प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण १ लें
पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतीचें स्थूल विवेचन
बाबिलोनी व मिसरी संस्कृतीचा परस्पर संबंध - बाबिलोनियन संस्कृतीची दक्षिणेकडे सुमेर व उत्तरेकडे अक्कड ही दोन केंद्रस्थानें होतीं. त्यापैकी सुमेर हें जास्त प्राचीन होतें. होमेल या प्रसिद्ध पुराणवस्तुशास्त्रज्ञानें कांही आधार देऊन इजिप्तची संस्कृति बाबिलोनियन संस्कृतीपासूनच निघाली असावी असें प्रतिपादन केलें आहे. या गोष्टींस मुख्य आधार ह्या दोन संस्कृतीतींल दैवत संप्रदायांतील साम्य हा होय. होमेल म्हणतो बाबिलोनियन लोकांप्रमाणेच ईजिप्तमधील लोकांतहि आकाश देवता “नु” ही सर्व देवतांत प्रमुख समजली जात असे, “नु” चा पुत्र इजिप्तमध्यें “शु” या नांवानें ज्ञात असून त्याला वायुदेवता कल्पिलें होतें. व “शु” चा पुत्र “केब्” अथवा “सेव” या नांवाचा असून त्याला पृथ्वी देवता मानीत असत. “शु” आणि “सेब” यांच्या पत्नींची नांवें अनुक्रमें “तेप्नुत् “ आणि “नुत्” हीं असून त्यांना आकाशदेवता असें म्हणत असत. बाबिलोनियन लोकांप्रमाणेंच मिसरी लोकांतहि अशी कल्पना होती की, पृथ्वी देवता “सेब” आणि त्याची स्त्री आकाशदेवता “नुत” यांस चार मुलें झालीं. त्यांचीं नावें “ऑसेरिस्”, इसिस्, सेत आणि नेब्थात् अशी होतीं. बाबिलोनियांतील मेरॉडॉक आणि नेर्गल याप्रमाणेंच ऑसिरिस आणि सेत् ह्या इजिप्तमधील अनुक्रमें उन्हाळयांतील व हिवाळयांतील सूर्यदेवता असून त्यांचें एकमेकांशीं पटत नसे. बाबिलोनियामध्ये ज्याप्रमाणें मेरॉडॉक ह्या देवतेचे नांव लिहिण्याकरितां घर आणि डोळा यांची चिन्हें काढीत असत त्याप्रमाणेंच ईजिप्तमध्येंहि ऑसिरिस ह्या देवतेचा उस् (घर) आणि इर (डोळा) या खुणांनीं बोध होत असे. मात्र मिसरी लोक या खुणांचा मूळ अर्थ काय हें विसरून गेलें होते. मिसर देशांतील चित्रलिपीचा आपणांस अर्थ कळूं लागल्यापूर्वीच बऱ्याच जुन्याकालीं प्लुटार्चनें कांही दंतकथा लिहून ठेविल्या आहेत. त्यांमध्यें दुष्ट देवतां “सेत्” हिनें आपला भाऊ “ऑसिरिस” याचा केलेला पराभव, ऑसिरिसची पत्नी “इसिस” हिनें आपल्या पतीकरितां केलेला शोक आणि ऑसिरिसचा पुत्र होरस यानें आपल्या बापाच्या मृत्यूचा घेतलेला सूड इत्यादि गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. या गोष्टी एका सृष्टिचमत्कारावरील रूपकाप्रमाणें दिसतात व वरतीं दिलेल्या देवतांच्या वंशावळीशीं त्याचा निकट संबंध दिसतो. त्याप्रमाणेंच ही दंतकथा बाबिलोनमधून पश्चिम अशियाकडे प्रसार पावलेल्या ताम्नूज देवतेच्या दंतकथेसारखीच दिसते. दुसरी एक ईजिप्त मधील वाङ्मयांत विशेषतः मृतसंबंधी ग्रंथांत वारंवार आढळून येणारी बाबिलोनियन कालांतील दंतकथा म्हटली म्हणजे “रे” या सूर्य देवतेचें मेघाधिष्टित असुर “अपेप्” याशीं झालेल्या युद्धासंबंधी होय. हा असूरच जलप्रलयाला कारण झाला अशी समजूत होती. व या गोष्टी जुन्या कराराच्या प्रवक्त्यांना माहीत होत्या असें दिसतें. बाबिलोनियान व मिसरी लोकांमध्यें सामान्य अशा दुसऱ्या कलप्ना म्हटल्या म्हणजे