प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
स्पर्धाक्षेत्राबाहेरील संस्कृती :— जुन्या काळच्या ज्या संस्कृती आज नामशेष झाल्या त्या बाबिलोनिअन, खाल्डिअन, मिसरी, ईजिअन, पेरू देशांतील व मेक्सिकन या होत. या संस्कृती मृत झाल्या असून त्या आजच्या स्पर्धायुक्त जगांतील भांडणार्या व्यक्ती नाहींत पण त्या कार्य करून गेल्या.
वर निर्दिष्ट केलेल्या प्राचीन कालच्या प्रगल्भ संस्कृतींपेक्षां कमी योग्यतेच्या संस्कृतींचीं कार्ये देखील मोठीं आहेत. अमेरिकन तांबड्या इंडियनापासून मका, भुइमूग, बटाटे इत्यादि उपयुक्त जिन्नस आणि तंबाखूसारखीं व्यसनें जगास लाभलीं आहेत. सिफिलिस म्हणजे फिरंगरोगासारख्या रोगाच्या उत्पत्तीचें श्रेय कांही संशोधक तांबड्या इंडियनांस देतात. ऐतिहासिक माहिती ज्या काळापासून उपलब्ध होते त्याच्या पूर्वीच्या अनेक शतकें, सहस्त्रकें, दशसहस्त्रकें आणि कदाचित् लक्षकें इतक्या कालापासून आजपर्यंत मनुष्यप्राण्याचा इतिहास पसरला आहे. त्यापैकीं बराच अज्ञात आहे. पशूंचें गृह्यीकरण म्हणजे पशूला जंगली स्वरूप टाकावयास लावून मनुष्योपयोगी बनविणें, वन्य वनस्पतींची जोपासना व सुधारणा करून त्यांस मनुष्योपयोगी स्वरूप देणें, मनुष्यास अत्यंत आवश्यक अशा कला तयार व्हावयास म्हणजे उदाहरणार्थ अग्नीचा उपयोग करणें, अत्यंत सामान्य असे विचार व्यक्त करण्यास समर्थ अशी भाषा बनविणें, अपत्यविषयक जबाबदारी कांहींअंशीं स्त्रीजातीच्या अंगावरून घेऊन पुरूषजातीच्या अंगावर टाकणें, म्हणजे थोडाबहुत गृहस्थधर्म स्थापन करणें, इतपतच संस्कृतीचें स्वरूप बनावयास किती काळ लोटला असेल याची कल्पना शास्त्रीय तर्हेनें मांडणें शक्य होईल इतकी इतिहासशास्त्राची प्रगती अजून झाली नाहीं. संस्कृति या शब्दानें आपण जी कल्पना व्यक्त करितों ती अधिक विविध, अधिक श्रमविभागपूर्ण आणि अधिक अन्योन्याश्रयी अशा समाजाची होय. ज्या समाजांत वाङ्मय उपस्थित झालेलें असतें असल्याच संस्कृती आपल्या दृष्टीपथांत येतात. वर उल्लेखिलेल्या संस्कृतींच्या काळींच किंवा आधुनिक काळाच्या पाठीमागें तत्पूर्व किती संस्कतींचा इतिहास लपला गेला आहे हेंहि आपणास निश्चयानें सांगतां येत नाहीं. आपणास असे अनेक प्रदेश आढळतात कीं जेथें मातींत गढलेल्या मोठमोठ्या अनेक इमारती आहेत, आणि त्या स्थलावर आज परिभ्रमण करणारे लोक रानटी स्थितींत आहेत. उदाहरणार्थ सामोआ बेटांतील आजच्या देश्य म्हणून समजल्या जाणार्या रहीवाशांची सुमारें ५० वर्षांपूर्वीची सांस्कृतिक स्थिति पाहिली म्हणजे त्या बेटांतील मोठमोठ्या मयकल्पनांचे कर्ते त्यांचेच पूर्वज होते कीं काय असा संशय उत्पन्न होतो.
लुप्त झालेल्या अशा संस्कृतीची आपणांस साकल्यानें कल्पनाहि येत नाहीं. शिवाय समुद्र व जमीन यांची आजची जगावरील वांटणी ही देखील अनेक वर्षांपूर्वीच्या ज्या कालीं नव्हती त्या वेळेस भूभागाचें सांस्कृतिक स्वरूप काय होतें याचें आपणास चित्र काढतां येत नाहीं. हिंदुस्थान म्हणून आपण आज ज्याला म्हणतों तोच देश घेतला तर त्याचें प्रादेशिक एकत्व प्राचीनकालीं नव्हतेंच. दख्खन, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर आणि दक्षिण आफ्रिका हीं एका काळीं संबद्ध होतीं अशी भूशास्त्रवेत्त्यांची कल्पना आहे. कदाचित् मनुष्यप्राण्याचा उद्भवहि तेथेंच झाला असेल आणि तेथील मनुष्याचें स्वरूप आज लिमर नांवाचा मनुष्यकल्प प्राणी आढळतो त्या प्राण्यासारखें असेल अशी शास्त्रीय कल्पना संशोधकांनीं बसविली आहे. {kosh थिआसफिस्ट नांवाचा जो विचारसंप्रदाय अलीकडे तयार होत आहे त्यांनीं लिमुरिया खंडाची कल्पना गृहीत धरून त्यावरील एका प्रलयपूर्व उच्च संस्कृतीविषयीं मोठे मौजेचे विचारतरंग 'अतींद्रियशक्ती' च्या साहाय्यानें रचले आहेत. ते कोणास पहावयाचे झाल्यास ब्लाव्हाटस्कीचें 'सीक्रेट डाक्ट्रिन' हें पुस्तक पहावे. त्या पुस्तकांतील मतें व कल्पना थिआसफिस्टांतील कांही भोळसर आणि कांही धूर्त माणसांनीं उपबृंहित केलीं आहेत. ब्लाव्हाटस्कीचे अनेक स्वैर कल्पनातरंग हिंदुस्थानांतील कांही भोळसर मंडळीस कसे ग्राह्य होतात हें पहाण्याची ज्यास इच्छा असेल त्यानें ग. वि. चिपळूणकर मंडळीच्या महाभारतास परिशिष्टरूप असलेल्या हरिवंशाच्या भाषांतराची प्रस्तावना पहावी.}*{/kosh} हिंदीमहासागर लिमरस्वरूपी मनुष्यकल्पांनीं वसलेला होता ही कल्पना आजच्या शास्त्रज्ञांकडून तीव्र टीकेस पात्र होऊन सोडून दिली गेल्यासारखीच आहे. तथापि आफ्रिका व हिंदुस्थानचा दक्षिणभाग जोडणारा प्रदेश प्राचीनकाळीं होता या कल्पनेचा त्याग झाला नाहीं.
आफ्रिकेचें आजचें भूस्तरस्वरूप देखील पुष्कळ फेरफार होऊन बनलेलें आहे. या खंडांत देखील पुष्कळ ठिकणीं अनेक नष्ट संस्कृतींचे अवशेष सांपडतात. अमेरिकेंत पेरू आणि मेक्सिको खेरीज इतर ठिकाणीं देखील बर्याच उच्च प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष आज सांपडत आहेत. त्यांची गोळाबेरीज करून सांगणारा ग्रंथ अलीकडे झाला नाहीं. तथापि नाडिलॅक यानें 'प्रिहिस्टॉरिक अमेरिका' म्हणून जें पुस्तक बर्याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलें त्यांत अशा पुष्कळ अवशेषांचें वर्णन दिलें आहे.