प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.

अत्यंत प्राचीन इतिहासाचीं साधनें :— अत्यंत प्राचीन काळांतील मनुष्याचा इतिहास लिहिण्याचें साहित्य पुरविणारे संशोधक म्हणजे भूशास्त्रवेत्ते होत.  पृथ्वीच्या भूमिजलरूपी पापुद्र्याचा इतिहास मिळविण्याचा त्यांनीं जो प्रयत्‍न केला त्यांत त्यांस मनुष्यप्राण्याच्या अत्यंत प्राचीन अस्तित्वाचे अवशेष जगांतील अनेक ठिकाणीं सांपडले.  ते अवशेष आणि जगामध्यें आज बोलल्या जाणार्‍या भाषांचें सादृश्य आणि भेद हीं अत्यंत प्राचीन इतिहासाचीं साधनें होत.