जीविताचा एक वृक्ष आहे व सुखी मनुष्यांना विश्रांति मिळण्याची एक जागा अथवा बेट आहे या होत. या बेटास मिसरी ग्रंथांत “यलूची क्षेत्रें” असें म्हटलें आहे व बाबिलोनियन ग्रंथांत “अरल्ल” असें नांव आहे. त्याप्रमाणेंच मिसरी लोक आपल्या निरनिराळ्या देवतांचीं नांवे लिहिण्याकरितां जी चिन्हें वापरीत तींही त्यांनी प्राचीन बाबिलोनियन लोकांपासून घेतली असावी, उदाहरणार्थ मार्डुक् अथवा मेसडॉक् आणि रे ऑसिरिस् या देवतांचे चिन्ह बैल आहे. “एआ” आणि “ख्नुम” यांचें चिन्ह एडका आहे. “निन्ढार” व बाल सूर्यदेवता “होर” या दोहींचेहि चिन्ह गरूड किंवा चिमण्याससाणा आहे. ईस्टर आणि इसिस् दोन्ही देवताहि गो चिन्हानें दर्शित होतात. नेर्गल या देवतेचें चिन्ह कोल्हा व सेत संबंधी अनेक देवता दाखविणारी चिन्हें बाबिलोनिया मिसरी लोकांत एकच होती. डॉ. होमेल यांचे असे मत आहे की,बाबिलोनियांतील देवळांना ज्या सात पायऱ्या असत त्यावरूनच मिसरी लोकांस पिरॅमिडची कल्पना सुचली असावी. कारण, त्याला सात टप्पे असत. तसेंच इजिप्तमधील पिरॅमिड्स ही जशीं तेथील राजांची कबरस्थानें आहेत तशींच बाबिलोनियांतील देवळें हींहि कबरस्थानाचें कार्य करीत. इजिप्तमधील पौंड किंमतीचें नाणें बाबिलोनियामधील चांदीच्या मीना नांवाच्या नाण्यापासून निघालेले दिसतें. तसेच इजिप्तमधील एल नांवाचें लांबीचें परिमाण बाबिलोनियांतील त्याच नांवाच्या परिमाणापासून घेतलेले असावे. बाबलोनियन लोकांनीं हे लांबीचे परिमाण “द्वितीय लंबक” याच्या लांबीवरून बसविलें होतें., इजिप्तमधील ज्योतिःशास्त्राचें मूळहि बाबिलोनियांतच असलें पाहिजे. तशीच इजिप्तमधील चित्र लिपींतील अनेक चिन्हें बाबिलोनियांतील तत्तदवस्तुबोधक चिन्हांशी आकाराच्या बाबतींत अगदी सारखीं दिसतात. या पैंकी ठळक उदाहरणे म्हणजें आयुष्य, भाऊ, गुलाम, डावीबाजू, आकाश- नौका, करणें, रात्र, कुरण, आकाशसिंधु वगैरे दाखविणारी चिन्हें होत.
बाबिलोनियांतील प्रथम ऐतिहासिक गोष्ट आपणांला निश्चितपणें सांगता येते ती ख्रिस्तपूर्व ३८०० च्या सुमाराची होय. या वेळी सार्गन व त्याचा पुत्र नरमसीन हे अक्कड येथें राज्य करीत होत. यांचीं नांवें खोदलेल्या वीटा ज्या फरसबंदीमध्यें सापडल्या आहेत तिच्या खाली जो कचरा वगैरे साचला आहे तो सांचण्यास तीन हजार वर्षे लागली असावी असें तज्ज्ञांचे मत आहे. हें खरें असल्यास अक्कड येथील संस्कृति ख्रिस्तपूर्व ६८०० वर्षाइतकी जुनी आहे, असें म्हणावें लागेल. अक्कड येथील संस्कृतीपेक्षां सुमेर येथील संस्कृति जास्त जुनी आहे असें दाखविण्यास आधार आहे. बाबिलोनियामध्यें बऱ्याच उत्तरकालापर्यंत सुमेर येथील भाषा पवित्र मानली जात असे. सर्व प्राचीन शिलालेख त्याच भाषेंत खोदलेले आहेत. तशीच प्राचीन राजांची नांवेहि सुमेरियन आहेत. सुमेरियन लोक हे कोणत्या मानवंशांतील होते, हें अद्यापि निश्चित झालें नाहीं. परंतु ते मूळचे अक्कड येथील सेमिटिक लोकांपेक्षां निराळे होते हे निश्चित आहे. व त्यांचे मिश्रण फारच प्राचीन कालापासून होत होतें एवढी गोष्ट दिसून येते.
आतां आपण इजिप्तच्या प्राचीन इतिहासाकडे वळूं.