प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
यज्ञामध्यें इतिहास - पुराणांचें महत्त्व- ब्राह्मणी वाङ्मयांत किंवा चळवळींत इतिहास भाग अजीबात वगळला होता असें नाहीं. शांखांयन-सूत्रांतून घेतलेला खालील उतारा, आपण ज्यास वेद म्हणतों त्याखेरीज असलेल्या वाङमयावर कांहीसा प्रकाश पाडतो. हीच हकीकत आश्वलायन सूत्रांत (१०.७) व शतपथ ब्राह्मणांत (१३.३,१,१) दिलेली आहे. “अश्वमेधाच्या वेळी, अध्वर्यु गायकांनां पाचारण करतो व ते वीण्यावर गातात, आणि तो त्यांनां राजाची स्तुति करावयास सांगतो. नंतर तो राजा इतर जुन्या सद्गुणी राजांसमवेत यज्ञ करतो. यज्ञाच्या पहिल्या दिवशी अध्वर्यु मनुवैवस्ततापासून आरंभ होणारी गोष्ट निवेदन करतो. ज्या अर्थी मनूचे लोक मनुष्य होते व यज्ञाला मनुष्य हजर आहेत त्या अर्थी ही गोष्ट सांगून अध्वर्यु हा गृहमेध्यांनां (कुटुंबी लोकांनां) उपदेश करतो. नंतर तो सांगतो कीं, ॠक-गीतें वेद आहे. हा वेद आहेत; आणि एक सूक्त म्हणतो “दुस-या दिवशी यमवैवस्वतापासून आरंभ होणारी गोष्ट ती सांगतो. ज्या अर्थी यमाचे लोक पितर होते आणि पितर येथें हजर आहेत म्हणून तो वृद्धमाणसांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, यजुर्वेद वेद आहे, हा वेद आहे आणि यजूंच्या एका अनुवाकाचें पठण करतो. तिस-या दिवशी वरुणआदित्यापासून आरंभ होणारी गोष्ट तो सांगतो. ज्या अर्थी वरुणाचे लोक गंधर्व होते आणि ज्या अर्थी ते हजर आहेत त्या अर्थी तो शोभिवन्त तरुणांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘अथर्ववेद वेद आहे;’ हा वेद आहे. नंतर तो भेषजाचें पठण करतो. चवथ्या दिवशीं तो सोमवैष्णवापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी सोमाचे लोक अप्सरा होत्या आणि त्या हजर आहेत म्हणून तो शोभिवन्त तरुणींनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘आंगिरसवेद वेद आहे; हा वेद आहे;’ आणि त्या नंतर तो घोराचे पठण करतो. पाचव्य़ा दिवशी तो अर्बुदकाद्रवेया पासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी अर्बुदाचे लोक सर्प होते आणि ज्या अर्थी ते हजर आहेत म्हणून तो सर्पांना किंवा सर्पविदांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘सर्पविद्या वेद आहे; हा वेद आहे;’ आणि सर्प विद्येचें पठण करतो. साहाव्या दिवशी तो कुबेर वैश्रवणापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी कुबेराचे लोक राक्षस होते, आणि ते हजर आहेत म्हणून तो सेलगांना किंवा पापकृतांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘रक्षोविद्या वेद आहे; हा वेद आहे’ आणि तो रक्षोविद्या पठण करतो. सातव्या दिवशीं तो असितधान्वनापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी त्याचे लोक असुर होते आणि ते हजर आहेत म्हणून तो कुसीदिनांनां (किंवा व्याजखाऊंनां ?) ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो कीं, ‘असुरविद्या वेद आहे; हा वेद आहे;’ आणि एक हातचलाखीचा खेळ करून दाखवितो. आठव्या दिवशीं तो मत्स्य सामंदापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी त्याचे लोक जलचर होते आणि ते या ठिकाणीं हजर आहेत त्या अर्थी तो मत्स्यांनां किंवा धीवरांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘इतिहासवेद वेद आहे, हा वेद आहे’ आणि तो एका इतिहासाचें पठण करतो. नवव्या दिवशीं तो तार्क्ष्य वैपश्चितापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो ज्याअर्थी त्याचे लोक पक्षी होते आणि ते हजर आहेत, म्हणून तो पक्ष्यांनां किंवा ब्रह्मचा-यांना ही गोष्ट सांगून उपदेशतो. नंतर तो म्हणतो कीं, ‘पुराण-वेद हा वेद आहे, हा वेद आहे;’ आणि त्या नंतर तो पुराणांतील कांही भाग पठण करतो. दहाव्या दिवशीं तो धर्म इंद्रापासून आरंभ होमारी गोष्ट सांगतो. ज्याअर्थी त्याचे लोक देव होते आणि ते हजर आहेत त्याअर्थी तो तरुण व अप्रतिग्राहक अशा श्रोत्रियांनां ही गोष्ट सांगून उपदेशतो. नंतर तो म्हणतो की, ‘सामवेद वेद आहे, हा वेद आहे’ आणि सामगायन करतो. (शाखा. श्रौ. सू. १६.१)”
प्रस्तूत उतारा आपणांस अनेक दृष्टींनीं महत्त्वाचा आहे. इतिहासपुराणें यांसहि पांचवा वेद म्हणण्याचें शास्त्रीय कारण काय? तर यज्ञ करण्यामध्यें त्यांचाहि उपयोग होता. वेदविद्या म्हणजे यज्ञ करणा-या लोकांची विद्या. तर जें वाङ्मय यज्ञांत म्हटलें जाई तेंहि वेदविद्येचा भाग होय.
अध्वर्यु जुन्या गोष्ठीचें निवेदन करतो असें यांत सांगितलें अहे. याचा अर्थ काय? अध्वर्यु सूतवाङ्मयाचा अभिमानी होता काय? की सूतवाङ्मय आणि देश्यसंस्कृति यांचा आणि मांत्रसंस्कृति आणि यज्ञसंस्था यामधील दुवा होता आणि यज्ञ, इतिहास व पुराणे हे वाङ्मय समाविष्ट करून त्यानें यज्ञसंस्था अधिक लोकप्रिय केली? वरील उता-यात आणखी एक गोष्ट दृष्टीस पडते की संहितीकरणाचा प्रयत्न होत असता हौत्र, आघ्वर्यव, औद्गात्र आणि ब्रह्मत्व यांचाच वेदात समावेश करण्याचें ठरण्यापूर्वी वाङ्मयाचें वर्गीकरण व सामुच्चयिक कल्पना ही निराळया त-हेची होती. ॠग्गीतें, यजुर्वेद, अथर्ववेद, आगिरसवेद, सर्पविद्या, रक्षोविद्या, असुरविद्या, इतिहासपुराणें व सामवेद हें या वर्गीकरणावरून दिसून येईल.
सर्प राक्षस आणि असुर ही तीन राष्ट्रें महत्त्वाची असून त्यांची विद्या काहीं विशेष होती आणि इतिहास पुराणाप्रमाणें त्या विद्येचाहि समावेश यज्ञसंस्थेत करून घ्यावा असा अध्वर्युचा प्रयत्न असावा. या तीन राष्ट्राचा इतिहास काही अंशी त्या वेळेस ठाऊक असून त्याचें उच्चारण अश्वमेध काली करावें अशी खटपट ते करीत होते असें दिसतें. सर्पराष्ट्राचा इतिहास अर्बुद काद्रवेयापासून परिचित होता; राक्षसाचा इतिहास कुबेर वैश्रवणापासून परिचित होता आणि असुरांचा इतिहास असितधान्वनापासून परिचित होता.
इतिहास म्हणून जे वाङ्मय त्याकाळी होतें ते विशेषेकरून धीवरांना सांगितले आहे. मत्स्य म्हणजे धीवराचें राष्ट्र त्याचा इतिहास सामदापासून पुढें आहे अशी मत्स्य राष्ट्राची कल्पना होती.
