प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.

संस्कृतींच्या अभ्यासाचे हेतु आणि महत्त्व :—  जुन्या संस्कृतीचा अभ्यास करावयाचा तो कौतुकमय दृष्टीनेंच होईल.  तथापि आजच्या जीवनार्थकलहांत त्या अभ्यासाचें महत्त्व नाहींच असें नाहीं.  जिवंत संस्कृतीस आपले पूर्वींचे अवयव शोधणें आणि शक्य असल्यास त्यांचा मुख्य भागांशीं संबंध जोडणें हें महत्त्वाचें कार्य आहे.  जिप्सींचा आणि हिंदुस्थानचा संबंध आज जो लक्षांत येतो तो भाषाशास्त्रमूलकच आहे.  आणि आजचे श्यामलवर्ण हिंदु अमेरिकेच्या नागरिकत्वास योग्य ठरले, त्या प्रसंगी कायद्याचा अर्थ लावणयासाठीं भाषाशास्त्रच उपयोगास आलें.

मृतसंस्कृती आजच्या स्पर्धेंत नाहींत.  तेव्हां आपलें लक्ष साहजिकच जिवंत संस्कृतींकडे आणि विशेषेंकरून ज्या संस्कृतीचा आपण अभिमान धरतों तिचीं नातीं शोधण्याकडेसच जाणार. मनुष्यप्राण्याच्या इतिहासांत त्याच्या अनेक करामती जलप्रलय (प्रदेशच्या प्रदेश समुद्रांत कायमचे बुडणें), धरणीकंप इत्यादि सृष्टिक्षोभांनीं नष्ट झाल्या आहेत.  ज्या करामती नष्ट झाल्या त्यांचे अवशेष शोधून त्या अवशेषांचे धागे आजच्या परिस्थितीशीं जोडणें शक्य होऊन इतिहासाचें सातत्य आपणास देतां येईल काय हाहि एक प्रश्नच आहे.  असो.