्वतोपरी अविश्वसनीय आहेत असें मानण्याचें मात्र कारण नाहीं.
पारगिटेरचें हें म्हणणें आम्हास ग्राह्य वाटतें. अर्धशतकापूर्वी या प्राचीन दंतकथा केवळ काल्पनीक मानून त्यांवरून कांही लाक्षणिक अनुमानें व उपपत्ती काढण्याचा प्रघात पडलेला होता. या जगाच्या प्रत्येक युगांत शौर्यपराक्रमाची कृत्यें झालेली आहेत; मानवसंघांनी युद्धें करून देश जिंकणें व शांततेच्या काळी लोकहिताची कामें करणें, या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत.
अगदी प्राचीन काळांतहि महापुरुषांनीं मोठाली महत्त्वाचीं कृत्यें केलेलीं असलींच पाहिजेत. अर्थात त्यांच्या स्तुतिपर कवनें व पोवाडे होऊन त्यांत त्या महापुरुषांची चरित्रें कमजास्तमानानें ग्रथित झालेली आहेत व तीच परंपरेनें आज आपणांस उपलब्ध झाली आहेत. इतर देशांतहि जी जुनी वाङमयीन माहिती अर्धशतकापूर्वी अविश्वसनीय मानण्यांत येत असे, तिची सत्यता नवीन शोधामुळे व जमीनीतून उकरून काढलेल्या जिनसांमुळे प्रस्थापित होऊं लागली आहे व आतां सामान्यतः लोक ती विश्वसनीय मानूं लागले आहेत. कै. राजारामशास्त्री भागवत जेव्हां असुर आणि आसिरिया यांचा संबंध जोडते झाले तेव्हां त्या संबंधाविषयीं अत्यंत साशंकता लोकांच्या मनांत उत्पन्न झाली ती आज कमी होत आहे. प्राचीन काळींहि लोकांनां आपल्याप्रमाणें सत्यासत्याची चाड होती; कारण प्राचिन वाङ्मयामध्येंहि सत्याची स्तुती व असत्याची निंदाच केलेली आढळते. असें आहे तर आपल्या पूर्वजांनीं सत्याकडे दुर्लक्ष करून केवळ खोटया गोष्टी व्यवस्थित ग्रथित करून आपल्याकरितां ठेवल्या आहेत. असें मानणें अगदीं मूर्खपणाचें होईल. तात्पर्य, पन्नास वर्षांर्पूीची या प्रश्नाबद्दलची स्थिती आतां अगदीं उलट झाली आहे. म्हणजे तेव्हां प्राचीन दंतकथांवरून घेतलेली माहिती देतांना तिची विश्वासपात्रता लेखकाला अगोदर सिद्ध करावी लागत असे पण हल्ली त्याच्या उलट या कथा सामान्यतः सत्य असें मानण्याचा प्रघात पडला असून एखादी कथा ऐतिहासिक दृष्टया त्याज्य म्हणणारावर तें सिद्ध करण्याचा बोजा पडतो.