प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति

कालैक्यें व ती काढतांना लागणारी सावधगिरी - या वंशावळीचा अभ्यास करितांना कालैक्याकडे चांगले लक्ष्य ठेविलें पाहिजे. एरवी नुसत्या वंशावळींनां कांहीच महत्त्व येणार नाही. राजे व ॠषी यांच्या संबंधींच्या अनेक   ख-याखोटया कथा आहेत. तेव्हां कांही तरी ठराविक कसोटीला लावून त्यांतील ख-याखोटयांचे पृथक्करण केलें पाहिजें. त्यांतून आपणांस बरीचशीं कालैक्यें पुष्कळ अंशीं खरीं म्हणून गोळा करितां येतील व त्यांवरून चांगलीं अनुमानें काढतां येतील.

हीं अनुमानें काढतांनां कांही गोष्टीविषयीं विशेष काळजी घ्यावी लागते. या गोष्टी म्हणजे, प्रथमतः पैतृकनामावरून पितापुत्रांचें नातें नेहमीच निघतें असें नाहीं तर तें नाम पुष्कळदां वंशज या अर्थी असतें; उदाहरणार्थ विश्वामित्राला त्याच्या आजोबांच्या नांवावरून कौशिक, दाशरथी रामाला राघव आणि कृष्णाला माधव, सात्वत, वार्ष्णेय, दाशार्ह, शौरी, अशीं पैतृक नावें असत. दुसरी गोष्ट म्हणजे साधें नांव नेहमींच मूळपुरूषवाचक नसतें पण कधीं कधीं वंशजांनांहि लावण्यांत येतें. ॠषींच्या बाबतीत ही नोष्ट विशेष लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. उदा. वसिष्ठाचें नांव सूर्यवंशाच्या सर्व काळी दृष्टीस पडतें व तें वसिष्ठकुलाची परंपरा दर्शवितें. याच अर्थी भरद्वाज, कण्व, गौतम, भुगृ, अत्रि इत्यादि निरनिराळया काळीं दृष्टीस पडणारीं नांवें घेतली पाहिजेत.  आणखी एक गोष्ट म्हणजे कधीं कधी एकच नांव अनेक व्यक्तीचें असल्याने, त्या व्यक्तींच्या निरनिराळया कथा एकाच व्यक्तींवर आरोपित केलेल्या असतात. अशा ठिकाणीं सावधगिरी बाळगावी लागते. धृतराष्ट्र, जनमेजय, ब्रह्मदत्त, भीष्म, भीम इत्यादि नांवाचे अनेक राजे होऊन गेले आहेत. त्याचप्रमाणें दिवोदास सुदास किंवा सृंजय या नांवांचे एकाहून अधिक राजे होते. हीच गोष्ट ॠषींच्या बाबतींतहि लागू आहे.

आतां यापुढें निरनिराळीं घराणीं घेऊन त्यांविषयी आधार व थोडे विवेचन ज पारगिटेर देतो तें त्यांचें विवेचन आम्ही जसेंच्या तसेंच देत आहों. वैवस्वतमनूपासून सर्व कुलें निर्माण झालीं; सूर्य आणि विदेहवंश त्याच्या इक्ष्वाकु पुत्रापासून, विशाल घराणें त्याच्या नेदिष्ठ पुत्रापासून आणि त्याची कन्या इला हिच्या पुरुरवस् पुत्रापासून इतर सर्व घराणीं उदयास आली. पुरुरव्याचा वंश म्हणजे आयु, नहुष, ययाति  आणि पुढें ययातीचें पांच पुत्र यदु, तुर्वसु, द्रुह्यु, अनु, आणि पुरु. मनूच्या इक्ष्वापुत्रापासून निघालेला अयोध्येचा सूर्यवंश अनेक पुराणें आणि रामायण यांतून वर्णिला आहे. पुराणांतून दिलेली वंशावळ जुळतें पण रामायणांतील मात्र भिन्न आहे. रामायणांतल्या वंशावळीचें नीट परीक्षण करितां ती चुकीची आहे असेंच म्हणणे भाग पडतें, तेव्हां ती बाजूला सारून पुराणवंशावळच स्वीकारली पाहिजे.

विदेहवंश इक्ष्वाकूच्या निमिपुत्रापासून निघाला. भागवत, गरूड, वायु आणि विष्णु अशा चार पुराणांतून व रामायणांतून हा विस्तारलेला आहे. या सर्वांची बहुतेक एकवाक्यता आहे. यांत पुष्कळ राजांचें जनक असें नांव आहे पण तें व्यक्तिनाम नसून गोत्रनाम किंवा राजविशेषण असावें.

ययातीच्या यदुपुत्रापासून यादववंश निघाला असें विधान पुराणांत आहे. याचे दोन फांटे झाले. एक यदूच्या सहस्त्रजित पुत्रापासून- याच्या हैहय व तालजंघ अशा दोन शाखा प्रसिद्धीस आल्या. दुस-या त्याच्या कोष्ठु नांवाच्या पुत्रापासून- हें घराणें चिरकाल टिकलें होतें. यादववंशाविषयी सर्व आधारांची एकवाक्यता आहे. याच वंशांत कंस व कृष्ण होऊन गलें.

पौरव (किंवा सोम) वंश ययातीच्या पुरू नांवाच्या पुत्रापासून निघाला. हा महाभारत व इतर अनेक पुराणांत विस्तारलेला आहे. महाभारताखेरीज सर्व पुराणांची या वंशावळीतील पिढयासंबंधी बहुतेक एकवाक्यता आहे. महाभारतांत ज्या दोन याद्या आहेत त्या मात्र भिन्न असून एकमेकींशीहि जुळत नाहींत. या सर्व याद्या ताडून पाहातां, पुराणवंशयादीच बरोबर दिसते.

अहिच्छत्राच्या गादीवर असलेला उत्तर पंचालवंश सोमवंशांतील अजमीढापासून निघाला. हा अनेक पुराणांत सारखाच वर्णिला आहे. ॠग्वेदांत सुद्धां या वंशांतील कांहीं पिढया आहेत. सृंजय व सोमक कुलें यांच्याच शाखा असून ब्राह्मणवाङ्मयांत यांचा विशेष उल्लेख आहे. कांपिल्य येथील दक्षिण पंचालवंश हा अजमीढापासून निघालेला दुसरा वंश होय. हा अनेक पुराणांत दिला असून, त्यांत यासंबंधी एकवाक्यताहि आहे.
अजमीढाचा भाऊ द्विमीढ यापासून निघालेला मध्यदेशांत दुसरा एक वंश होता. कांही पुराणांत हा उल्लेखिला असून त्यांत बहुवंशी एकवाक्यता आहे.

