प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
स्पर्धेचा क्षेत्रफळ व लोकसंख्या यांशीं संबंध :— एखाद्या समाजाचें महत्त्वमापन करण्यासाठीं आणि जगांतील स्पर्धेचा इतिहास थोडक्यांत सांगण्यासाठीं, त्या समाजानें किती भूभाग व्यापिला आहे आणि आपली लोकसंख्या किती वाढविली आहे याचा हिशोब घ्यावा लागतो. आधुनिक जगाच्या सध्यांपर्यंत परिचित झालेल्या भूपृष्ठभागाचें क्षेत्रफळ पांच कोटी वीस लक्ष चौरस मैल आहे. पृथ्वीच्या औदीच्य आणि दक्षिण टोंकांवरील निर्जन भूभाग वगळला असतां, म्हणजे जगांतील मनुष्यांचें वसतिस्थानच जमेस धरिलें असतां येणारा आंकडा वर दिला आहे. हिंदुस्थानाचें क्षेत्रफळ सुमारें अठरा लक्ष चौरस मैल म्हणजे परिचित जगाचा एकोणतिसावा हिस्सा आहे. ज्ञात तथापि अपरिचित असा औदीच्य व दक्षिण ध्रुवाकडील भाग हा पसतीसपासून चाळीस लक्ष चौरस मैल म्हणजे दोन हिंदुस्थानांएवढा अगर अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांहूनहि मोठा आहे.
इंग्लंडचें क्षेत्र हिंदुस्थानच्या सुमारें पंचदशांश आहे. इंग्लंडच्या ताब्यांतील सर्व जगाचा भूभाग घेतला तर तो एकंदर सुमारें एक कोटी सत्तावीस लक्ष चौरस मैल म्हणजे जगाच्या पंचमांशाहून बराच अधिक भरेल. आपल्या सवादोनशेंपट प्रदेशावर इंग्लंड आज राज्य करीत आहे, आणि इंग्लंड व अमेरिका या इंग्रजी भाषा बोलणार्या लोकांचें जग व्यापून टाकण्याच्या आणि आपली सत्ता स्थापन करण्याच्या बाबतींत महत्त्व काय आहे, याची आपणांस वरील आंकड्यांवरून कल्पना येणार आहे.
जगाची लोकसंख्या दीडशें कोटींवर आहे. आणि तिचा एकपंचमांश हिंदुस्थानांत आहे. या एकपंचमांश लोकसंख्येचे घटक कोणते, त्यांचा पृथकपणें व समुच्चयरूपानें इतर जगाशीं संबंध काय, याची कल्पना प्रत्येक भारतीयास पाहिजे. आपणांवर बाहेरील जगाचा परिणाम काय होतो, बाहेरच्या जगावर आपला परिणाम पूर्वी काय झाला आणि आतां काय होत आहे, व जगांतील स्पर्धेचें स्वरूप कसें आहे, याचें स्थूल अवलोकन केलें असतां आपली जगांत काय किंमत आहे, याची आपणांस कांहीं तरी कल्पना येईल.