प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
भारतविषयक ज्ञानार्जनांतील दृष्टी :— भारतीयांस जे आपले हितसंबंध जाणावयाचे आहेत ते त्यांस सहकार्य आणि स्पर्धा या दोन्ही बाजूंनीं विचार करून जाणले पाहिजेत. समाज आणि शरीर यांची तुलना करून समाजास शरीराची उपमा देण्यांत येते. लहान समाज घेतले तरी ते विशिष्ट क्रिया करीत असलेल्या निरनिराळ्या अवयवांनीं युक्त असे दिसतात. तथापि समाज हें शरीर जरासें निराळ्या प्रकारचें आहे. मनुष्यशरीरांतील निरनिराळे व्यापार करणारे अवयव निरनिराळे असतात. त्यांची आपआपसांत स्पर्धा नसते, आणि ते स्वतः स्वयंपूर्ण नसतात. तथापि मोठा समाज घेतला तर त्यांत जवळजवळ स्वयंपूर्ण असलेले आणि एकमेकांशीं स्पर्धा करणारे विभाग असून त्या विभागामंध्यें अन्योन्याश्रय उत्पन्न झालेला असतो, आणि कांहीं बाबतींत ते केवळ मोठ्या समाजाचे विशिष्ट क्रिया करणारे अवयव असतात. समाजाची घटना मनुष्यशरीरघटनेपेक्षां भिन्न असल्यामुळें जेव्हां आपणांस एखाद्या समाजाचा अभ्यास करावयाचा असतो, तेव्हां तो स्पर्धा करणारा समूह या दृष्टीनें केला पाहीजे, तसेंच त्याहूनहि मोठ्या समाजाचा अवयव या दृष्टीनेंही केला पाहिजें.
हिंदुस्थानाचें किंवा हिंदुसमाजाचे जें ज्ञान आपणांस मिळवावयाचें तें साम्राज्याचे अगर जगाचे विभाग, आणि जगांतील इतर समूहांशीं स्पर्धा करणारे समूह, या दोन्ही दृष्टींनीं मिळविलें पाहिजे.
या दोन्ही दृष्टींनीं प्राप्त झालेलें ज्ञान हें इतरांशीं असलेल्या संबंधांचा अभ्यास होय. तथापि जगाशीं आपला कांही संबंध नाहीं अशी तात्पुरती कल्पना करून अंतःस्थिति जाणावयाची आणि अंतर्घटना अभ्यासावयाची, हा देखील महत्त्वाचा विषय आहे. आपण प्रथमतः जगाचा एक भाग या दृष्टीनेंच हिंदुस्थानाकडे व हिंदुसमाजाकडे पाहूं.