कुरूपासून पांचवी पिढी वसु, यानें एक घराणें स्थापिलें. यानें चेदि राज्य बळकावून आपणाला चैदिद्य- उपरिचर असें विशेषण घेतलें. मगध देशापर्यंत यानें दिग्विजय मिळविला. त्याच्या घराण्याला मगधवंश असें म्हणावें. याचें वर्णन कांही पुराणांतून बहुतेक सारखेच आढळतें.

ज्यांत गाधि आणि विश्वामित्र होऊन गेलें, तो वंश कान्यकुब्ज येथें राज्यारूढ होता. निरनिराळया ठिकाणीं याचें सारखेंच स्वरूप दिलें आहे, पण पूर्वज मात्र दोन निरनिराळे सांगितले आहेत. पुरुरवसचा पुत्र अमावसु याच्यापासून याची उत्पत्ति झाली याविषयी बहुमत पडतें. भरत विश्वामित्राचा पूर्वज धरणें गैरवाजवी होतें, तेव्हां ज्या वंशावळींतून विश्वामित्राचा पूर्वज जो जःहु याला भरताचा वंशज केले आहे त्या वंशावळी चुकीच्या असल्या पाहिजेत.

काशींत काशीवंश असें. या वंशांतील सुहोत्र आणि सोमवंशांतील सुहोत्र यांची घालमेल होऊन निरनिराळया पुराणांत सुहोत्राचे निरनिराळे पूर्वज दिले आहेत. सुहोत्रापासून पुढच्या पिढया सर्व पुराणांतून बहुतेक सारख्याच आहेत.

ययातीच्या अनु नांवाच्या पुत्राचे वंशज पंजाबांत केकय, शिबि इत्यादि जातीत आणि पूर्वेकडे अंग घराण्यांत समाविष्ट झाले. जयद्रथामागून अंग घराण्याच्या दोन शाखा झाल्या. धाकटया शाखेंत कर्ण जन्मला असून तो पुढें राजा झाला. महाभारतांत मात्र कर्ण व जयद्रथ हे समकालीन दाखविले आहेत.

मनूच्या (दिष्ट किंवा नेदिष्ट) पुत्रापासून दुसरा एक वंश स्थापन झाला.या वंशांतील विशाल व त्यापुढील राजांनीं विशाला किंवा वैशाली घराणें स्थापिलें. याला दिष्टवंश म्हणावें. याच्या पिढयांविषयी एकवाक्यता आहे.
यापुढें, वंशावळीच्या याद्या देऊन कालैक्यें समजावून देणें आहे. पुढील तक्त्यांतून यासंबंधीचा निर्णय दाखविला आहे.यांत मनूपासूनचे जेवढे महत्वाचे वंश होते तेवढे दाखविले आहेत. ॠचीक, जमदग्नि व राम हे तीन भार्गव ॠषी त्यांच्या वेळची कालैक्यें स्पष्ट होण्यासाठी यांत ग्रथिंत केले आहेत. यांतील वंश होतांहोईतो भौगोलिक स्थानाप्रमाणें मांडले आहेत, म्हणजे पश्चिमेकडे होऊन गेलेली घराणी तक्त्यांत डाव्या बाजूला. मध्यदेशांतील मध्यभागी आणि पूर्वेकडील घराणीं उजव्या बाजूला लिहिली आहेत. ज्यांची स्थानें कालैक्यांनीं अगदीं निश्चित झाली आहेत. अशा सर्व राजांच्या नांवापूर्वी * अशी फुली आहे; कंसांतील नांवे, ज्यांचा वंशावळींत उल्लेख नाही पण कालैक्यांचा विचार करितानां ज्याचें अस्तित्व उघडकीस आलें अशा राजांची आहेत. ज्या काहीं याद्या, मग त्या एका कालैक्यापासून दुस-या कालैक्यापर्यंत पोचल्या असल्या तरी, इतरांपेक्षां कमी भरलेल्या दिसतात; त्यांतील नांवें गळलेलीं आढळतील. गळलेंलीं नावें कोठें येतात हें माहीत नसल्यानें, त्या याद्यातील नांवें नुसती अंतर टाकून मांडली आहेत; आणि ज्या ठिकाणीं कालैक्ये नाहींत त्या ठिकाणीं शक्य तितकें चांगलें अनुमान बांधून, काम भागविलें आहे. तक्त्यांत आलेल्या चक्रवर्ती राजांपुढे x असें गुणिलें चिन्ह दाखविलें आहे. जे राजे आपल्या सभोवतालच्या प्रदेशावर वर्चस्व स्थापित, व तेथील राजांनां आपले मांडलिक बनवीत अशांनां चक्रवर्ती किंवा सम्राज ही पदवी असे. यांच्या विजयामुळें शेजारच्या राजवंशातून अंदाधुंदी झाल्यास नवल नाहीं. व यामुळें याच्या काळच्या शेजारील राजवंशावळींत विस्कळीतपणा दिसून येतो. शिवाय अशा चक्रवर्ती राजाच्या कारकीर्दी बहुधा मोठया असाव्यात, असें दिसतें.

पुढील तक्त्यांत आपणांस असें दिसून येईल की, यादव, पौरव, काशी,सूर्य, दिष्ट व अनु हे वंश मनूपासून निघाले आहेत. त्यांपैकी यादववंश, सूर्यवंश व विदेहवंश या घराण्यांच्या वंशावळी ब-याच मोठया असून त्यांतील बहुतेक नांवाची स्मृति परंपरेनें चालत आलेली आहे व यांत फारच थोडी नांवे गळलेली दिसतात. पौरव कुलांत जरी बरीच नांवे दिसली तरी मध्यंतरी मोठमोठी रिक्तस्थानें आढळतात. अनुवंशाचीहि वंशावळ बरीच मोठी व दीर्घकालापर्यंत पसरलेली आहे. पण तीतहि रिक्तस्थानें मधून मधून बरीच आढळतात. काशीवंश व द्विष्टवंश हे यानंतरचे महत्त्वाचे वंश होत. यांचा लोप दाशरथी रामाच्या सुमारास झालेला आढळतो. बाकीचे वंश या मानानें कमी महत्वाचे असून कांहीचा आरंभ बराच उत्तरकालीन दाखविला आहे.

 पुराणांतील वंशावळयांचे कालैक्यदर्शक कोष्टक

वरीलप्रमाणें कोष्टक तयार करून त्यांत आढळणा-या महत्त्वाच्या कालैक्यांसबंधानें पारगिटेर कालानुक्रम दिग्दर्शित येणें प्रमाणें करतो.


