प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण १ लें
पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतीचें स्थूल विवेचन

इतिहासक्षत्र - प्रस्तुत विभागाच्या पूर्वभागांतील दुसऱ्या प्रकरणांत विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यंत मनुष्यसंभवपूर्व सृष्टीचा आणि मनुष्यसंभवोत्तर मनुष्य भ्रमणाचा इतिहास दिला आहे व जेथे इतिहास देणें शक्य नसेल तेथें त्या इतिहासाच्या संशोधनाच्या प्रचलित पद्धती दिल्या आहेत. तेथून एकदम भारतीय इतिहासाकडे अवलोकन केले आहे आणि भारतीय राजकीय व सांस्कृतिक इतिहास जवळजवळ बुद्धकाळापर्यंत आणून ठेविला आहे. आतां बुद्धपूर्वकालांतील जो इतिहास द्यावयाचा राहिला त्याच्याकडे वळलें पाहिजे. जो राहिला त्याचे स्थूलपणानें तीन विभाग करतां येतील. एक विभाग म्हटला म्हणजे मिसरी, असुरी- बाबिलोनी, व ईजिअन या संस्कृतीचा व चीनच्या संस्कृतीचा. हा सर्व संस्कृतीचा इतिहास परस्पर संबंद्ध आहे. दुसरा उर्वरित इतिहासभाग म्हटला म्हणजे भारती यांच्या पूर्वजांचा इतिहास होय. या इतिहासाची अंगें म्हणजें अनेक प्रकारचे अभ्यास होत. आर्यन लोकांच्या मूलगृहकालीन इतिहासाचें संशोधन, त्यांचेच पर्शुभारतीय कालीन संशोधन व आर्यन्  जातींच्या पश्चिमसंचाराचें संशोधन. हे मुख्यतः यांत येतात. उर्वरिताचा तिसरा विभाग म्हटला म्हणजे या अधिक प्रगत संस्कृतीबाहेर जीं राष्ट्रें लोक होते त्यांजविषयींचें संशोधन. व या तिन्ही विभागांकडे सविस्तर लक्ष दिलें म्हणजे प्राचीन जगाची स्पष्ट व परस्पर-संबद्ध अशी कल्पना येईल.