पक्षी म्हणजे ब्रह्मचारी म्हणून स्पष्टीकरण करून त्याचा इतिहास तार्क्ष्य वैपश्चितापासून धरला आहे. आणि त्यांचा पुराणवेद हा वेद म्हणून सांगितलें आहे.
याचा अर्थ असा दिसतो कीं, त्रयीशिवाय जें इतर ज्ञान शांखायनब्राह्मणांत उल्लेखिलें आहे ते सर्प, राक्षस, असुर व मत्स्य या राष्ट्राचें परंपरागत ज्ञान तसेच पुराण नावाचें ब्रह्मचारी वर्गाचें ज्ञान होय.
सर्प, राक्षस आणि असुर या राष्ट्राचें ज्ञान कोठें गेलें असावें असा प्रश्न उपस्थित होतो. अशी कल्पना करता येईल की कांही वेदोत्तर सूत्रवाङ्मयांत आणि पुराणात ते समाविष्ट झालें असावें.
इतिहास - ‘एक प्रकारचें वाङ्मय’ ह्या अर्थी हा शब्द पुराण ह्या शब्दाबरोबर वैदिक कालांत जे ग्रंथ लिहिले गेले त्यांत योजिला आहे. अथर्व वेदाच्या पंधराव्या काण्डांत ह्या दोन्ही शब्दांचा उल्लेख आहे. त्यानंतर इतिहास हा शब्द शतपथब्राह्मण, जैमिनीय, ब्राह्मण व बृहदारण्यक आणि छांदोग्य या उपनिषदांत आलेला आहे. छांदोग्य उपनिषदांत इतिहास आणि पुराण मिळून पांचवा वेद आणि शांखायन श्रौतसूत्र (१६.२;२१.२७) ह्यांत इतिहास एक वेद आणि पुराण एक वेद असें मानिले आहे. गोपथब्राह्मणांत (१.१०) देखील इतिहास-वेद आणि पुराण-वेद असा उल्लेख आहे. परंतु शतपथांत (१३.४,३,१२) इतिहास आणि पुराण मिळून वेद होय असें प्रतिपादन केले आहे. आणि त्याच ग्रंथांतील एका उता-यांत (११.१,६,९) अन्वाख्यान आणि इतिहास हे निरनिराळया प्रकारचे ग्रंथ आहेत असा उल्लेख आहे. परंतु त्यातील भेद कोणता याचा खुलासा नाहीं. बहुतकरून पहिला पूरक असावा. तैत्तिरीय आरण्यकांत (२.९) इतिहास आणि पुराण ह्यांचा अनेकवचनी उपयोग केला आहे. वैदिक वाङ्मयात पुराण आणि इतिहास यांत काय फरक आहे याबद्दल स्पष्ट पुरावा दिसत नाहीं आणि भाष्यकारांचे वाङ्मय देखील (सीजनें संशोधिलेलें-सायणांनी लिहिलेला ॠग्वेदाचा उपोद्धात आणि शतपथ ब्राह्मणावरील (९.५,६,८) भाष्य- हें) अकुकूल असा निकाल देत नाही. गेल्डनेर म्हणतो की, इतिहास-पुराण म्हणजे त्यात सर्व प्रकारच्या दंतकथा उदाहरणार्थ शौर्याच्या, सृष्ट्युत्पत्तीच्या, वंशवर्णनाच्या वगैरे आहेत असा हा एक ग्रंथ आहे. परंतु इतिहास आणि पुराण हे निरनिराळे ग्रंथ आहेत असें पतंजलींचे मत होतें (पाणिनी वरील वार्तिक ४.२,६० आणि महाभाष्य २.२,४) तथापि यास्काला असा ग्रंथ आहे हें मुळींच माहीत नव्हतें ह्या विधानावरून गेल्डनरची चूक सिद्ध होतें. त्याचें मत असें आहे कीं, इतिहास हा मंत्रवाङ्मयाचा (निरुक्त ४.६) भाग असावा आणि ऐतिहासिक हे लोक असून ज्याठिकाणीं दुसरें लोक ॠग्वेदाला काल्पनिक समजतात त्याठिकाणीं हे त्या दंतकथा आहेत असें समजतात. यास्क हा निरुक्तातील बहुतेक उता-यांस इतिहास पुराण असें न म्हणतां फक्त इतिहास असेंच म्हणतो. यावरून हे सिद्ध होतें की, इतिहास पुराण म्हणून एखादा ग्रंथ असा काही नव्हता.