अगदीं प्रथमचें कालैक्य म्हणजे, ययातीचा सर्वांत वडील भाऊ जो यति त्यानें ककुस्थाच्या गो नांवाच्या मुलीशी लग्न केलें. हा ककुस्थ सूर्यवंशांतील ककुस्थच असावा. तेव्हां ययाति ककुस्थानंतरच्या पहिल्या पिढीतील होता. हें कालैक्य आमच्या मतें विश्वसनीय नाहीं कां की, अनेक राष्ट्रांचा जनक असा वर्णिलेला ययाति आम्हांस खरोखर व्यक्ति नसून काल्पनिक असावा असें वाटतें.

मान्धातृच्या काळीं सूर्य, सोम आणि यादववंश यांच्यातील संबंध स्पष्ट आहे. सोमावंशाच्या मतिनाराची मुलगी गौरी हिचें सूर्यवंशाच्या प्रसेनजिताशी किंवा त्याचा मुलगा यौवनाश्व (२ रा.) याच्याशीं लग्न लागलें होतें आणि म्हणून ती मान्धातृवी आजी किंवा आई होती. या विधानालाच बरेचसे आधार मिळतात. कसेंहि असलें तरी मतिनार हा प्रेसनजिताचा समकालीन होता.

 


मान्धातृनें शशबिन्दूची मुलगी बिन्दुमती चैत्ररथी हिशीं लग्न केलें. हा शशबिन्दु यादववंशांतील चैत्ररथाचा विख्यात पुत्र असावा कारण याविषयी अनेक पुरावे आढळतात. तेव्हां शशबिन्दु आणि दुसरा यौवनाश्व समकालीन ठरले.

अनुवंशांतील उशीनराचा पुत्र शिबि याला चार पुत्र होते. त्यांनी वृषदर्भ, सुवीर, केकय (किंवा कैकेय) आणि मद्र अशीं पंजाबांत चार घराणीं स्थापन केलीं. सूर्यवंशाच्या त्रिशंकूनें एका कैकेय राजकन्येशीं लगन लाविलें. या वरून कैकेयघराणें त्रिशकूच्या पूर्वी स्थापन झालें असलें पाहिजें आणि म्हणून शिबीला त्रिशंकूच्या आधींच्या दोन तीन पिढयांत घालतां येणार नाहीं.

यापुढील कालैक्य म्हणजें, कान्यकुब्जघराण्यांतल्या जह्नूनें युवनाश्वाच्या कावेरी नांवाच्या मुलीशी किंवा नातीशी लग्न केलें. हा युवनाश्व सूर्यवंशातींल दुसरा युवनाश्व असावा; कारण ज्या अर्थी या नांवाचा नुसताच उल्लेख केला आहे त्या अर्थी जो प्रख्यात असेल तोच धरला पाहिजे, पण पहिला युवनाश्व प्रख्यात नव्हता. तेव्हां दुसराच असला पाहिजे, हें ठरतें. तेव्हा जह्नूला पुरुकुत्साच्या शेजारी बसविला पाहिजे. जह्नु राजा प्रख्यात्  होता. (याच्याच नांवावरून गंगेला जाह्नवी असे नांव आहे.) पण तो युवनाश्वपुत्र चक्रवर्ती मान्धातृ याच्या मृत्यूनंतरच पुढें आला असावा; तेव्हां यांची पिढी मान्धातृच्या पुढची एक होते; व त्याची पत्नी बहुधा युवनाश्वाची नात होती.

यापुढ विश्वामित्र आणि त्याचे समकालीन यांचा विचार करूं. याठिकाणी मागील सूचना लक्ष्यांत आणून विश्वामित्र नांवाचा आद्य पुरुष घेतला पाहिजे; कारण विश्वामित्रगोत्राचें अनेक वंशज आहेत. प्रसिद्ध विश्वामित्र कान्यकुब्ज देशाचा राजा गाधी किंवा गाथिन् याचा पुत्र असून यांचे क्षत्रिय नांव विश्वरथ होतें. याचा सूर्यवंशाशीं निकट संबंध होता. याच्या पित्याची आई पौरुकुन्सा किंवा पौरुकुत्सी, पुरुकुत्साची मुलगी किंवा कोणी वंशजा होती; हा पुरुकुत्स अयोध्येचा (या नांवाचा) प्रख्यात राजाच असला पाहिजे. हिच्या पैतृक नामावरून सामान्यतः ही पुरुकुत्साची मुलगी असावीशी वाटते, पण मागें जी सूचना केली आहे तीवरून तसेंच असेल असें नाहीं; ती चार पांच पिढया पुढची वंशजाहि असूं शकेल. या नात्यांसंबंधी जास्त विवेचन जरूर असल्यानें व त्या योगानें आपले मागील सिद्धांत व सूचना लावून पाहाण्याची संधी येत असल्यामुळें या नात्याविषयीं आतां विचार करूं.
जर पौरुकुत्सा पुरुकुत्सांची मुलगी असेल तर विश्वामित्र तीन पिढया त्याच्या खाली येईल, आणि जर निपणती असेल तर सहा पिढया खालीं येईल. याला आणखी एक पिढी जोडली पाहिजे, कारण वास्तविक विश्वामित्र व त्याच्या सत्यवती बहिणीचा मुलगा जमदग्नि एकाच वेळी जन्मलें; तेव्हां विश्वामित्र गाधीच्या खाली दोन पाय-या येतो. वरील मत ग्रहण केल्यास विश्वामित्र गाधीच्या चार किंवा सात पिढया खाली येईल. “पौरुकुत्सा” वरून निघणारें नक्की नातें दुस-या गोष्टींवरहि अवलंबून आहे. कथापुराणांतून पुरुकुत्सामागून गादीवर बसणारा नववा राजा जो सत्यव्रत त्रिशंकु आणि त्याचे वारस यांचा विश्वामित्रांशीं निकट संबंध जोडलेला दृष्टीस पडतो. त्रिशंकु व वसिष्ठ यांचे वैर विश्वामित्रांशीं त्यांचे सख्य, त्रिशंकुपुत्र हरिश्चंद्र यानें वरुणाला केलेला नवस, रोहिताबद्दल शुनःशेपाचा बलि, विश्वामित्रानें शुनःशेपाला पुत्र केल्याची कथा इत्यादि गोष्टी पौरुकुत्सा पुरुकुत्साची मुलगी धरून शक्य दिसत नसून चवथ्या पिढीतील वंशजा घेतल्यानें जमतात. गाधीची मुलगी सत्यवती हिचें ॠचीक भार्गव ॠषीबरोबर लग्न लागलें होतें. तिचा मुलगा जमदग्नि हा विश्वामित्राबरोबरच जन्मला. जमदग्नीला बरीच मुलें होती त्यांपैकी राम सर्वांत धाकटा होता.

