प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
स्पर्धातत्त्वें :— स्पर्धा वैयक्तिक स्थितींतून सामुच्चयिक स्थितींत गेली म्हणजे समुच्चयविषयक भावना जागृत होते, आणि ही स्पर्धा चालू असतांना ज्या समुच्चयाचे आपण अवयव आहोंत त्या समुच्चयाचें हित व्हावें ही भावना उत्पन्न होते. जगांतील स्पर्धेचे क्षेत्र आपणांस जितकें अधिक परिचित होईल तितकें अवलोकन अधिक मार्मिक होईल आणि दीर्घकालव्यापी स्पर्धामूलक चळवळी समजल्यास इतिहासाचा अभ्यास करतांना महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हें कळावयास लागेल. स्वसंरक्षण हें मुनष्याचें आद्य कर्तव्य होय. राष्ट्रसंरक्षण, जातिसंरक्षण ह्या प्रकारचीं स्वसंरक्षणाचीं अनेक अंगें आहेत. व्यक्तींच्या हितासाठींच राष्ट्राचें हित साधावयाचें. आणि स्वजनांना आपलें सामुच्चयिक हित साध्य करून घेणें शक्य व्हावें म्हणून तें साध्य करून घेण्याचें यंत्र जें राष्ट्र म्हणजे व्यक्तींची संयुक्तस्थिति तिचें संरक्षण करावयाचें. भाषेचें संवर्धन करावयाचें आणि वाङ्मयाचें संवर्धन करावयाचें यांचाहि हेतु हाच कीं, स्वजनांपैकीं बहुतेकांस स्वभाषेखेरीज अन्य भाषा परिचित नसते आणि त्या लोकांस आपल्या उन्नतीच्या मार्गांत अन्य भाषेंत माहिती अडकल्यामुळें परावलंबन, पारतंत्र्य, चढाओढींत अडचण वगैरे जीं विघ्नें भासतात तीं दूर करावयाचीं. संस्कृतिसंवर्धन हे याच प्रकारचें कार्य होय. आपल्या संस्कृतीचा त्याग न करितां, आपल्या मध्येंच अत्यंत प्रगत अशा गोष्टी आणावयाच्या हें अनेकव्यक्तिहितबुद्धीनेंच निघालेलें तत्त्व होय. स्वसंस्कृतीचें रक्षण आणि संवर्धन होण्यासाठीच धर्मविषयक, भाषाविषयक, आणि वाङ्मयविषयक भावना अस्तित्वांत येतात. जाति, राष्ट्र आणि संस्कृती या बंधनांनीं मनुष्यसमाज बांधला गेला आहे. हीं बंधनें तोडून एखादी व्यक्ति परसंस्कृतींत प्रवेश करून आपलें वैयक्तिक हित साध्य करुं शकेल, पण राष्ट्रास किंवा संस्कृतिछत्राखालीं असलेल्या सर्व लोकांस तसें करतां येणार नाही. आणि एका संस्कृतीचें संवर्धन दुसर्या संस्कृतीचा म्हणजे तिच्या घटनेचाच केवळ नव्हे तर तिच्या छत्राखालील व्यक्तींचाहि नायनाट करुं पहातें.
जगांतील स्पर्धेंत आज असे आहे कीं ही स्पर्धा वैयक्तिक असते तशी सामुच्चयिकहि असते. सामुच्चयिक स्पर्धेंत ज्या गोष्टी जिवंत राष्ट्रांस कराव्या लागतात त्या येणेप्रमाणें :—
(१) आपला समुच्चय चांगल्या स्थितींत राखावयाचा.
(२) दुसर्या स्पर्ध्यमान समूहामधील व्यक्ती आणि समुच्चय अथवा समुच्चयाचा केंद्र यांमधील स्नेहाकर्षण कमी करावयाचें.
(३) दुसरे समुच्चय अंतर्घटनाविरहित झाले म्हणजे आपला सामुच्चयिक स्वार्थ साधावयाचा.
(४) प्रसंगी स्पर्ध्यमान समुच्चयांतील व्यक्ती आपल्या समुच्चयांत समाविष्ट करावयाच्या.
(५) आपला समुच्चय शिक्षणानें व ज्ञानवृद्धीनें इतर समुच्चयांपेक्षां चढाओढींत श्रेष्ठ ठरेल अशी व्यवस्था करावयाची.
आपलें राष्ट्र रक्षून दुसर्याचें राष्ट्र पादाक्रांत करण्याचा, आपल्यांतील संस्था सुसंघटीत करून स्पर्ध्यमान समाजांतील संस्थांच्या संवर्धनास व्यत्यय करावयाचा, आपल्या देशांत चोहोंकडचे लोक आणून त्यांस आपले नागरिक बनविण्याचा, बाहेरून आलेल्या लोकांचा निराळेपणा काढून टाकावयाचा इत्यादि सर्व प्रकारचे प्रयत्न उपर्युक्त हेतूंमुळेंच अस्तित्वांत येतात.
पारमार्थिक संप्रदायांचा म्हणजे "रिलिजनां"चा प्रसार हा देखील सामुच्चयिक स्पर्धेचाच एक भाग आहे. मुसलमानांनीं श्रीमंत व्हावें म्हणून होणारी चळवळ हे संवर्धनाचें एक प्रकारचें अंग आहे, तसेंच दुसरें एक अंग म्हटलें म्हणजे मुसलमानांची संख्या वाढविणें हें होय. धर्मोपदेशादि संप्रदायांच्या प्रसाराकरतां होणार्या चळवळी आर्थिक चढाओढीचींच अंगे आहेत. स्पर्धेचीं जितकीं अनेकविध अंगे लक्षांत घ्यावीं तितकी इतिहासाचीं विविध अंगे लक्षांत येऊन चाललेल्या घडामोडीचें अवलोकन अधिक होतें आणि कार्यकर्त्या मुत्सद्यास, आणि जगद्विकासतत्त्वांचें स्पष्टीकरण करूं पहाणार्या तत्ववेत्त्यास तें उपयोगी होतें. सांस्कृतिक प्रश्नांचा विचार मुत्सद्दी फारसा करीत नाहींत, कां कीं त्यांस स्पर्धेचें विस्तीर्ण क्षेत्रच समजलें नाहीं. स्वसदृश समाज निर्माण करण्याचें कार्य केवळ कठोर आणि अरसिक अर्थशास्त्राच्या दृष्टीनें देखील महत्त्वाचें आहे, हें अर्थशास्त्रज्ञानें जगाच्या इतिहासाचा त्या दृष्टीनें थोडाबहुत अभ्यास केल्यास त्यास सहज समजणार आहे.