इतिहासाचा आख्यानाशीं काय संबंध आहे हें निश्चित सांगतां येत नाही. सीज म्हणतो कीं, इतिहास आणि पुराण हे शब्द पुराणदंतकथा, इतिहास आणि सृष्ट्युत्पत्तीसंबंधी दंतकथा ज्या वैदिक कवीनां माहीत होत्या त्यानांच फक्त लावितात आणि ह्यालाच साधारणपणें पांचवा वेद (पूर्णपणें नाहीं) असें म्हणतात. तर अशा रीतीने अन्वारव्यान, अनुव्याख्यान आणि व्याख्यान ह्याचा जन्म झाला. आणि ह्या परंपरेच्या बाहेरहि आख्यानें असूं शकतील. तसाच आख्यान हा इतिहासपुराण ह्याचाहि भाग असूं शकेल. तो आणखी असेहि सुचवितो की आख्यान या शब्दाचा गोष्टीची मांडणी ह्याकडेहि संबंध आहे. ओल्डेनबर्ग वुइंडिश्, गेल्डनेर आणि सीज व इतर कांहीं म्हणतात कीं, आख्यान म्हणजे गद्यपद्यांचा समुच्चय. मुख्य भाग असला म्हणजे विकारांनां किंवा भावनांनां जास्त जोर देण्याकरितां पद्यरूप आणि दुय्यम अथवा गौण असला म्हणजे गद्यरूप अशी योजना करावयाची.
ह्या विचारसरणीवर हर्टेल व व्हॉन श्रोडरयांनीं कडक टीका केली आहे. ज्याचा गद्य भाग नाहीसा झाला असला तरी ज्यांत ओल्डेनबर्गला वाङ्मयात्मक ज्ञानाचे नमुने आढळतात त्या ॠग्वेदांतील आख्यानसूक्तांत वरील विद्वानांनां मॅक्समुलर व लेव्ही यांच्या जुन्या कल्पनांप्रमाणें धार्मिक नाटकांचे अवशेष सांपडतात. दुसरे असें म्हणतात कीं, प्रस्तुत सूक्तें म्हणजे फक्त वाङ्मयात्मक संभाषणें होत.