यावरून पारगिटेर म्हणतो कीं, गाधीचा पिता पुरुकुत्साच्या चार पांच पिढया मागचा, विश्वामित्र, त्रिशंकु, हरिश्चंद्र, जमदग्नि, आणि अजीगर्त (शुनःशेपाचा पिता) हे समकालीन, आणि रोहित, शुनःशेप आणि जामदग्न्यराम हेहि समकालीन होते.

जमदग्नि आणि राम यांची कालैक्यें आणखी आहेत. हैहयांचा राजा कार्तवीर्यार्जुन आणि भार्गव यांच्यामधील लढायांवरून अर्जुन हा जमदग्नीचा समकालीन होतासें दिसतें. हरिश्चंद्राच्या वेळेपासून याची कारकीर्द सुरू होऊन रोहित आणि हरित यांच्या कारकीर्दीपर्यंत लांबली होती.

परशुरामकथेचें स्पष्टीकरण पारगिटेर असें करतो की अर्जुनाचा नातू तालजंघ यानें हैह्याच्या पांच जाती केल्या. हा रामाचा तरुण समकालीन होता व रामाच्या अंतकाळी किंवा मृत्यूनंतर महाराष्ट्रांत बराच प्रबल झाला. रामानें एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्याबद्दलची कथा खरी नसून, रामाच्या जागी तालजंघ- हैहय घातल्यास ते कांहीसें सत्य होईल; कारण त्यांनी उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत करून सर्व राजांनां मांडलिक बनविलें होते. भार्गव आणि हैहय यांनी आपले जुनें वैर विसरून एकत्र होऊन दिग्विजयास प्रारंभ केला असावा; व हा दिग्विजय ब्राह्मणानी रामाच्या अंगी लाविला. याचे हुबेहूब प्रतिरूप मराठयांच्या इतिहासांत सांपडते. ब्राह्मण आणि सेना एकत्र झाल्या होत्या. ते देशावर स्वा-या करून तो कायमचा पादाक्रांत करीत नसत तर दर वर्षी मोहिमा काढीत व पुन्हा हल्ले चढवीत. अशा प्रकारच्या अर्धशतक चाललेल्या उच्छेदक स्वा-यांनां (तालजंघ- हैह्यांचे राज्यहि पण अर्धे शतकच चाललें होतें.)एकवीस वेळां क्षत्रियांचें निर्मूलन असे नांव देणें गैर होणार नाहीं. आणखी सादृश्य दाखवावयाचे झाल्यास मराठयांच्या अमदानींत ज्याप्रमाणें पर्शूनीं नादिरशहाच्या अधिपत्याखाली एकदां आणि अफगाणांनी अहमदशहाच्या नेतृत्वाखाली चारदां हिंदुस्थानावर स्वा-या केल्या, त्याचप्रमाणें हैह्यानीं पादाक्रांत केल्यामुळें उडालेल्या धांदलींत पह्लव, पारद, कांबोज, शक आणि इतर टोळया वायव्येकडून हिंदुस्थानांत घुसल्या.

यानंतर काशीचे राजे आणि हैहय राजे यांमधील कालैक्यांचा प्रश्न निघतो. यांच्यांतील वैराला हैहय वंशातील भद्रश्रेण्यापासून आरंभ होऊन, तें वांतहव्यापर्यंत टिकलें. कथानकांतून दिवोदास नांवाच्या काशीच्या एका राजाला भद्रश्रेण्याच्या मुलाचा समकालीन करून, त्यालाच किंवा त्याचा मुलगा प्रतर्दन याला वीतहव्याचाहि समकालीन म्हटलें आहे. आतां एकच दिवोदास घेतल्यास हें अनेक कारणांवरून अशक्य दिसतें.  भद्रश्रेण्य आणि वीतहव्य यांच्यात नऊ दहा पिढयांचे तरी अंतर आहे. तेव्हां काशीवंशांत दोन दिवोदास, मध्यें सहा सात राजे सोडून, होऊन गेले.

पहिला दिवोदास भद्रश्रेण्याच्या जरा पूर्वीचा होता असें दिसतें. आणखी काहीं माहितीवरून सगर आणि विदर्भाचे राजे यांच्याशीं तुलना करून प्रतर्दनाचें स्थान ठरवितां येणें शक्य आहे.

सगराला दोन बायका होत्या. त्यांपैकी एक विदर्भकन्या वैदर्भी. हा विदर्भ यादववंशांतील ज्यामघाचा मुलगा असला पाहिजे. तेव्हां हा सगराच्या जरा अलीकडला आहे काशीचा राजा अलर्क प्रतर्दनाचा नातू दिसतो व  लोपामुद्रेच्या आशिर्वादाने त्याला दीर्घायुष्य लाभलें अशी कथा आहे. लोपामुद्रा निमि नांवाच्या कोणा एका विदर्भ राजाची कन्या असून तिनें अगस्त्यॠषींशी लग्न लाविलें. विदर्भवंशांत निमीचे नांव मुळींच नाहीं, तथापि विदर्भानंतरच्या राजांची नांवे स्पष्ट नसल्यानें, तो विदर्भानंतरच्या नजीकच्या पिढीतील असावा. कारण दाशहिराज्यांच्या पुढील सर्व राजकन्यांनां त्यांच्या नांवांवरून दाशाहीं असे संबोधीत. तेव्हां लोपामुद्रेचा कुन्ति राजाशी व अलकीचा धृष्ठि राजाशीं (हे दोनहि विदर्भ राजे होत) समकाल आहे. यावरून प्रतर्दन आणि सगर हे समकालनि असून त्या उभयंतांनीं तालजंघ- हैह्यांचे वर्चस्व मोडून टाकलें असे सिद्ध होतें.

आतां  दिष्टवंशांतील अवीक्षितपुत्र चक्रवर्ती मरुत्त आणि त्याचा वंशज तृणबिन्दु यांचे स्थान ठरविण्याचा कांही प्रयत्न करूं. अवीक्षित किंवा त्याचा पिता करंधम त्रेतायुगाच्या आरंभाला होते असें म्हटलें आहे; आणि तृणबिन्दु “त्रेतायुगाच्या तिस-या महिन्यांत” (त्रेता-युग-मुख तृतीय. वायु. २,२४.१५), म्हणजे त्या युगाच्या तिस-या पादाच्या आरंभाला होऊन गेला. वंशांवळींत कोणत्या ठिकाणी ते युग सुरू झाले असें समजावें हें स्पष्ट नाहीं. असें म्हटलें  आहे कीं, जामदग्न्य राम त्रेतायुगांत, आणि दाशरथि राम त्रेता आणि द्वापर युगांच्या मध्यंतरी होता. याच्या पुढील विधान, विश्वामित्र याच मध्यकाली होऊन गेला,हें वरील दोन गोष्टींशी अगदीं विसंगत दिसतें, आणि कदाचित् तो कृत आणि त्रेतायुगांच्या मध्यकालीं, होऊन गेला असें समजणें रास्त होईल. व अशा त-हेनें वंशावळींत चांगले भाग पाडतां येऊन तो आपल्या कार्याला चांगला उपन्यास होईल. यावरून अजमासानें मरुत्ताला जामदग्न्य रामाच्या कालीं आणि तृणबिन्दूला सूर्यवंशांतील अंबरीषाच्या पुढील पिढीत टाकतां येईल.

