प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ४ थें.
असुरी बाबिलोनी संस्कृति.

असुरियन साम्राज्य, प्रथमकाल. - ख्रि. पू. १८३० ते ११२०.-असुरिया प्रांत प्रथम बाबिलोनी लोकांकाडूनच वसविला गेला. या वसाहतीचा काल जरी अनिश्चित असला तरी ख्रि. पू. ३००० च्या सुमारास निनेव्हे हें अस्तित्वांत होतें. या प्रांतातील अगदीं प्रथमचे राजे तेथील मुख्य उपाध्याय असून ते बाबिलोन प्रांताच्या राजांचे मांडलिक असत. ख्रि. पू. १८३०-१८१० मध्यें पहिले ज्ञात असलेले राजे (इशक्के) इश्मेडगन आणि त्याचा पुत्र पहिला शमसिअद्द हे होत. यानें अशुर नगरामध्यें अनु आणि अदर या देवतांकरितां एक मोठें देवालय बांधिले. ख्रि. पू. १८००-१७०० या वेळच्या इगुरकपकपू (दुसरा शमसी अद्द) या राजाबद्दल फारशी माहिती नाहीं. व खल्लू आणि इरीशुम यांचा कालहि निश्चित नाहीं. ख्रि. पू. १७००त बेलकपकपू यानेंच प्रथम स्वत:स राजा म्हणवून घेतलें. आणि यावरून राजसत्तेची खरी संस्थापना यानेंच केली असावां असा समज आहे आणि एरारहडन हा ज्या पुरुषाचा वंशज असल्याबद्दल मानतो तो बेलबनी नांवाचा राजा हाच असावा. ख्रि. पू. १७००-१४५० या असुरियन इतिहासांतील कालाची माहिती अगदीं अज्ञात आहे. १५२५ च्या सुमारास मेगिड्डोच्या युद्धानंतर असुरियाच्या राजानें तिसऱ्या टेडुटाइम्सला नजराणा पाठविल्याची गोष्ट मात्र आपणांस माहीत झाली आहे. ख्रि. पू. १४५० या सुमारास बाबिलोन प्रांताकडून असुरियाचें स्वातंत्र्य कबूल करण्यांत आलें. असुरियाचा राजा अशुरबेलनिशयेशू यानें बाबिलोनियाचा राजा काराइंडश याजबरोबर राज्याच्या सीमेबद्दल तह केला. ख्रि. पू. १४२० त वुझुरअशुर याचेहि बाबिलोनी लोकांबरोबर राज्यमर्यादेबद्दल तह झाले. ख्रि. पू. १४०० मधील दुसरा अशुरनदिन अखेर हा इजिप्तचा राजा चौथा अमेनहॉटेप यांशीं समकालीन असून त्यानें अशुर येथें एक राजवाडा बांधिला आहे किंवा दुरुस्त केला आहे. अमर्ना कागद पत्रांवरून ही हकीकत कळते. ख्रि. पू. १३७० या वेळीं अशुरउबलित या असुरियन राजाच्या मुबालितत शेरूआ नांवाच्या कन्येचा विवाह बाबिलोनचा राजा करखर्दस याजबरोबर करण्यांत आला. करखर्दसचा मुलगा पहिला कदशमनखर्बे मारला गेल्यामुळें असुरियन राजास बाबिलोनी सत्तेंत ढवळाढवळ करण्यास सवड सांपडली आणि अशुरउबलित याचा नातू कुरिगल्झ्यू यास राज्यावर बसविण्यांत आलें. अशा रीतीनें बाबिलोन प्रांतावर असुरियांचें थोडेंबहुत वर्चस्व होऊं लागलें. या सुमारास अशुर उबलित यानें शुबरोवर स्वाऱ्या केल्या ख्रि. पू. १३६० त अशुरउबलितचा मुलगा बेलनिरारी यानें एलामाइट टेकड्यांच्या रहिवाशांस जिंकिले व यामुळें दुसरा कुरिगल्झ्यू आणि बेलनिरारी या दोघांमध्यें लढाई होऊन बलनिरारी यास जय मिळाला. आणि दोन्ही राज्यांतील सीमारेषांची नवीन व्यवस्था करण्यांत आली. ख्रि. पू. १३५० त त्याचा मुलगा पुडुइलु हा शूर योद्ध असून त्यानें आपल्या राज्याचा बराच विस्तार केला वगैरे माहिती कांहीं थोडया शीलालेखांवरून कळते. त्याचा मुलगा पहिला अद्दनिरारी यानें शेजारचे देश जिंकण्याचें धोरण पुढें चालविलें व हस्तगत केलेल्या शहरांची डागडुजी करून आपल्या राज्यास बरीच मजबुती आणिली. याच्या नांवाची एक तलवार व एक प्राचीन लेख उपलब्ध आहे. ख्रि. पू. १३३० त याचा मुलगा पहिला शाल्मनसर यानें उत्तरेकडील लांबच्या प्रदेशांतून येणाऱ्या रानटी लोकांकडून त्रास न व्हावा म्हणून युफ्रोटिस आणि तैग्रिस या दोन नद्यांमध्यें वसाहतीची स्थापना केली. यानें उत्तरसीरियांतील मुर्सी नांवाचा प्रदेश आपल्या ताब्याखालीं आणिला आणि असुरियन लोकांनीं प्रथमच याच्या कारकीर्दीत युफ्रेटिस नदी ओलांडिली व अशा रीतीनें वाढणाऱ्या असुरियन सत्तेस बालिफपर्यंत किंवा युफ्रेटिस पलीकडे पसरण्यास वाव मिळाला आणि कॅला येथें नवीन राजधानी स्थापण्यांत आली. यावेळचे दोन विटांवरील लेख उपलब्ध झाले आहेत. ख्रि. पू. १२९० त याचा मुलगा पहिला टुकुलटिनिनिब यांच्या कारकीर्दीत असुरिया आणि बाबिलोन या प्रांतात पुन्हां यादवी सुरू झाली.