इतिहासपुराणांचा उल्लेख सर्व मंत्रवाङ्मयामध्ये व्रात्यस्तोमकाण्डाशिवाय इतर कोठेंहि नसावा ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. आणि ब्राह्मणवाङ्मयांत देखील त्याचें स्वरूप असें दिसतें कीं, इतिहासपुराण हें ज्ञान इतकें मोठें आहे कीं त्याचा पांचवा वेद मानावा. अर्थात ब्राह्मणवाङ्मय इतिहासपुराणांचें ज्ञान गृहीत धरतें आणि त्यास घालावें कोठें याची चर्चा करीत बसतें. ब्राह्मणांतील किंवा वेदांतील उल्लेखांचे तंतू जमा होऊन त्याचें इतिहासपुराणरूपी पटल बनलें ही गोष्ट फारशी संभवनीय नाहीं. ब्राह्मणवाङ्मयांतील अर्थवादामध्यें जो इतिहासपुराणभाग आलेला आहे त्या पैकी बराचसा दुस-या विभागांतील एका प्रकरणांत दिलाच आहे. त्याचें स्वरूप असें दिसतें की तो पुराणरूपी वाङ्मयास प्रेरक नसून अस्तित्वांत असलेल्या इतिहासपुराण वाङ्मयामुळें तयार झालेल्या मनाला यज्ञसंस्था इतिहास पुराणाशीं संबद्ध आहे असें भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. यज्ञपुरुषाचें विष्णूशीं ऐक्य दाखविण्यांत विष्णूचें महत्त्व आधींच वाढलें होते याची कबूली येत नाही काय? इतिहासपुराणाची आणि वैदिक वाङ्मयाची लठ्ठालठ्ठी, वेदांच्या अभिमानेंकरून इतिहासपुराणांस पांचवा वेद मानण्यामध्यें दिसून येणारी मान्यता दाखवावी लागली ही गोष्ट पुराणांचे ब्राह्मणांहून बरेंचसें प्राचीनत्व सिद्ध करिते. पुराणांचा आपण एकंदर वृतान्त पाहिला तर त्यात पंजाबकडच्या खळबळी फारशा येतच नाहीत. पाण्डवांचे पैतृक देश उत्तरकरू आणि उत्तरमद्र हे जे मानण्यांत येतात, त्यावरून अशी कल्पना सुचते की, मंत्रकालीन आर्याचें आगमन जर खैबर घाटाकडून झालें तर देश्य आर्यन् संस्कृतीच्या आर्यांचें आगमन उत्तरकुरुमार्गानें झालें असावें. कीकटामध्यें शकमगांचा प्रवेशहि याच मार्गानें झाला असावा.
हिंदुस्थानांतील प्राचीन राजघराण्यांच्या वंशावळी रामायण, महाभारत व पुराणें यांमध्यें दिलेल्या आहेत व त्यांत हिंदुस्थानच्या उत्तर, पूर्व व पश्चिम भागांतील निरनिराळ्या राज्यांत होऊन गेलेल्या राजांची नांवे असल्याचें सांगतात. त्यांत प्रत्येक राजाचा नामनिर्देश आहे असें मात्र नाहीं; फक्त ज्यांची कारकीर्द संस्मरणीय झाली तेवढेच राजे दिलेले आहेत, असें सांगण्यांत येतें. राजवंशांविषयीं इतिहास पुराणें माहिती देतात ती अशीः हीं एकंदर राजघराणी मूळ दोन राजवंशापासून निघालीं, त्यांतला एक मनुपासून निघालेला सूर्यवंश; मनु हा विवस्वत् म्हणजे सूर्य याचा मुलगा. दुसरा सोम किंवा चंद्र यापासून निघालेला ऐल उर्फ सोमंवश होय. सूर्यवंशांतील राजांची तीन ठिकाणीं राज्यें होतीं अयोध्या, विदेह व वैशाली; त्यांपैकी अयोध्येचे राजघराणें सर्वश्रेष्ठ होय व त्यालाच सूर्यवंशीय म्हणण्याचा विशेष प्रघात पडला. सोमवंशाचा मूळपुरुष पुरूरवस् ऐल होय. या राजवंशांचीहि पुढें पौरव, यादव, अनु, द्रुह्यू व तुर्वसु हीं पांच निरनिराळीं घराणीं झालीं. पैकी पौरव यांनीं उत्तर हिंदुस्थानांत, यादवांनीं पश्चिम हिंदुस्थानांत व दक्षिणेंत, अनुराजांनीं पंजाबांत व पूर्वेकडील प्रांतांत व द्रूह्यूंनी हिंदुस्थानच्या वायव्यसरहद्दीवर, येणेंप्रमाणें राज्यें स्थापिली. तथापि सोमवंश हें नांव हस्तिनापूर येथें ज्या राजघराण्याच्या मुख्य शाखेनें राज्य केलें त्या पौरवराजघराण्याला लावतात. या वंशावळी अत्यंत पुरातन काळापर्यंत नेऊन भिडविल्या असल्यामुळें त्या कितपत विश्वसनीय मानाव्या, हा प्रश्न उद्भवतो.