सोमवंशांत मतिनाराचें स्थान तर ठरविलेंच आहे. आतां दुष्यन्त आणि त्याचा पुत्र भरत यासंबंधी विचार करूं.
दुष्यन्तानें विश्वामित्रकन्या शकुन्तला इच्याशीं लग्न लाविल्याचें प्रसिद्ध आहे. जर हा विश्वामित्र पहिला प्रख्यात विश्वामित्र असेल तर दुष्यन्ताला हरिश्चंद्र किंवा रोहित यांच्या पंक्तीला व भरताला त्याच्या लगेच पुढें बसवावें लागेल; पण असें केल्यानें दोन तीन गोष्टींनां बाध येतो. एकतर  भरताच्या मागून येणा-या राजांचा हैहयांनी धुव्वा उडवून द्यावयास पाहिजे होता पण तो दिलेला दिसत नाहीं. भरताला तीन वैदर्भी राण्या होत्या; व विदर्भाचें स्थान यानंतरचें हें मागें दाखविलेंच आहे. भरताच्या मागूनचा दुसरा राजा भूमन्यु याचें लग्न, ब-याच पुढील कालांत झालेल्या दाशार्ह राज्याच्या मुलीशीं (किंवा वंशजेशीं) लागलें होतें. या तीन गोष्टींवरून वरील प्रश्नाचा उलगडा होतो व विश्वामित्र याचा अर्थ विश्वामित्राचा एक वंशज असा घेतल्यानें आपल्या पहिल्या विधानालाहि बाध येऊ शकत नाहीं. तेव्हां मुद्देसूद अनुमानें म्हणजे, भूमन्यूनें दाशार्हकन्येशीं विवाह केला, भरत विदर्भानंतर तीन-चार पिढया पुढें झाला आणि शकुन्तलेचा पिता प्रख्यात विश्वामित्राचा लगतचाच वंशज होता. यावरून भूमन्यूचा काल दाशार्हानंतरचा असून तो सूर्यवंशाच्या नाभागाशीं नामकालीन, भरत पहिल्या दिलीपाशीं आणि दुष्यन्त अंशुमानाशीं समकालीन होता हें ठरतें.

या निर्णयावरून मतिनार आणि दुष्यन्त यांच्यांत मोठी खिंड पडते, कारण त्यांच्यामध्यें सारी दोन तीनच नांवें आहेत. पण दुस-या गोष्टी लक्ष्यांत घेतां याचें फारसें आश्चर्य वाटावयास नको.
पूरूचें राज्य मध्यदेशाच्या मध्यभागीं- जी सर्वकाली युद्धमान कुलांची रणभूमि बनली होती- असल्यानें, त्यांत चिरकाल अंदाधुंदी माजून राजपरंपरा नष्ट झाली असावी. मतिनाराचें राज्य चक्रवर्ती शशबिन्दूनें नैर्ॠत्येकडून येऊन बळकावले व त्यानंतर अयोध्येचा मान्धातृ, वायव्येकडील उशिनारपुत्र शिबि, माहिष्मतीचा कार्तवीर्यार्जुन, दिष्टवंशांतील अविक्षितपुत्र मरुत्त, हैह्यांचे वर्चस्व (व वायव्येकडून येणा-या टोळधाडी) आणि शेवटीं अयोध्येचा सगर, यांच्या काळच्या सुमारास त्याला चिरकाल ग्रहण लागलें. सगराच्या वेळीं दुष्यन्त तरुण असून पौरव गादीवर आपण बसूं याविषयीं त्याला मुळींच आशा नसावी.  तेव्हां, करन्धयाचा पुत्र मरुत्त हा निपुत्रिक असल्यानें त्यानें दुष्यन्न पौरव याला दत्तक घेतलें, आणि पुढें दुष्यन्तानें आपली गादी परत मिळवून तो वंश चालविला. या विधानावर आपला चांगला विश्वास बसतो. यावरून दुष्यन्ताला पौरवांचा “वंशकर” असें जें संबोधण्यांत येतें त्याची यथार्थता दिसून येते.

भारताच्या कथेवरून दुसरे संबंध उघडकीस येतात. अंगिरस कुळांत दोन ॠषी होऊन गेले. एक उचथ्य व दुसरा त्याचा धाकटा भाऊ बृहस्पति. उचथ्याला त्याच्या ममता नांवाच्या स्त्रीपासून दीर्घतमस् नांवाचा जन्मान्ध पुत्र झाला. व बृहस्पतीला ममतेपासूनच भरद्वाज नांवाचा पुत्र झाला. मोठेपणीं त्याला गंगेत टाकलें असतां तो वहात पूर्वेकडील बलिराज्यांत आला. तेथें त्याला वर काढण्यांत येऊन, त्यानें बलीच्या इच्छेनुसार राणीच्या ठिकाणी अंग आणि इतर चार पुत्र उत्पन्न केले. अशा प्रकारचा एक उचथ्य व ममता यांचा पुत्र दधिर्तमस् नांवाचा अंध ॠषि असून, नदींत बुडत असतांना त्याला वांचविण्यांत आलें अशांविषयी ॠग्वेदांत उल्लेख आहे. भारद्वाज ही व्यक्ति इतकी स्पष्ट नाहीं. कारण एकीकडे बृहस्पतीचा वडील मुलगा भारद्वाज याला काशीच्या दुस-या दिवोदासाचा समकालीन म्हटलें आहे तर दुसरीकडे भरताशीं त्याचा अंतकाली संबंध जोडण्यांत आला आहे. कांहीं कथानकांतून भरताची सर्व मुलें मेल्यावर त्यानें भरद्वाजाला आपला पुत्र केला व तोच पुढें राजा वितथ म्हणून प्रसिद्ध आहे अशी; तर दुस-या कांहीतून, भारद्वाजानें भरताकरितां यज्ञ केला व त्याच्या पासून वितथ नावांचा पुत्र जन्मास आला, अशी माहिती सांपडते. जर दुसरा दिवोदास व भरद्वाज समकालीन धरले तर भरद्वाजानें किंवा त्याच्या पुत्रानें भरताच्या अंतकाली वितथ नांवाच्या त्याच्या पुत्रास जन्म दिला, हेंच अनुमान बरोबर दिसतें.

