प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
दाशराज्ञ युद्धाच्या पूर्वी सर्व हिंदुस्थानची सामाजिक व सांस्कृतिक स्थिति काय असावी आणि मांत्रसंस्कृतीचा संहितीकरणकाली म्हणजे ब्राह्मणकाली सूतसंस्कृतीशी कसा काय मिलाफ झाला या इतिहासभागाचें स्पष्टीकरण करणें आतां प्राप्त होते. पुराणांतील राजावलींच्या याद्या ख-या मानल्या तर दाशराज्ञयुद्धाचा म्हणजे सुदासांचा काल भारती युद्धापूर्वी अजमासें सहाशें वर्षे येतो. या सहाशें वर्षांमध्यें ॠग्वेदांतील आद्य ग्रंथांची रचना झाली व यज्ञसंस्थेच्या विकासाच्या प्रारंभापासून त्याच्या जवळजवळ पूर्ण वाढीपर्यंत क्रिया होऊन गोत्र, मांत्रसंस्कृति व सूतसंस्कृति यांचे एकीकरण करण्याचाहि प्रयत्न झाला. या ब्राह्मण कालांतच ज्या अनेक राष्ट्रांचा उल्लेख आपणांस ग्रंथांत आढळून येतो ती राष्ट्रें दाशराज्ञयुद्धपूर्वी असावी असें मागे आम्ही सांगितलेंच आहे आणि त्यास कारणहि असें दिले आहे कीं, पूर्वेकडील राष्ट्रें पश्चिमेकडील राष्ट्रांपेक्षा अधिक जुनी असली पाहिजेत. आतां प्रश्न येतात ते असेः- (१) मंत्रपूर्व आर्यन् संस्कृतीचा विस्तार दक्षिणेकडे कोठपर्यंत झाला असावा. (२) त्यांचे वाङ्मय कशा स्वरूपाचें असावें. (३) त्यांची दैवतें व मांत्रांची दैवतें यांत सादृश्य व फरक काय असावा. (४) ब्राह्मणास्तित्वाच्या पूर्वीचा हा काल असल्यामुळें त्यावेळी भिक्षुकी उर्फ परमार्योद्यमांत गुंतलेल्या वर्गाची स्थिति कशा प्रकारची असावी.
या चार प्रश्नांवर उत्तरे साधारणपणें येणेंप्रमाणें देतां येतील.
वैदर्भी भीम यांचा उल्लेख ऐतरेय ब्राह्मणांत (७. ३४) आहे. यावरून व-हाड पर्यंत आर्यनसंस्कृतीचें लोक आले होतें हे उघड आहे. पूर्वेकडे आर्यन लोकांचा प्रसार कितपत झाला होता याविषयी निश्चयात्मक विधान करतां येत नाहीं. भारती युद्धामध्यें थेट आराकानच्या डोंगरापर्यंत पसरलेलीं राष्ट्रे युद्धार्थ आली होती असें दिसतें परंतु त्यांची भाषाविषयक स्थिति कशी अशावी, ती राष्ट्रें आर्यन वंशातील होती अगर मंगोलियन वंशांतील होती हे निश्चयानें सांगतां येत नाहीं. बिहारपर्यंतची वसाहत आर्य जातींचीच होती एवढें मात्र निश्चयानें सांगतां येतें. कांकी, पुरुषयेधांत बळी म्हणून मागधांचा उल्लेख आहे आणि त्या मागधांचा संबंध विश्वामित्र सूक्तातील कीकटापैकी प्रमगंदाशी (ॠ. ३. ५३, १४) पोहोचवितां येतो हे पूर्वी दाखविलेच आहे. म्हणजे मगधापर्यंत पूर्वेकडे निश्चितपणें आर्यन लोकांची वसाहत होती आणि दक्षिणेकडे आजच्या महाराष्ट्राच्या अंतिम दक्षिणभागाकडे नसली तरी व-हाडपर्यंत होती हेहि निश्चियानें सांगतां येतें.
