प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण १ लें
पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतीचें स्थूल विवेचन
प्राचीन संस्कृतीचें जन्मस्थान - संस्कृतीच्या इतिहासांत असें दिसून येईल कीं, धातूंचा उपयोग, सामान्यतः वाढलेला श्रमविभाग, नगरस्थापना आणि राजशासित राष्ट्रव्यवस्था आणि सृष्टीचा मनुष्यप्राण्यांकडून अधिकाधिक उपयोग या तऱ्हेची संस्कृति वाढावयास योग्य परिस्थिति, कृषिकर्म जेथें बरेच सोपे होईल इतकी उष्णता व पाण्याचा मुबलक पुरवठा ज्या ठिकाणीं असेल तेथेंच दृष्टीस पडते. यामुळेंच नील, युफ्रेटीस, सिंधु, गंगा व यांगत्सी या नद्यांच्या आसपासचे मुलुख हे संस्कृतिवर्धनाच्या प्राचीन इतिहासांत बरेच महत्त्वाचे दिसतात. प्राचीनकाळीं मनुष्यप्राण्यानें आपली करामत येथेंच दाखविली, आणि संस्कृति जेव्हां अधिक वाढली तेव्हां जगाचा अधिक थंड भाग त्यास उपयोगास आणतां आला. प्राचीन यूरोपांत मनुष्यप्राण्यास सृष्टीशीं लढावयास आणि सृष्टीवर जय मिळावयास उपयोगी पडणारी संस्कृति अधिक उष्ण आणि मुबलक पाण्याच्या प्रदेशांत तयार झाली. अमेरिकेच्या सुसंपन्न भूमीचा कमी प्रगति झालेल्या ताम्रवर्ण मनुष्यास उपयोग करतां आला नाहीं. पण उष्ण प्रदेशांतील गुरूंची विद्या घेऊन थंड प्रदेशांतील मनुष्यांनीं ती अधिकाधिक वाढविली तेव्हां त्यांस अमेरिकेंतील अलोट पण स्तिमित संपत्तीचा उपयोग करतां आला.