सोमवंशाच्या अजमीढापासून उत्तर आणि दक्षिण पंचाल घराणीं निघाली. याचें स्थान समजणें फार महत्त्वाचें आहे. प्रत्यक्षपणें तें ठरविण्यास कांही मुद्दा न सांपडल्यानें, अप्रत्यक्ष पुरावे कांही सांपडतात कीं काय हें पाहूं.  बराचसा पूर्ण असलेला सूर्यवंश मापनाला घेऊन जर आपण भरताच्या पुढील पिढया मोजूं लागलों तर अजमीढाची पिढी ॠतुपर्णाच्या किंवा त्याच्या नंतरच्या एका पिढीशीं जोडतां येईल; व पुढें उत्तरपंचाल वंशांतील पिढया मोजूं लागलों तर सृंजय हा दशरथ आणि राम यांचा समकालीन होईल; व या ठिकाणीं आपण कालैक्यें गाठल्यानें आपली मोजणी बरोबर झाली असें होईल. या पिढींत पुष्कळ वंशांतून कालैक्यें आलेलीं आहेत.
विदेहाचा सीरध्वज जनक (सीतेचा पिता), अंगाचा लोमपाद आणि वैशालीचा राजा प्रमति हे दशरथाशीं समकलीन होत.

राम आणि त्याचा भाऊ शत्रुघ्न यांचा यादव घराण्याशीं संबंध जोडणारी एक कथा आहे. प्रारंभी ती अविश्वसनीय वाटली तर इतर पुराव्यांवरून तींत तथ्य सांपडतें व कांही महत्त्वाच्या प्रादेशिक गोष्टीचा उलगडा पडतो. त्यांत ज्याला मधु-दानवांचा राजा म्हटलें आहे, तो वास्तविक यादववंशांतील मधु राजा होय. त्या कथेवरून पाहातां, मधूचें म्हणजे यादवांचे राज्य गुजराथेपासून यमुनेच्या तीरी असलेल्या मधुवनापर्यंत पसरलें होतें. याच्या चवथ्या पिढीतील वंशज सत्त्वत असून सत्त्वतपुत्र भीम रामाच्या कालीं गादीवर होता. शत्रुघ्नानें लवण नावाच्या राजपुत्राला मारून मधुवन तोडलें व त्या जागी मथुरानगर स्थापिलें. रामाच्या मृत्यूनंतर भीमानें ती नगरी जिंकून तो तेथे राहिला व रामपुत्र कुश कोसल येथे राज्य करीत असतांना भीमपुत्र अन्धक मथुरेच्या गादीवर होता यावरून वरील गोष्टींत ऐतिहासिक तथ्य दिसतें.

वंशावळींतून भीम असें नांव आढळत नाहीं पण त्याच्या जागी सात्त्वत असें नांव आहे. वंशावळी आणि कथा यांचा अंधकाला सत्त्वताचा नातू म्हणून, त्याला मधूच्या सहाव्या किंवा आठव्या पिढींत घालण्यांत, एकमेळ दिसून येतो. तेव्हां यादव सत्त्वताला दशरथाशीं, सात्त्वताला रामाशीं आणि अन्धकाला कुशाशीं आपणांस एककाल करितां येईल आणि मधु व सूर्यवंशांतील शतरथ हे समकालीन होते असें म्हणतां येईल.
सत्त्वताचा दुसरा एक मुलगा भजमान यानें सृंजयाच्या एका किवा दोघी मुलींशीं लग्न लाविलें. हा सृंजय उत्तरंपचाल घराण्यांतील सृंजय राजाच असावा. यावरून सृंजय हा सात्त्वताचा व त्याबरोबर रामाचाहि समकालीन ठरतो, व वर जें याचें स्थान ठरविलें आहे त्याला यानें दुजोरा मिळतो. आजमीढालाहि ॠतुपर्णाशेजारी किंवा त्याच्या लगेच पुढें स्थान दिलें पाहिजे. सृंजयाच्या स्थानावरून ॠग्वेदांत वारंवार उल्लेखिलेल्या दिवोदास आणि सुदास यांची स्थानें ठरविण्याला मदत होते.

सृंजयाला मुद्गल इत्यादि पांच पुत्र होते. “माझे पांच (पंच) पुत्र पांच राज्यें रक्षण करण्याला समर्थ (अलम्) आहेत” असें तो म्हणतो यावरून पंचाल (पंच+अलम्) हें नवीन नांव पडून, जुनें क्रिवि असें जें देशाचें किंवा लोकांचे नांव होतें तें नष्ट झालें. या पंचालांची सोमक व त्याचा पुत्र जन्तु यांच्या कारकीर्दीपर्यंतच भरभराट होती; पुढें हें घराणें पृषताच्या कालापर्यंत नामशेष झालें (तेथपर्यंत वंशावळींत खाडे दिसून येतात.)
ॠक्ष (पहिला), संवरण आणि कुरू यांची स्थानें अजमासानें ठरवितां येतात. पंचालांनीं संवरणाला त्याच्या राज्यातून हांकून दिल्यावर, तो सिंधूच्या तीरी पुष्कळ दिवस राहिला पुढें वसिष्ठ (वसिष्ठकुलांतील एक) त्याच्याकडे येऊन त्याचा पुरोहित झाला व वसिष्ठाच्या प्रोत्साहनाने संवरणानें आपलें राज्य परत मिळविलें. पंचाल मुद्गलानंतरचे असल्यानें ही संवरणाची अधिकारभ्रष्टता मुद्गलाच्या नंतरची असली पाहिजे, आणखी असें दिसतें की ही गोष्ट दिवोदासाच्या कालापूर्वीहि आली नसली पाहिजे. कारण इंद्रोत आतिथिग्व (बहुतेक हा दिवोदासपुत्र असावा)  ॠक्षच्या पुत्राशीं उघडपणें स्नेहभावानें वागत असे (ॠ. ८.६८(५७), १५-१७) तेव्हां ॠक्ष दिवोदासाचा समकालीन दिसतो.