सिंहलट्टीपांतील सिंहली लोकांची भाषा आर्यन आहे. बुद्धानंतर एक दोन शतकांनी जरी संप्रदायप्रसारार्थ लोक गेले तरी स्थानिक भाषा आर्यन् असून मागधी (पाली)पेक्षां भिन्न अशा स्वरूपांत त्यांस आढळली हें स्पष्ट आहे. तर ही वसाहत मंत्रपूर्व असावी की कुरुयुद्धोत्तर असावी यावषियी निश्चयात्मक विधान करतां येत नाहीं. कुरुयुद्धपूर्व असावी असें समजण्यास एकच आधार आहे आणि तो हा कीं, वाल्मिकीरामायणकर्त्याच्या मतें जनस्थानाच्या दक्षिणेपासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश जरी भिन्न प्रकारच्या लोकांचा वसला असला तरी सिंहलद्वीपांतील संस्कृति आपल्या सदृश आहे अशी कल्पना झालेली दिसतें. आणि उत्तरकाली रावण हा आपल्या सदृशच होता ही कल्पना इतकी दृढ झाली की दंतकथांनीं त्यास वेदभाष्यकार बनविलें आहे. एळु उर्फ जुन्या सिंहली भाषेंच पृथक्करण करून एळु भाषा जरी आर्यन् ठरते तरी ती वेदभाषासंभव नाहीं हेंहि उघडच आहे तिचें वेदभाषेपासून व इतर भारतीय भाषेपासून इतकें भिन्नत्व स्थपित झालें आहे कीं, तिला चिकटी भाषा म्हणावें की. प्रत्ययान्त भाषा म्हणावे याविषयीच संशोधकास संशय उत्पन्न झाला होता. आर्यन भाषा असून भारतीय अनेक भाषांपासून ज्या अर्थी सिंहली भाषा इतकी भिन्न आहे त्या अर्थी तिचा द्वीपकल्पीय तुटकपणा बरीच शतकें प्रस्थापित झाला असला पाहिजे आणि त्यावरून आम्ही असें म्हणतों की, दाशराज्ञयुद्धाच्या सुमारासदेखील सिंहलद्वीप आर्यन भाषांनी व्यापिला गेला असणे अशक्य नाहीं.
थोडक्यांत असें म्हणतां येईल की आर्यन, भाषेंत व्यापलेले क्षेत्र आज जेवढें आहे तेवढेंच जवळ जवळ दाशराज्ञयुद्धकालीं म्हणजे वेदपूर्वकाली असावे.
हें सर्व मंत्रपूर्व आर्यन् संस्कृतीच्या व्यापकतेसंबंधानें झाले. आंता दुस-या प्रश्नांकडे लक्ष देऊं.
वाङ्मयाचें स्वरूप कसें असावें हें निश्चितपणें सांगता येत नाहीं. कारण वाङमयाचें विकृत झालेले स्वरूप अनेक परंपरातून उरलेले आहे. इतिहासपुराणाचा उल्लेख तर वेदांतच आहे आणि शांखायनीय अश्वमेधाच्या वर्णनात त्याच्या प्रवचनाला व संपवेदाच्या प्रवचनाला व गंधर्ववेदाच्या प्रवचनाला दिवस तोडून दिलेले आहेत. महाभारतात ज्या अनेक कथा येऊन गेल्या आहेत त्यांतील अनेक कथा प्राचीन म्हणून घातल्या आहेत. अशा कथात नैषध, हरिश्चंद्र, दाशरथीराम, सत्यवान, सावित्रि, दुष्यन्त इत्यादि कथाचा उल्लेख करतां येईल. मान्धाता, अम्बरीष हेहि प्राचीन राजर्षि सूतकथाचे नायक असावेत. परशुरामाच्या एकवीस वेळा निःक्षत्रिय पृथ्वी केल्याच्या कथेबद्दल निश्चित मत देतां येत नाहीं. कारण तींत ब्राह्मणी हात शिरल्याचा संशय येतो. आविक्षितमरुत्त हा प्राचीन राजा म्हणून पुराणात वर्णिला आहे व ही गोष्ट तारीफ करण्याकरितां ब्राह्मणेंहि उचलतात, ते आविक्षितमरुत्तहि बराच वेदपूर्व असावा असे वाटतें. दाशरथी रामहि वेदपूर्वच असावा. त्याचा काल पुराणांतील यादींच्या प्रमाणे सुदासाच्या पूर्वी दोनएकशें वर्षे येतो. अर्थात रामकथेची तीन भिन्नभिन्न प्रकारची मांडणी आपणास दृष्टीस पडते. जैन कथेत सीता रावणाची मुलगी केली आहे तर बौद्धानी तिला रामाचीच बहीण केली आहे व रामरावणयुद्धाच्या प्रसंगाविषयी पूर्णपणे अपरिचितता दाखविली आहे.
एवंच आपणांस एवढेच म्हणता येईल की राजस्थानांतील भाटांनी आपल्या राजांकरिता ज्याप्रमाणें कवनें केली त्याप्रमाणें प्राचीन काळीहि कवने झाली असावीत. आणि त्या कवनांची भाषा आजच्या संस्कृतापेक्षा किंवा अत्यंत प्राचीन अशा प्राकृतापेक्षां भिन्न असावी.