प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
भारतीय संस्कृती :— भारतीय संस्कृती म्हणून आज आपण जी म्हणतों ती एकाच मानववंशांतून निघालेली नाहीं. सगोत्रविवाहास निषेध, कुंकूं व बांगड्या इत्यादि स्त्रियांचीं सौभाग्यचिन्हें, देशांत दृष्टीस पडणारीं अनेक उपास्यें, अनेक चालीरीति हीं वैदिक परंपरेंतून निघालीं नाहींत तर वैदिक परंपरेच्या लोकांच्या आचारांशीं आणि धर्मांशी इतरांच्या आचारधर्मांचें एकीकरण होऊन आजचें हिंदुत्व निर्माण झालें आहे, असा संशोधकांचा मथितार्थ आहे. या भारतीय संस्कृतीच्या मूलघटनेचा व संवर्धनाचा म्हणजे इतरांशीं आलेल्या तिच्या संबंधाचा व तन्मूलक विस्ताराचा एक लांबलचक इतिहास आहे; तो प्रत्येक भारतीयास ज्ञातव्य आहे. भारतीय संस्कृतीचीं अंगें चोहोंकडे पसरलीं, तिनें अनेक लोकांवर छाप टाकली, आणि बर्याच लोकसमुदायास स्थूल एकरूपता आणली. गेल्या ९०० वर्षांचा इतिहास पाहिला असतां विद्येविषयीं होत असलेल्या दुर्लक्षामुळें, स्पर्धा करणार्या आणि भारतीय संस्कृतीचा नाश करूं पाहणार्या इतर संस्कृतींशी भारतांतील विद्वान् वर्ग अपरिचित असल्यामुळें, वाढत चाललेल्या ज्ञानक्षेत्राशीं असंबद्ध राहिल्यानें, जगाशी स्पर्धा करण्यास योग्य असें समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळें, आणि इतर अनेक कारणांनीं या संस्कृतीचा दिवसानुदिवस नाश होत आहे. एका काळीं या संस्कृतीचा पगडा बॅक्ट्रियापासून कँबोडियापर्यंत आणि खरोष्ट्रापासून फिलिपाइनपर्यंत इतका दृढ झाला होता कीं हा सर्व प्रदेश म्हणजे भारतवर्षच होऊं पहात होता. या संस्कृतीचें महत्त्व ग्रीक व रोम येथपर्यंत भासत होतें, आणि या संस्कृतींतील बौद्ध संप्रदायाचा पगडा चीन, जपान, तिबेट, मांचुरिया, तुर्कस्तान आणि सैबेरिया इतक्या विस्तीर्ण प्रदेशावर पडला होता. तीच संस्कृति आज कां नामशेष होऊं पहात आहे, आणि तिचें आपण जागरूक झाल्यास काय भवितव्य आहे या सर्व गोष्टी आपणांस विचारार्ह आहेत.