संवरणाला सुदासानें अधिकारभ्रष्ट केलेसें दिसतें. ॠग्वेदांतील एका सूक्तांत (ॠ ७.२०,२) त्याला युद्धें करावी लागलीं व त्यानें आपलें राज्य वाढविलें असा उल्लेख आहे. त्याचें दाशराज्ञयुद्ध (७.१८,१९,३;६;८) कदाचित या गोष्टीशीं संबद्ध असूं शकेल. तें युद्ध परुष्णी (७.१८,८-९) (हल्लीची रावी नदी) जवळ झालें, तेव्हां पौरवांच्या राज्यांतून तिकडे जाण्याखेरीज दुसरा त्याला मार्गच नव्हता. आणि ज्या अर्थी भरत लोक (सोमवंशज)  त्याचे शत्रू होते, त्या अर्थी त्यास प्रथम त्यानें जिंकलें. याचा परिणाम सा झाला की यादव (मथुरेचे यादव), शिबि (आनव) द्रुह्यु (द्रुह्यूचे वंशज गांधार), (मथुरेच्या पश्चिमेकडील) मत्स्य, तुर्वश (तुर्वसूच्या वंशांतील कोणी राजा) व इतर लहानसहान कुळांतील लोक पश्चिमेकडून त्याच्यावर उठले, आणखी “वृद्ध कवष” या लढाईत पाण्यांत बुडाला (७.१८,११). एका तुर नांवाच्या ॠषीनें जनमेजयपरिक्षिताला  (संवरणाच्या पणत्वाला) महाभिषेक केला. याच्या पित्याचे नांव कवष होतें; हा कवष संवरणाचा समकालीन असला पाहिजे (ऐतरेय ब्राह्मण २. १९; ७. ३४;८.२१) हे दोनहि कवष एकच होते, कारण “वृद्ध कवष” सुदासाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे संवरणाच्या बाजूला होता आणि कवषपुत्रानें संवरणाच्या पणत्वाला अभिषेक केला.

पौरवांची अधिकार भ्रष्टता सहदेवाच्या कारकीर्दीत व पुढें सोमकाच्या कारकीर्दीच्या आरंभाहि तशीच होती. कारण सोमकानें यमुनेच्या तीरी जे यज्ञ केले तें त्याचें राज्य तेथें असल्याखेरीज होणें नाही. सोमकाच्या कारकीर्दीच्या प्रथम भागांत संवरणानें आपलें राज्य परत मिळविलें याविषयी अनेक पुरावे देतां येतील. पहिला, सोमक आणि जन्तु यांच्या काळी या पंचाल घराण्याला बरीच उतरती कळा लागली होती हे मागें सांगितलेंच आहे.दुसरा, सुदासाच्या स्तुतिपर सर्व सूक्तें वसिष्ठाचीं म्हणजे वसिष्ठकुलजांची आहेत. एकदां फक्त सोमक युवराज असताना त्याची स्तुति केलेली आढळते. ही गोष्ट, वसिष्ठ संवरणाकडे गेला व त्याला राज्य परत मिळविण्याच्या कामीं त्यानें मदत केली. या मागील विधानाला पुष्टि देते. सोमकाचा पक्ष सोडून संवरणाला मिळण्याला वसिष्ठाला कांही तसेच मोठें कारण झालें असलें पाहिजे. त्याची वागणूक सूडाची दिसते  याचें कारण सुदासाच्या वंशजांनीं त्याचे पुत्र मारलें हें असावें. तिसरा पुरावा म्हणजे सोमकानें आणखी जास्त पुत्र मिळावेत म्हणून आपल्या पहिल्या जन्तु नांवाच्या मुलाचा यज्ञ केला. ही कथा स्पष्ट करण्याला दुस-यांतील अनुमानाची मदत होते; कारण ज्या ॠत्विजानें असला अमानुष विधि केला तो वसिष्ठ तर खास नसला पाहिजे किंवा त्याची या कामाला संमति नसली पाहिजे. {kosh ज्यानें वसिष्ठाला यातुधान असें संबोधून, त्याच्या तोंडावाटें (७.१०४,१५) ही ॠचा वाढविली, तो हाच ॠत्विज असावा}*{/kosh} या सर्व कारणांवरून संवरणाला सुदास किंवा सहदेव यांचा आणि कुरूला सोमक किंवा जन्तु याचा समकालीन करावें लागतें. कुरूची पुष्कळ प्रजा होती. त्यानें कुरुक्षेत्राला आपलें नांव देऊन, प्रयागच्या पुढें आपलें राज्य वाढविले; त्यावरून त्याने पंचाल काबीज केला असावासें दिसतें. त्याची उन्नति म्हणजे पंचालांचा –हास समजावा. अजमीढापासून संवरणापर्यंत जो खाडा दिसून येतो त्याला कारण उत्तरपंचालांचे वर्चस्व असतांना सोमवंशाला ग्रहण लागले होते. जन्तूपासून पृषतापर्यंतचा खाडा याच्या उलट स्थितीचा द्योतक आहे.

वसु चैद्योपरिचरानें नवीन चेदि  व मगध घराणीं स्थापन केलीं. वंशावळींप्रमाणें तो कुरूच्या खाली पांच पिढया व म्हणून दुस-या जनमेजय परिक्षितानंतरचा होता. याला जनमेजयाच्या तीनचार पिढया खालीं न्यावा. म्हणजे,  ययातीचा त्याच्या पुरु व इतर वंशाजाजवळ असलेला रथ जनमेयाजकडून वसूकडे आणल्याबद्दलची कथा बरोबर पटते.

सोमवंशांतील अयुतनायांने पृथुश्रवसाच्या मुलींशी लग्न केले. तो अनुतायुसच असावा आणि पृथुश्रवस् दक्षिण पंचाल वंशांतील पृथुराजा असावा, असे दिसतें.

सोम, पंचाल आणि द्विमीढवंश यांच्या शेवटच्या भागांतून बरीचशीं कालैक्यें आहेत. द्विमीढवंशांतील कृत हा हिरण्यनाभ नांवाच्या कोसल राजाचा शिष्य होता, तेव्हां तो हिरण्यनाभाचा तरुण समकालीन असला पाहिजे. दक्षिण पंचालाचा ब्रह्मदत्त आणि लोमवंशांतील प्रतीप समकालीन होते. कृताच्या नांवानंतर ज्याचे नांव आले आहे त्या उग्रायुधानें जनमेजय दुर्बुद्धि आणि दक्षिण पंचालाचे सर्व नीप राजपुत्र आणि उत्तर पंचालाचा पृषताचा पिता किंवा पितामह जो नीप (नील) यालाहि ठार मारलें, आणि भीष्मानें शन्तनूच्या मृत्यूनंतर त्याला मारले. म्हणून उग्रायुध शतन्तु आणि जनमेजय यांचा तरुण समकालीन आणि भीष्माचा वृद्ध समकालीन होतो.या कालैक्यांपासून कांही मनोरंजक गोष्टी उघडकीस येतात. उग्रायुधाला कृताचा पुत्र असें म्हणण्यांत येतें पण त्यांच्यांत चार पांच पिढयांचे अंतर आहे हें उघड दिसतें. याखेरीज, प्रतीपाची ब्रह्मदत्ताशीं व शन्तनूचीहि ब्रह्मदत्ताच्या तिस-या पिढीशी समकालीनता, प्रतीप आणि शन्तनु यांच्यांमध्यें एक दोन पिढयांचा खाडा असल्याचें दर्शविते. महाभारतांत किंवा पुराणांतून कोठेंहि अशा प्रकारचा खाडा असल्याचें दिग्दर्शिशित केलें नाहीं, तथापि ॠग्वेदांवरून तें सिद्ध आहे. कारण देवापि शन्तनूचा वडील भाऊ होता आणि देवापि स्वतःला आर्ष्टिषेण म्हणवितो याला सर्व ग्रंथांतून एकमत आहे. तेव्हां ॠष्टिषेण मध्यें घातला पाहिजे हें उघड झालें.
बाकीचे अखेरीचे समकालीन प्रसिद्धच आहेत तेव्हां त्यांच्याविषयी कांही सांगण्याची जरूरी दिसत नाहीं.

