प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण १ लें
पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतीचें स्थूल विवेचन
प्राचीन संस्कृतीचें स्थूल पर्यालोचन - प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाचे आतां थोडक्यांत पर्यालोचन करूं, आणि ज्या वेळेस आपल्याकडे ॠषी व आचार्य सर्व जगाला आदर्शभूत असे विचार व्यक्त करीत होते आणि रामायणादि ग्रंथांचा पाया ज्या वेळेस रचला जात होता आणि राजवंशांची वंशावळी तयार होत होती आणि हिंदस्थानातींल अंबरीष, मान्धाता, मरुत्त इत्यादि थोर पुरुषांची चरित्रें कुशीलवांकडून रक्षिली जात होती, आणि प्राचीन विद्येचें एकीकरण करण्यासाठीं वेदांच्या संहिता तयार होत होत्या त्या वेळेस इतर जगांत काय हालचाली दृष्टीस पडतात तें पाहूं.
जगाकडे इतक्या प्राचीनकाळीं नजर फेंकतांना पहिली क्रिया ही कीं प्राचीनकाळीं जगाचा कोणता भाग वसला होता, आणि विशेष वर्णनासाठीं आपणांस कोणता भाग घ्यावयाचा याचा निर्णय करणें. आतांपर्यंतच्या पुराव्यावरून एवढें म्हणतां येईल कीं, मनुष्यप्राण्याची वस्ती चारहि खंडांत झाली होती. विशेष वाढलेल्या संस्कृतीसंबंधानें प्रत्येक खंडाविषयीं स्थूल मानानें येणेंप्रमाणें माहिती देतां येईल.
अमेरिका - ख्रिस्ती शकाच्या दहाव्या शतकाच्या पुढें पेरू व मेक्सिको यांचा इतिहास सांपडतो. ख्रिस्ती शकापूर्वी काय स्थिति असावी याची आज कल्पना नाहीं. मनुष्य प्राण्याचें उत्पत्तिस्थान अमेरिका होतें असें म्हणणारेहि कांही शास्त्रज्ञ आहेत. प्रास्तरसंस्कृतीचें अवशेष तेथें सांपडावे यांत नवल नाहीं. कां की बराचसा भाग पाश्चात्य लोक आले त्यावेळेसदेखील प्रास्तर संस्कृतीत होता. मांस्टाडात हें शास्त्रीय नांव ज्यास दिलें आहे असा एक पूर्वयुगीन प्राणी अमेरिकेंत असतां त्या कालांतहि मनुष्यप्राणी अमेरिकेंत होता असें दाखविणारे अवशेष तेथील भूस्तरशास्त्रज्ञांस परिचित आहेत.
आफ्रिका - इजिप्त (अबिसिनियासह) आणि त्युनिस हे देश सोडून उरलेलें खंड विचारांत घेण्याजोगें नव्हतें. ग्रीक संस्कृति इ.स. ७७६ च्या नंतर आफ्रिकेंत आलेली असावी. मोरोक्कोमध्यें जी मोठीं पाषाणाचीं कृत्यें सांपडतात त्यांचा काल अज्ञात आहे.
युरोप-इजिअन - मायसिनियन संस्कृतिची माहिती बरीच मिळाली आहे. इतर भागाची माहिती म्हणजे ख्रि. पू. १५०० च्या सुमारास तेथील लोक लोहपूर्व सांस्कृतिक स्थितींत होते.
एशिया मध्यें - फिनिशियन, बाबिलोन, असुर, अक्कड, सिरिया, सायप्रस, पालेस्टाइन (यहुदां लोकांपूर्वीचें) चीन या राष्ट्रांची कांही माहिती मिळते. फ्रिजिअन हे नंतरचे होते. यहुदी वगैरे राष्ट्रें प्राचीन खरी पण ती सर्व ख्रि. पू. १५०० नंतरची आहेत.
ख्रि.पू. १५०० च्या पूर्वीच्या कालाचे सविस्तर वर्णन करण्यासाठी जे देश घ्यावयाचे ते असें असले पाहिजेत की, ज्यांची संस्कृति बरीच वाढली होती. या ठिकाणी प्रास्तरसंस्कृतीच्या पलीकडे जी राष्ट्रें गेली नव्हतीं अशांचा इतिहास आपणांस घेतां येत नाहीं.