वरील संशोधिलेली कालैक्यें एकाच जातीच्या पुराव्यावरून किंवा एकाच उपलब्ध माहितीवरून प्रतिपादिली नसून ॠग्वेदापासून तों रघुवंशापर्यंतच्या सर्व जातींच्या ग्रंथांवरून, निरनिराळया माहितीवरून व कथांवरून ताडिलेली आहेत.

बहुतेक सर्व वंशावळीच्या याज्या कौरवपांडव युद्धापर्यंतच आहेत. कांही ग्रंथांतून कांही कांही घराण्यांतील पुढील थोडया पिढया  किंवा या युद्धानंतर कांही वंशांत जे राजे होतील त्यांची नांवे दिलेली आढळतात.तथापि सर्व वंशावळीसंबंधीच्या सामुग्रीत हें युद्ध सर्वसमाप्तिदर्शक म्हणून प्रामुख्यानें नजरेस येतें. जणूं काय पूर्ण समृद्धि, सुधारणा आणि ज्ञान यांच्या कालानंतर अव्यवस्था आणि अंधकार यांचा काल सुरू झाला. कारण कोणतें कां असेना, तो प्रसंग अत्यंत महत्त्वाचा होता यांत संशय नाहीं. तेव्हां या अमदानीच्या कालापासून मागें सर्व वंशावळी कालानुक्रमें लाविल्या पाहिजेत.

या वंशावळीचा कालक्रमाच्या दृष्टीनें काय उपयोग असा प्रश्न साहजिक उद्भवतो. इक्ष्वाकूपासून भारतीय युद्धांपर्यंत यांत त्र्याण्णव नांवे आहेत. तेव्हां संबंध काळ १४०० वर्षांपेक्षा कमी असणार नाहीं. मान्धातृचा काळ युद्धापूर्वी अकरा शतके, सगर, भरत आणि भगीरथ यांचा काल आठवे शतक, दाशरथी राम पांचव्या शतकाच्या अर्धांत आणि दिवोदासपासून सोमकापर्यंतचे पांचाल राजे चौथ्या व पांचव्या शतकांत जातील.
वरील पारगिटरचें विनेचन फारसा बदल न करितां दिले आहे यांत आमच्या मताप्रमाणें फेरफार करावे लागतात ते येणेंप्रमाणें.

(१) दिवोदास व सुदास हे पुरू होते हे ॠग्वेद कबूल करतो, पण पुरूस पुन्हां दिवोदासाच्या शत्रूंत घालतो. त्यामुळे या कुलांची कुरुक्षेत्री स्थापना झाल्यानंतर त्याची पूर्वपरंपरा ब्रह्मिष्ठ व अजमीढ यांमार्फत देश्य पुरु घराण्याशीं जोडली गेली असावी अशी कल्पना उत्पन्न होते. अजमीढापासून कांही राजांकडे दिवोदासाचें पूर्वजत्व स्थापित झालें असावें व अशाने दिवोदासवंशजांचा परकेपणा गेला असावा. ही कल्पना केली म्हणजे सुदासाला त्याच्या पश्चिमेकडील राजांनीं वेढलें अशी कल्पना करण्याचें, व तो पश्चिमेकडून आला ही ॠग्वदोक्त पुराव्यानें सिद्ध होणारी गोष्ट दुर्लक्षिण्याचें प्रयोजन ठरत नाहीं. अजमीढापासून ॠक्षापर्यंत यादी नाहीं. तिच्या अभावाचेहि स्पष्टीकरण यानें होईल. नीलापासून ब्रह्मिष्ठापर्यंतचे राजे हे स्थानिक असावेत आणि त्यांच्या वंशजांस नाहीसें केल्यानंतर म्हणजे ॠक्षापासूनच्या चारपांच पिढयापर्यंत अजमीढवंशजता पैजवनांस प्राप्त झाली असावी. ॠक्ष हा कोणी दिवोदासाशी समकालीन देश्य पुरू घराण्याचा राजा असावा.

(२) दिवोदासाशीं समकालीन कुत्स, आयु, त्याचा शत्रु तुर्वयाण यांच्या अस्तित्वाबद्दल ॠग्वेद साक्ष देतो. पण या याद्या यासंबंधानें मूक आहेत. पुरुकुत्स व त्रसदस्यु यांचा उल्लेख सूर्यवंशात केला आहे. पण त्याशीं समकालीन असा एक दिवोदास काशीवंशांत दाखविला आहे. पण तें कालैक्य भ्रामक आहे. कां कीं, त्या वेळेस  कुत्स वगैरे मंडळी सरहद्दीवर होती हें स्पष्ट दिसतें. आणि काशीवंशाइतका दूरचा दिवसोदास असता तर त्याचा पंजाबांत उल्लेख न येता. म्हणून असें समजावें कीं, दिवोदासाशी समकालीन जे कुत्स वगैरे राजे झाले त्यांचा संबंध हिंदुस्थानांत फारसा न आल्यामुळें त्याची नावें राजावलिप्रविष्ट झाली नाहींत.

(३) ॠग्वेदांत ज्या राजांचा उल्लेख आला आहे त्यांच्या पाठीमागे सूर्यचंद्रसंभवाचे लिगाड लावलें गेलें नाहीं ते देश्यांस सूतसंस्कृतीमुळें लावलें गेलें असावें. आणि पुढें दिवोदासाला पौरवत्व त्याच्या अंगी असल्यामुळेंच ययातिसंभवत्व व ऐलत्व ही लागलीं असावीत. सुदासदिवोदास कथेचा दुवा निश्चयात्मक रीतीनें सूतसंस्कृतीतील याद्या व वेद यांमध्यें जितका संबंध उत्पन्न करितो तितका स्पष्ट संबंध दुसरा कोणताहि नाही.