यूरोपीय संस्कृतीचा आरंभ ईजिअन संस्कृतीच्या रुपानें तर खास झाला होता. पण ग्रीक व मायसिनिअन संस्कृतीमुळेंहि कांही आरंभ झाला होता. शिवाय यूरोपच्या इतर कांही भागांत ब्रांझची भांडीं करण्यापर्यंत संस्कृति वाढली होती. या सर्व परिस्थितीचा आपणास विचार करितां हे उघड होत आहे की, (१) इजिप्त व क्रीट (२) सायप्रस (३) बाबिलोनिा, खाल्डिया व असुरिया (४) फिनिशिया (५) पालेस्टाईन (यहुदीपूर्व) (६) हिटाइट (७) चिनी. या संस्कृतीविषयी आपणांस विशेष माहिती दिली पाहिजे.
इजिप्तची संस्कृति अधिक प्राचीन की बाबिलोनियांतील अधिक प्राचीन या विषयावर आज निश्चयानें सांगतां येत नाहीं. संस्कृतीच्या कोणत्या विकासकालांत आपण तिला बरीच प्रगत म्हणावें हा प्रश्न पुढें येतो. शिवाय कोणती तरी एक वाढ लोकांस सुधारलेलें म्हणण्यासाठी निश्चित केली तरी रोज निघणारे नवीन शोध जुनें मत बदलावयास लावतात.
इजिप्तमधील ख्रिस्तपूर्व सात हजार वर्षाच्या सुमाराची मातीची भांडी सांपडली आहेत, आणि असुरिया व बाबिलोनिया या विषयींचे तज्ज्ञ ख्रिस्तपूर्व ३८०० वर्षे, ४५०० वर्षे, ७००० वर्षे इतक्या जुन्या काळाच्या गोष्टी मोठ्या धैर्यानें सांगण्यास पुढें येत आहेत. ब्रिटिश म्युझियम मधील कांही लेखांवर ख्रि. पू. ४५०० अशी नोंद केली आहे. आणि पेन्सिल्व्हॅनिया युनिवहर्सिटीनें निप्पुर येथें जें संशोधन चालविलें आणि धूलिकणाचे थर जमण्याचें जें त्यांनी गणित केलें त्यावरून ९००० वर्षापूर्वीच्या गोष्टी सांपडल्या आहेत असें म्हणतात.
ख्रि. पू. १५०० सुमारचा इजिप्तचा व बाबिलोनियाचा इतिहास द्यावयाचा म्हणजे दोन्ही साम्राज्यामध्यें पांच सहा हजार वर्षे जें संस्कृतिवर्धन झालें त्याचा इतिहास द्यावयाचा. निप्पुर इत्यादि शहरें ज्या लोकांनीं बसविली ते लोक कोठून आले त्या लोकांच्या वसाहतकालीं काय स्थिती होती इत्यादि गोष्टीसंबंधानें लिहावयाचें म्हणजे ख्रि. पू. ८००० वर्षापर्यंत जावें लागतें किंवा काय कोण जाणें. प्राचीन इतिहासासंबंधानें आपणांस तात्पुरती अशीं कल्पना केली पाहिजे कीं, ख्रि. पू. ५००० वर्षाच्या सुमारास नील या युफ्रेटीस नदीच्या आसमंतांतील प्रदेश कांहीशा सुधारलेल्या लोकांनी वसला गेला होता. या लोकांत राजे होते, उपाध्ये होते, देवळें होतीं, सामान्य प्रकारचे कायदे होते आणि मनुष्योपयोगी कला हि वाढल्या असल्या पाहिजेत. या कालाशीं तुलना केली असतां ख्रि. पू. १५०० हा बराच अर्वाचीन काल भासतो.
या दोन्ही संस्कृतीशीं इजियन संस्कृतीचा म्हणजे क्रीट बेटांतील लोकांचा संबंध असावा, असें दिसतें. इजियन संस्कृति म्हणजे पूर्वग्रीकसंस्कृति.
एशिया खंडांतील प्राचीन संस्कृतीचा प्रदेश म्हटला म्हणजे स्मरनापासून चीन पर्यंत पसरलेला पंचवीस ते चाळीस या उत्तर अक्षांगातील प्रदेश होय. एजिअन संस्कृति ही देखील या प्रदेशांतीलच होय. व इजिप्तची संस्कृति या भूभागांतच विकसित झाली.
इजिप्तचीं संस्कृति व बाबिलोनी संस्कृति या दोहोंचा एक मेकांशी सबंध होता व दोहोंचा पश्चिमेकडील ग्रीसशीं व पूर्वेकडे इराणी व भारतीय या संस्कृतीशीं संबंध होता.